AI.com Domain Malaysia: वयाच्या दहाव्या वर्षी साधारणपणे मुले शाळेचा अभ्यास, खेळ आणि खोड्या करण्यात व्यस्त असतात. मलेशियातील एक उद्योजक दहाव्या वर्षी डोमेन विकत घेत होता. अर्स्यान इस्माईल यांनी १९९३ साली अवघ्या ३०० रूपयांत (तेव्हाचे १०० डॉलर) एआय डॉट कॉम हे डोमेन विकत घेतले होते. नुकतेच त्यांनी हे डोमेन तब्बल ७० दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनात ६३४ कोटी रुपयांना विकले आहे.

फिनटेक मलेशियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. अर्स्यान इस्माईल यांनी १९९३ साली आईच्या क्रेडिट कार्डचा वापर कतर Ai. Com विकत घेतले होते. लहानपणी आपल्या नावाचे आद्यक्षरांमुळे (AI) मुळे त्यांनी हे डोमेन विकत घेतले होते. त्यांना जराही कल्पना नव्हती की, भविष्यात एआयचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) उदय होईल आणि त्यांच्या या डोमेनची किंमत अब्जावधीत जाईल.

१९९३ साली हे डोमेन विकत घेतल्यानंतर अनेक दशके त्यावर काही काम झाले नव्हते. पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाल्यानंतर अनेकजण एआय नावावरून डोमेन शोधू लागली. डिजिटल रिअल इस्टेट क्षेत्रात एआयवरून सुरू होणाऱ्या डोमेनला चांगली मागणी मिळू लागली. त्यातही एआय.कॉम या डोमेनची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली.

आतापर्यंतचा सर्वात मोठा उघड केलेला डोमेन करार

हे डोमेन एप्रिल २०२५ मध्ये क्रिप्टो डॉट कॉमचे सीईओ क्रिस मार्झालेक यांना विकण्यात आले होते. या करारासंबंधी अनेक वृत्त समोर आले असून ७० दशलक्ष डॉलर्सना डोमेन विकले गेल्याचे कळते आहे. २०१० साली carinsurance . com साठी ४९.७ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले होते, असे वृत्त फिनटेक मलेशियाने दिले आहे.

एआय.कॉम पुन्हा चर्चेत येण्याचे कारण काय?

यंदा सुपर बाउल एलएक्स (अमेरिकन फुटबॉल खेळ) दरम्यान क्रिटो डॉट कॉमने एआय.कॉमच्या बॅनरखाली एजेंटिक AI चा नवीन प्लॅटफॉर्म सुरू केला. तेव्हा पुन्हा एकदा हे डोमेन चर्चेत आले आहे. स्टॉक ट्रेंडिंग करणे, संदेश पाठवणे आणि ॲप आधारित कामे हाताळण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.

क्रिस मार्झालेक म्हणाले की, एआय डॉट कॉम या नावामुळे त्यांच्या कंपनीला एआयच्या शर्यतीत चांगली प्रगती करण्याची शक्यता वाटते.

१०० दशलक्ष डॉलर्सची ऑफर

विशेष म्हणजे अर्स्यान इस्माईल यांनी २०२५ साली जेव्हा हे डोमेन विक्रीसाठी काढले, तेव्हा त्यांना १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंतची ऑफर मिळाली होती. तरीही त्यांनी ७० दशलक्ष डॉलर्सचा करार निश्चित केला. सोशल मीडियावर आता या कराराची पुन्हा चर्चा होत आहे. अनेकांना इस्माईल हे दूरदृष्टी असलेले व्यक्ती वाटतात, तर अनेकांना हा नशीबाचा खेळ वाटतो. तर काहींनी म्हटले की, अवघ्या ३०० रुपयांना डोमेन खरेदी केले असले तरी त्यांनी ते आतापर्यंत जतन करून ठेवले होते. हेही कमी नाही.