चीनी स्मार्टफोन ब्रँड विवो भारतात अंमलबजावणी संचालनालयाच्या स्कॅनरखाली आला आहे. ईडी विभागाने विवो कंपनीच्या ४४ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ही मनी लाँडरिंगची चौकशी आहे ज्यामध्ये विवोवर आरोप करण्यात आले आहेत की कंपनीने भारत सरकारपासून लपवून ठेवत चीनला अवैधरित्या मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले आहेत. या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीने विवो कंपनीच्या जवळपास ४४ कार्यालये तसंच कारखान्यांवर छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे हे छापे उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश तसेच दक्षिण भारतातील अनेक भागात पडले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने विवो आणि त्याच्याशी संबंधित उपकंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. सीबीआय या प्रकरणाची आधीच चौकशी करत आहे आणि ईडीने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकणे ही चिनी कंपनीवर मोठी कारवाई असल्याचे समोर येत आहे.

विवोवर ईडीचा छापा

समोर आलेल्या माहितीनुसार, विवो कंपनीच्या जागेवर ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत आणि अंमलबजावणी संचालनालय कंपनी कागदपत्रांची तपासणी करत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. चिनी फोन निर्माता कंपनी विवो बऱ्याच दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाच्या निशाण्यावर आहे आणि याआधीही गुरुग्राममधील विवो कंपनीच्या बँक खात्यातून जीएसटी विभागाने सुमारे २२० कोटी रुपये वसूल केले होते.

( हे ही वाचा: OnePlus 10RT लवकरच भारतात दाखल होणार; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही)

आताच्या छाप्याबद्दल बोललं, तर समोर आलेल्या वृत्तानुसार, हा छापा काही गुप्तचर माहितीच्या आधारे टाकण्यात आला आहे. चीनशी संबंध असलेल्या विवो कंपनीने भारतातील आपल्या कमाईचा अहवाल कमी केला आहे आणि उत्पन्न आणि नफ्याच्या आकड्यांमध्ये हेराफेरी केली असल्याचा संशय अंमलबजावणी संस्थांना आहे. विवो पूर्वी, Xiaomi वर देखील कर चुकवेगिरीसाठी कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतात विद्यमान Xiaomi च्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.