प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो. बेरोजगार तसेच इतरत्र नोकरी करणारे लोकही चांगल्या नाेकरीच्या शाेधात असतात. आजकाल नोकरीच्या नावाखाली बरीच फसवणूक होत आहे. जर तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर चांगल्या नोकरीची जाहिरात दिसली, ज्यामध्ये काम कमी आणि पगार जास्त असेल तर सावधान राहा. ही नोकरी नसून फसवणुकीचा सापळा आहे. ओटीपी मागून पैसे चोरण्याच्या पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. ठगांनी फसवणुकीचे अनेक नवीन मार्ग शोधले आहेत.

भामट्यांनी ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन फसवणुकीचे जाळे वाढवले आहे. त्यात अनेकजण अडकत आहेत. ठग बनावट जॉब सर्चिंग वेबसाइट तयार करतात आणि तिथे खोट्या नोकऱ्यांची माहिती टाकतात. या सापळ्यात अडकून अनेक लोक या नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. मग हे ठग मोठ्या कंपन्यांचे अधिकारी बनून लोकांच्या मुलाखती घेतात आणि त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देतात. नंतर नोंदणी, प्रशिक्षण किंवा लॅपटॉप देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे मागितले जातात. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर हे ठग त्यांचे नंबर बंद करून गायब होतात. या जाळ्यापासून कसे वाचायचे, याबाबत गृह मंत्रालयाने काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. जाणून घेऊया ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय…

आणखी वाचा : आता आधार कार्ड करा ईमेल आयडीला लिंक; UIDAI ने दिली महत्त्वाची सूचना!

फसवणुक कशी टाळावी?
– जाॅबच्या नावाने आलेल्या लिंकवर क्लिक करु नका.
– अनोळखी व्यक्तींसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
– अशा प्रकारचे मेसेज पाठवणाऱ्यांचे नंबर्स ब्लाॅक करा आणि रिपोर्ट करा.
– सायबर गुन्ह्यांत फसवणूक झाली. तातडीने http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करा.

नोकरीची कोणतीही ऑफर घेण्यापूर्वी, त्याची पडताळणी करा. ज्या क्रमांकावरून ऑफर आली आहे तो नंबर किंवा मेल तपासा.कोणतीही नामांकित कंपनी नोकरीसाठी तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नका.अनोळखी नोकरी शोधणाऱ्या वेबसाइटवर कोणतेही पेमेंट करू नका. असे मेसेज आले तर समजा हे हमखास स्कॅम आहे. जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. सावध रहा.