Google tracking: तुम्ही जेव्हा गुगलवर तुमच्या मनातील एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी काहीतरी शोधता, युट्यूबवर व्हिडीओ पाहता किंवा मॅप्स वापरून नेव्हिगेट करता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की, गुगल तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. गुगल हे नाव आपल्या डिजिटल जीवनात इतकं खोलवर रूजलं गेलं आहे की गुगलला आपल्याबद्दल किती माहिती आहे याचा विचार करायला आपण क्वचितच थांबतो. मात्र, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकीत करण्यासारखं आहे.
तुम्ही इनकॉग्निटो मोड वापरत असाल किंवा व्हीपीओन, गुगलची पोहोच तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त आहे. गुगलची विशाल इकोसिस्टिम – सर्च, युट्यूब, क्रोम, जीमेल, गुगल मॅप्स आणि अँड्रॉइड हे एका अखंड नेटवर्कसारखे काम करते आणि तुमच्या प्रत्येक डिजिटल हालचालींवर शांतपणे लक्ष ठेवून आहे.
गुगलची मास्टरफाइल सर्व ट्रॅक करते
बहुतेक युजर्सना माहीत आहे की त्यांना दिसणाऱ्या जाहिराती त्यांच्या आवडीनुसार विचित्रपणे सानुकूलित केल्या जातात. मात्र एवढंच नाही, तर तुम्ही वापरत असलेला प्रत्येक सर्च वर्ड, तुम्ही थांबवलेला किंवा पुन्हा प्ले केलेला प्रत्येक व्हिडीओ तुमच्या इनबॉक्समध्ये येणारा प्रत्येक ई-मेल; अगदी तुमचे चालण्याचे मार्ग आणि रेस्टॉरंट भेटी हे सर्वकाही तुमच्याबद्दल एक मोठा डेटा प्रोफाइल तयार करण्यास मदत करते.
गुगल सर्च फक्त तुमचे प्रश्नच नाही तर तुम्ही उघडलेल्या लिंक्स आणि पेजवर किती वेळ घालवता याचाही मागोवा घेते. युट्यूब तुमच्या ऑनलाइन कंटेंट वापरण्याच्या सवयी, आवडीनिवडी आणि तुम्ही किती वेळ काय पाहता याचा रेकॉर्ड ठेवते. जीमेल फक्त तुमच्या ई-मेलची माहिती ठेवत नाही, तर तुमच्या ई-मेलवरून तुमचा प्रवास, खरेदी आणि वेळापत्रकांचे नमुनेदेखील ओळखते.
गुगल मॅप्स युजर्सकडून रिअल टाइम लोकेशन डेटा गोळा करते. तुमच्या सकाळच्या कॉफीपासून ते आठवड्याच्या शेवटी तुमच्या सुट्टीपर्यंत, गुगल मॅप्स तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी कॅप्चर करते.
हा रेकॉर्ड तुम्ही कुठे पाहू शकता?
activity.google.com या संकेतस्थळावर जा. तिथे गुगल तुमच्या प्रत्येक संवादाची टाइमलाइन दाखवते. तुम्ही कोणत्याही गुगल सेवेवर केलेल्या कामाची नोंद केली जाते. तुम्ही कीवर्डद्वारे शोधू शकता आणि दिवस, आठवडे किंवा अगदी वर्षांचा तुमचा इतिहास डेटा स्क्रोल करू शकता.
गुगल तुमच्याबद्दल काय समजते हे जाणून घेण्यासाठी adssetting.google.com ला भेट द्या. हे जाहिरात प्रोफाइल तुमच्याबद्दल सर्वकाही दाखवते. यामध्ये तुमचे संभाव्य वय, लिंग आवडी आणि अगदी आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, तुमच्या पत्त्यातील बदल याचा समावेश आहे.
तुम्हाला तुमच्या शारीरिक हालचालींची माहिती पहायची असेल, तर गुगल मॅप्स अॅप उघडा आणि तुमच्या टाइमलाइनवर जा. इथे तुम्हाला तुम्ही भेट दिलेल्या रेस्टॉरंट, प्रवास केलेली ठिकाणे, विशिष्ट तारखेचा फोटो आणि अगदी तुमच्या दैनंदिन प्रवासाचा डेटा मिळेल. हे सर्व इतक्या अचूकतेने मिळेल की तुम्हाला यावर विश्वास ठेवणं काहीसं अवघड जाईल.
हा डेटा डिलिट करता येईल का?
अजिबात घाबरू नका, यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात. गुगल तुम्हाला तुमचा बराच डेटा हटवू देते किंवा तुमच्या वैयक्तिक डॅशबोर्डवरून तो काढून टाकू देते. माय अॅक्टिव्हिटीच्या पेजवर जाऊन तुम्ही तुमची हिस्टरी दर ३,६ किंवा ३६ महिन्यांनी ऑटो डिलीटवर सेट करू शकता. तसंच गुगल अकाउंटच्या डेटा आणि गोपनियता सेक्शनमधून विशिष्ट प्रकारच्या ट्रॅकिंगला थांबवू शकता. असं असताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, डेटा हटवण्याचा अर्थ नेहमीच हिस्ट्री पूर्णपणे डिलिट झाली असा होत नाही. गुगलच्या प्रायव्हसी नियमांनुसार, कंपनी कायदेशीर, तांत्रिक किंवा ऑपरेशनल कारणांसाठी काही डेटा राखून ठेवू शकते.
गुगलचं डेटा कलेक्शन खूप मोठं असू शकतं, मात्र ते अदृश्य नाही. योग्य साधने आणि सेटिंग्जसह तुम्ही या डिजिटल पडद्यामागे खोलवर जाऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या डेटावर नियंत्रण मिळवण्यास सुरूवात करू शकता.
