How Much Electricity Does a Charger Consume: आजच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेट ही प्रत्येक घरातील गरजेची उपकरणं बनली आहेत. विशेषत: वर्क फ्रॉम होम करणारे, ऑनलाइन शिक्षण घेणारे किंवा दिवसभर मोबाईल वापरणारे लोक दिवसातून अनेक वेळा ही उपकरणं चार्ज करतात. मात्र, रोज फोन आणि लॅपटॉप चार्ज केल्यामुळे वीज बिल किती वाढत असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काहींना वाटतं की यामुळे मोठं वीज बिल येत असेल, तर काहींना वाटतं की त्याचा काहीच फरक पडत नाही. पण, खरं उत्तर जाणून घेतलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं.
सर्वप्रथम मोबाईलबद्दल बोलायचं झालं, तर स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी फारशी वीज लागत नाही. मोबाईल रोज चार्ज केला तरी वर्षभरात साधारण ३ ते ४ युनिट इतकीच वीज खर्च होते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये एका युनिटचा दर वेगळा असला तरी मोबाईल चार्ज करण्यासाठी वर्षभरात साधारण ५० ते ६० रुपये इतकाच खर्च होऊ शकतो; म्हणजे मोबाईल चार्जिंगमुळे वीज बिलावर फार मोठा परिणाम होत नाही.
मात्र, लॅपटॉपच्या बाबतीत चित्र थोडं वेगळं आहे. विशेषत: वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी किंवा दिवसभर लॅपटॉप वापरणारे लोक याकडे दुर्लक्ष करतात. लॅपटॉप चार्ज करण्यासाठी मोबाईलपेक्षा जास्त वीज लागते. वर्षभरात एका लॅपटॉपसाठी साधारण १३० ते १४० युनिट वीज खर्च होऊ शकते, त्यामुळे वीज दरानुसार वर्षभरात ४०० ते १,६०० रुपये इतका खर्च होण्याची शक्यता असते.
टॅबलेट वापरणाऱ्यांसाठीही ही माहिती महत्त्वाची आहे. टॅबलेट चार्ज करण्यासाठी मोबाईलपेक्षा थोडी जास्त, तर लॅपटॉपपेक्षा कमी वीज लागते. एका टॅबलेटला वर्षभरात साधारण १५ ते २० युनिट वीज लागते. त्यामुळे त्याचा वार्षिक चार्जिंग खर्च सुमारे ५०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
पण, सर्वात मोठी चूक अनेक लोक नकळत करतात आणि त्याचाच परिणाम वीज बिलावर होऊ शकतो. अनेक जण मोबाईल चार्ज झाल्यानंतर फोन काढून घेतात, पण चार्जरचं स्विच बंद करत नाहीत. त्यांना वाटतं, फोन जोडलेला नसल्यामुळे वीज खर्च होत नसेल. प्रत्यक्षात तसं नसतं.
फोन किंवा लॅपटॉप जोडलेला नसला तरी चार्जर स्विचमध्ये सुरू असेल, तर तो थोड्याफार प्रमाणात वीज वापरत राहतो. यालाच ‘फँटम लोड’ किंवा ‘स्टँडबाय पॉवर’ असं म्हटलं जातं. हा वीजेचा वापर कमी असला, तरी घरात अनेक उपकरणं अशाच पद्धतीने सुरू ठेवली, तर वर्षभरात त्याचा परिणाम वीज बिलावर जाणवू शकतो.
याशिवाय सतत सुरू ठेवलेला चार्जर गरम होऊ शकतो, त्यामुळे चार्जरचे आयुष्यही कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे फोन किंवा लॅपटॉप पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जर काढून स्विचही बंद करण्याची सवय लावल्यास वीज बचत होण्यास मदत होते. छोट्या वाटणाऱ्या या सवयीमुळे वर्षभरात काही प्रमाणात खर्च वाचू शकतो,
म्हणूनच रोज फोन किंवा लॅपटॉप चार्ज करणं ही चिंतेची बाब नाही. मात्र, चार्जर विनाकारण सुरू ठेवणं ही सवय बदलणं गरजेचं आहे. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास वीज बचत होईल, चार्जरचे आयुष्य वाढेल आणि अनावश्यक वीज वापरही टाळता येईल.
