भारतात ५जी चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत आणि ५ जी स्पेक्ट्रम लिलावालाही सरकारने मान्यता दिली आहे. पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्येच, ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाऊ शकतो, त्यानंतर ५जी नेटवर्क संपूर्ण भारतात खूप वेगाने पसरेल आणि लवकरच ५जी सेवा अधिकृतपणे आणली जाईल. देशातील लोक देखील सुपर फास्ट ५जी इंटरनेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच, मोबाईल यूजर्ससाठी एका महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्यात भारत सरकारने ५जी डेटाची किंमत भारतात किती असेल, याबाबत खुलासा केला आहे.

भारतात ५जी

केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील आगामी ५जी सेवेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतात ५जी सेवा कधी सुरू होणार या मुद्द्यावरून एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. सरकार ऑगस्ट-सप्टेंबरपासून देशात ५जी सेवा सुरू करणार आहे. खरं तर भारत सरकारचे लक्ष्य १५ ऑगस्ट रोजीच ५जी आणण्याचे होते आणि आता अश्विनी वैष्णव यांच्या वक्तव्यानंतर, कदाचित या स्वातंत्र्यदिनीच देशात ५जी सेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षा अधिक दृढ झाली आहे.

भारतात, ५जी त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात निवडक शहरांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल, ज्याचा नंतर विस्तार होईल. अश्विनी वैष्णव यांच्या मते, २०२२ च्या अखेरीस भारतातील सुमारे २५ शहरांमध्ये ५जी नेटवर्क पूर्णपणे सक्रिय होईल. ५जी दूरसंचार सेवेबद्दल बोलायचे झाल्यास, जिओ आणि एअरटेलने त्यांच्या नेटवर्कवर आधीच ५जी चाचणी पूर्ण केली आहे, त्यामुळे या दोन्ही कंपन्या ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर लवकरच ५जी इंटरनेट प्रदान करणे सुरू करतील अशी अपेक्षा आहे.

भारतात ५जी डेटाची किंमत किती असेल?

५जी नेटवर्कच्या नावावर दूरसंचार कंपन्या जास्त शुल्क आकारतील, ५जी इंटरनेट स्पीड ४जी च्या बरोबरीने होईल, अशी प्रतिक्रिया अनेक लोक सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत, भारतात ५जी इंटरनेट वापरण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ५जी डेटाच्या किमतीवर बोलताना सांगितले की, भारतातील ५जी दर जागतिक बाजारापेक्षा खूपच कमी होणार आहेत. अश्विनी वैष्णव यांच्या मते, भारतातील डेटाची किंमत अजूनही जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. भारतातील डेटा दर यूएस डॉलर प्रमाणे २ म्हणजेच भारतात अंदाजे १५५ रुपये आहे. तर सरासरी जागतिक किंमत २५ डॉलर म्हणजेच अंदाजे १९०० रुपये आहे. ५जी नेटवर्कच्या किंमतीबाबत, अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे की ५जी डेटाच्या किमती भारतातही याच दरात आढळतील आणि जागतिक व्यासपीठाच्या तुलनेत कमी राहतील. म्हणजेच, ५जी डेटा परदेशांच्या तुलनेत भारतात १० पट स्वस्त उपलब्ध असेल