Elon Musk Mocks Amazon Web Services Outage: सोमवारी जगभरात अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्यानंतर स्नॅपचॅट, प्राइम व्हिडिओ आणि एआय साईट्स वापरण्यात युजर्सना अडथळे येऊ लागले आहेत. यानंतर अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनची खिल्ली उडवत, त्यांचा मेसेजिंग प्लॅटफॉर्म, एक्स चॅट कसा सुरक्षित पर्याय आहे, यावर भाष्य केले आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये मस्क म्हणाले की, “एक्स चॅटवरील मेसेजेस पूर्णपणे एन्क्रिप्टेड असतात. त्यामध्ये कोणतेही जाहिरात क्लृप्ती नाही किंवा विचित्र ‘एडब्ल्यूएस अवलंबित्व’ नाही, त्यामुळे कोणी माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली तरी मी तुमचे मेसेज वाचू शकत नाही. यावर तुम्ही फाइल ट्रान्सफर आणि ऑडिओ/व्हिडिओ कॉल देखील करू शकता.”
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसमधील बिघाडामुळे स्नॅपचॅट, फोर्टनाइट, रॉबिनहूड, कॉइनबेस, परप्लेक्सिटी एआय आणि ड्युओलिंगो यासारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर परिणाम झाला. मॉनिटरिंग साइट डाउनडिटेक्टरनुसार, अॅमेझॉनच्या स्वतःच्या सेवा अॅमेझॉन डॉट कॉम, प्राइम व्हिडिओ आणि अलेक्सा यांनाही कनेक्टिव्हिटी समस्येला सामोरे जावे लागले.
एआय चॅटबॉट परप्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास म्हणाले की, AWS सर्व्हरच्या समस्येमुळे हा बिघाड झाला आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, “सध्या परप्लेक्सिटी बंद आहे. त्याचे मुख्य कारण AWS मधील बिघाड आहे. आम्ही ही समस्या सोडवण्याचे काम करत आहोत.”
फोर्टनाइट, रोब्लॉक्स, क्लॅश रॉयल आणि क्लॅश ऑफ क्लॅन्स सारख्या गेमिंग प्लॅटफॉर्मनाही या बिघाडाचा सामना करावा लागला, तर व्हेनमो, चाइम आणि लिफ्ट ही आर्थिक आणि राइड-शेअरिंग अॅप्सपैकी काही होती ज्यांच्या कामात यामुळे अडथळा आला. मेसेजिंग सर्व्हिस सिग्नलने म्हटले की त्यांच्या सिस्टीमवरदेखील याचा परिणाम झाला आहे.
या बिघाडाचा अमेरिकेसह ब्रिटनमध्ये, लॉयड्स आणि बँक ऑफ स्कॉटलंड सारख्या प्रमुख बँकांनी, तसेच दूरसंचार कंपन्या व्होडाफोन आणि बीटी यांनाही फटका बसला आहे. डाउनडिटेक्टरच्या ब्रिटन ट्रॅकरनुसार, ब्रिटनचे कर प्राधिकरण एचएमआरसीलाही त्यांच्या वेबसाइटवर व्यत्यय आला.
या गोंधळाच्या दरम्यान, मस्क यांनी नमूद केले की त्यांच्या प्लॅटफॉर्मला याचा कोणताही फटका बसला नाही. एक लहान अपडेट पोस्ट करताना, त्यांनी फक्त लिहिले: “एक्स सुरळीत चालू आहे.”
