तुम्ही नेहमीच ऑनलाईन बँकिंगचा वापर करत असाल तर आता सावधान राहा. तुमच्या बँक अकाऊंटची काळजी घ्या. कारण नाही तर तुमच्या मोबाईलमधील ॲप्समधून कधीही पैसे गायब होऊ शकतात. कारण आता तुमच्या मोबाईलमध्ये जर ‘सोवा’ व्हायरस शिरला तर तो काही मिनिटातच तुमचे खात्यातील पैसे गायब करू शकतो.

सेंट्रल सायबर सिक्युरिटीने या समस्येबाबत अलर्ट जारी केला आहे. हा व्हायरस भारत सरकारने जुलैमध्ये शोधला होता. आतापर्यंत या व्हायरसची पाचवी आवृत्ती अपग्रेड करण्यात आली आहे. हा व्हायरस लॉगिन करून युजरनेम आणि पासवर्ड चोरतो. ते नंतर कुकीज हाताळून वापरकर्त्याची माहिती गोळा करते. यापूर्वी हा व्हायरस रशिया, अमेरिका आणि स्पेनमध्येही दिसला आहे. रिपोर्ट्सनुसार, आता जवळपास २०० वापरकर्ते या मालवेअरचे शिकार झाले आहेत.

(आणखी वाचा : सावधान! तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अ‍ॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा, नाहीतर बँक खाते होणार रिकामे )

सरकारच्या सल्ल्यानुसार, या मालवेअरचा लोगो प्रसिद्ध ॲप्ससारखा दिसतो, ज्यामुळे वापरकर्ते दिशाभूल होऊन ते डाउनलोड करतात. हे फेक ॲप मोबाईलवर डाऊनलोड झाल्यानंतर ते सर्व ॲप्सची माहिती सी-टू सर्व्हरला पाठवण्यास सुरुवात करते. त्यानंतर या मालवेअरचा मास्टरमाइंड टारगेट केलेल्या ॲप्सची यादी तयार करतो आणि ही यादी पुन्हा सी-टू द्वारे सोवा व्हायरसला पाठवली जाते.

सोवा व्हायरस एक्सएमएल फाईलच्या स्वरूपात सर्व माहिती सेव्ह करतो. हा मालवेअर स्क्रीनशॉट घेऊ शकतो आणि वेबकॅम व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकतो. हा व्हायरस २०० हून अधिक पेमेंट ॲप्सच्या डुप्लिकेट कॉपी देखील तयार करू शकतो आणि याद्वारे वापरकर्त्याचे खाते रिकामे देखील करू शकतो. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ॲडव्हायझरीनुसार, केवळ वापरकर्त्यांनी अधिकृत ॲप स्टोअरमधून कोणतेही ॲप डाउनलोड करावे. यासह, आपण याबद्दल माहिती मिळविण्यासाठी पुनरावलोकन देखील पहावे.