Microsoft AI chief Mustafa Suleyman on AI: कृत्रिम बुद्धिमता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या प्रगतीमुळे अनेक कामे सोपी होत असली तरी त्याचे गंभीर परिणाम रोजगारावर होणार आहेत. जगभरातील अनेक आयटी तज्ज्ञांनी यावर आपापली मते मांडली आहेत. एआयमुळे टेक व्यवसायाला फटका बसणार असल्याचे सांगितले जात असले तरी इतर व्हाईट कॉलर क्षेत्रातील नोकऱ्यांवरही कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या एआय विभागाचे प्रमुख मुस्तफा सुलेमान यांनी म्हटले की, बहुसंख्या व्हाईट कॉलर नोकऱ्या एआयमुळे धोक्यात येतील.
एआयमुळे फक्त कोडर्सच नाही तर वकील, अकाऊंटट यासारख्यांच्या नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात.
फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुस्तफा सुलेमान म्हणाले, एआय बाजारात मोठा वाटा मिळवण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे प्रयत्न सुरू आहेत. मानवी प्रोफेशनल्स जे जे काम करतात, ते ते काम एआय मॉडेल करू शकणार आहे. दैनंदिन कामे करण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून एआय टूल्स आणले जात आहे. या टूल्सचा फायदा अनेक कंपन्या उचलू शकतात.
संगणकावर काम करणारे धोक्यात
सुलेमान यांच्या अंदाजानुसार, भविष्यात मनुष्यबळाच्या बाबत मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. जे जे लोक संगणकावर काम करतात, त्यांचे काम धोक्यात आले आहे. व्हाईट कॉलर अर्थात जे लोक संगणकासमोर बसून त्यावर काम करतात, उदा. वकील, अकाऊंटट, प्रोजेक्ट मॅनेजर किंवा मार्केटर अशा स्वरुपाच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. येत्या १२ ते १८ महिन्यांत एआय टूल्सद्वारे ही कामे होतील.
सुलेमान मुस्तफा यांचे विधान अशा काळात आले आहे, जिथे सर्वच टेक कंपन्या आता एआयचा वापर वाढवत आहेत. काही दिवसांपूर्वी एआयवरून अँथ्रोपिकचे क्लॉड कोवर्क यांनी इन्फोसिस आणि टीसीएसबद्दल केलेल्या भविष्यवाणीमुळे भांडवली बाजारात हाहाकार उडवला होता.
मुस्तफा सुलेमान पुढे म्हणाले की, आगामी काळात एआयमध्ये जसजशी प्रगती होईल, तसे नवीन मॉडेल्स बनवणे सोपे होईल. कंपन्यांच्या गरजांनुसार हे मॉडेल्स तयार होऊ शकतात. भविष्यात मनुष्याच्या सहभागाशिवाय अनेक कामे करणे सोपे होणार आहे.

