इस्रोच्या ( ISRO ) ताफ्यात आता आणखी एका रॉकेटची, प्रक्षेपकाची भर पडली आहे. उपग्रह वाहून नेणाऱ्या इस्रोच्या सर्वात लहान प्रक्षेपकाचे SSLV-D3 चे तिसरे आणि अंतिम प्रायोगिक उड्डाण आज शुक्रवारी सकाळी यशस्वी झाले आहे. या प्रक्षेपकाने आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरिकोटा इथल्या इस्रोच्या अवकाश तळावरुन सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. नियोजन केल्याप्रमाणे १६ मिनिटात दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले. यामुळे कमी वजनाचे उपग्रह वाहून नेण्यासाठी SSLV ( Small Satellite Launch Vehicle) चा नियमित वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आजच्या उड्डाणात SSLV-D3 ने EOS-08 हा १७५.५ किलोग्रॅमचा उपग्रह आणि SR-0 DEMOSAT हा २०० ग्रॅमचा उपग्रह अशा दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. EOS-08 हा विविध तरंगलांबीच्या माध्यमातून पृथ्वीची छायाचित्रे घेण्यासाठी ४७५ किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाच्या माध्यमातून समुद्र, जमीन, हिमालय यावरील विविध नैसर्गिक आपत्तींचा, घडामोडींचा अभ्यास केला जाणार आहे. यावर तीन विविध वैज्ञानिक उपकरणे असून भविष्यातील आधुनिक उपग्रहांची पायाभरणी यातून केली जाणार आहे. याचा कार्यकाळ हा एक वर्ष एवढा नियोजित केला गेला आहे.

SSLV ची रचना कशी आहे ?

हा प्रक्षेपक ३४ मीटर उंच, २ मीटर व्यासाचा आणि ११९ टन वजनाचा आहे. या माध्यमातून ५०० किलोमीटर उंचीपर्यंत ५०० किलोग्रॅम वजनाचे उपग्रह पाठवता येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रक्षेपक फक्त ७ कर्मचारी-तंत्रज्ञ-अभियंता उड्डाणासाठी सज्ज करु शकतात तेही अवघ्या सात दिवसात.

SSLV चे महत्व काय ?

इस्रोकडे PSLV, GSLV, GSLV MK3 असे तीन विविध रॉकेट – उपग्रह प्रक्षेपक आहेत. या माध्यमातून दोन टन ते सहा टन ( दोन हजार किलो ते सहा हजार किलोग्रॅम ) वजनाचे उपग्रह प्रक्षेपित केले जातात. जगभरात लहान उपग्रहांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून त्याची मागणी वाढत आहे. तेव्हा SSLV च्या माध्यमातून ५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह पाठवता येणार आहेत. तेव्हा कमी वजनाच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी इस्रोच्या मनुष्यबळ, पैसा यांची मोठी बचत होणार आहे. तसंच आवश्यकता भासल्यास दर आठवड्याला सुद्धा या SSLV प्रक्षेपकाद्वारे उपग्रह प्रक्षेपित करणे इस्रोला शक्य होणार आहे.