पुणे : पारंपरिक इंधनाचा वापर कमी करण्याबरोबर परकीय चलनाची बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे वाढणारी विजेची मागणी पुरविण्याचे आव्हान असून, ‘बॅटरी स्टोरेज’साठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी वेळेत करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
तज्ज्ञांनी सांगितले, ‘परकीय चलनाची बचत करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी पारंपरिक वाहनांना पर्याय म्हणून ‘ईव्ही’ वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी चार्जिंग स्टेशनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यात येत आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदान, ‘ईव्ही’निर्मितीमधील उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र, देशातील विजेच्या मागणीत विक्रमी वाढ नोंदविण्यात येत असून, राज्यातील विजेची मागणी सुमारे ३३ हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. विजेची मागणी पुरवण्यासाठी सौर ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा आदी नवीकरणीय स्त्रोतांची क्षमता वाढविण्यात येत आहे. देशातील नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांची क्षमता सुमारे ५५ टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, राज्यातील नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांची क्षमता ५६ टक्क्यांपुढे आहे. त्यात सर्वाधिक वाटा सौर ऊर्जेचा आहे. मात्र, दिवसा निर्माण होणारी सौर ऊर्जा संध्याकाळी जास्त मागणीच्या कालावधीत वापरता येत नाही. त्यासाठी आवश्यक ‘बॅटरी स्टोरेज’ यंत्रणा अपुरी असल्याचे समोर आले आहे. या वर्षी सुमारे ८१३३ गिगावॅट तास सौर ऊर्जा वितरणाअभावी वाया गेली. परिणामी, सायंकाळच्या विजेसाठी पारंपरिक ऊर्जास्त्रोतांवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.’
‘ईव्ही’ला प्रोत्साहन देण्यासाठी बॅटरी स्टोरेज यंत्रणा सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत ऊर्जा क्षेत्रातील जाणकारांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. ‘बॅटरीनिर्मितीमध्ये अनेक अडथळे असून, त्यासाठी आवश्यक घटक देशांतर्गत बाजारात उपलब्ध होत नाहीत. ‘पंप हायड्रो स्टोरेज’ची आपली क्षमता नगण्य आहे. ‘बॅटरी एनर्जी स्टोरेज’साठी केंद्राकडून धोरणे आखण्यात आली आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळेनुसार उद्दिष्टे निश्चित करण्याची गरज असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, स्टोरेज यंत्रणा आदी आवश्यक परिसंस्था तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. विजेची मागणी पुरवण्यासाठी दिवसा निर्माण झालेली सौर ऊर्जा रात्री वापरता येईल. त्यासाठी ‘बॅटरी स्टोरेज’ला प्रोत्साहन देण्यात येत आहे.- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण
ईव्ही बनवण्यामध्ये आपण स्वावलंबी आहोत का, जेणेकरून आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचू शकेल. त्यासाठी लागणारे ‘बॅटरी’सारखे महत्वाचे घटक आपण किती प्रमाणात आयात करतो? त्यात किती परकीय चलन जाते? पेट्रोल-डिझेलमध्ये जाणारे परकीय चलन आणि ‘ईव्ही’साठी जाणारे परकीय चलन, याचा तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे. ‘ईव्ही’साठी मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारावे लागेल. निकामी बॅटरींचे काय करायचे? याबद्दल सविस्तर धोरण हवे. त्याअगोदर पेट्रोल-डिझेल वाचविण्यासाठी रस्ते सुधारायला हवेत. वाहन चालकांना कमी उत्सर्जनामध्ये गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. नेहमीच्या गाड्यांपेक्षा ‘ईव्ही’च्या किमतींमध्ये असलेली तफावत लक्षात घ्यावी लागेल. – गजानन जोशी, सौर ऊर्जा अभ्यासक
नवीकरणीय ऊर्जेची स्थापित क्षमता
(आकडे मेगावॉटमध्ये)
ऊर्जेचे स्रोत – महाराष्ट्र – देश
सौर ऊर्जा – २०,३९९.९३ – १७,१०५१.४६
पवन ऊर्जा – ६४८४.८१ – ५९२०१.०७
जैव ऊर्जा – २९९९.९७ – ११७४७.५७
जलविद्युत क्षमता – ३४३१.२८ – ५७,२४६.४३
एकूण – ३३,३१५.९९ – २,९९,२४६.५३
