मेसेज करण्यासाठी वॉट्सअ‍ॅप हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. फोटो, व्हिडिओसह मेसेज पाठवता येत असल्याने लोकांना त्यांचे व्यक्तीमत्व, भावना अधिक प्रभावीपणे मांडणे शक्य झाले आहे. तरी देखील काही लोक अधिक फीचर्सच्या नादात क्लोन्ड किंवा थर्ड पार्टी व्हॉट्सअ‍ॅपचे व्हर्जन यूज करतात. मात्र, या क्लोन अ‍ॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचा प्रकार एका कंपनीने उघड केला आहे.

हेरगिरी करतोय अ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपचे थर्ड पार्टी, क्लोन्ड आणि अनाधिकृत व्हर्जन स्पायव्हेअरचा वापर करत आहेत, असे सायबर सुरक्षा कंपनी इएसइटीने आपल्या अहवालात म्हटले आहे. जीबी व्हॉट्सअ‍ॅप नावाच्या लोकप्रिय, मात्र थर्ड पार्टी व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने युजरचे चॅट, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल्सची हेरगिरी केली जात आहे. इएसइटीने तातडीने या अ‍ॅपचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

क्लोन्ड, थर्ड पार्टी अ‍ॅप्सचे हे धोके

क्लोन्ड, थर्ड पार्टी अ‍ॅप्स हे अनेक प्रकरे हेरगिरी करू शकतात आणि ते ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करू शकतात. अहवालानुसार, क्लोन्ड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, म्हणूनच त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा तपासातून जावे लागत नाही. विविध थर्ड पार्टी संकेतस्थळे आणि स्टोअरवर उपलब्ध असलेल्या क्लोन्ड अ‍ॅपमध्ये अनेक प्रकारचे मालव्हेयर असतात, जे फोनसाठी धोकादायक ठरू शकतात.

काय आहे क्लोन्ड अ‍ॅप

अधिकृत अ‍ॅपपेक्षा क्लोन्ड अ‍ॅपमध्ये अधिक फीचर मिळतात. उदाहरणार्थ जीबी व्हॉट्सअ‍ॅपचे युजर मेसेज डिलिट केल्यानंतर तो मेसेज वाचू शकतात. तसेच युजरला माहिती न होता त्याचे स्टेटस वाचण्याचा पर्याय देखील मिळतो. असे फीचर मूळ अ‍ॅपमध्ये छेडछाड करून कोडमध्ये बदल करून दिले जातात. यामुळे क्लोन्ड अ‍ॅप हे सुरक्षित नसतात.

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद होऊ शकते

क्लोन्ड अ‍ॅप किंवा अनाधिकृत अ‍ॅप वापरणाऱ्यांवर व्हॉट्सअ‍ॅप तात्पुर्ती बंदी घालत आहे. तरी देखील यूजरकडून हा प्रकार घडल्यास त्याचे खाते कायमचे बंद केले जात आहे, असे अहवालात सांगण्यात आले आहे. सर्वाधिक अँड्रॉइड ट्रोजन आढळणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे देखील या अहवालात सांगण्यात आले आहे.

काय आहे ट्रोजन?

ट्रोजन हा एक मालव्हेअर आहे जो अधिकृत प्रोग्रामच्या वेशात संगणकात प्रवेश करतो. ट्रोजन हा फोनच्या दैनिक कार्यक्षमतेवर परिणाम करत नसल्याने तो ताबडतोब आढळून येत नाही. मात्र तो फोनमध्ये बिघाड घालू शकतो आणि डेटा चोरी करू शकतो.