भारत सध्या टेक्नॉलॉजी, संरक्षण , अर्थ, आयात नियत सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. यामुळे शेजारील राष्ट्र चीन भारताला कमकुवत करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. चीनने भारतात बेकायदेशीरपणे लोन अॅप्स आणि त्यावरून जुगाराचे धंदे चालवत होता. आता त्यावर भारत सरकारने डिजिटल स्ट्राईक केली आहे. म्हणजेच भारताने सुमारे २३२ चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश मोदी सरकारने दिला आहे. यामध्ये १३८ जुगाराशी संबंधित तर ९४ लोन अॅप्सचा समावेश आहे. यावर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) वतीने गृह मंत्रालयाला चीनी अॅप्सवर बंदी घालण्याची सूचना करण्यात आली असून गृह मंत्रालयाने त्याला मंजुरी दिली आहे. एका अहवालानुसार, सरकारने ६ महिन्यांपूर्वी २८८ चीनी अॅप्सची तपासणी केली होती. हे अॅप्स भारतीय नागरिकांचा वैयक्तिक डेटा चोरत असल्याचे आढळून आले होते. यानंतर सरकारने भारत देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या या अॅप्सवर आयटी कलम ६९ अंतर्गत बंदी घातली आहे.
या लोन अॅप्समुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील काही लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटनांमुळे ही बाब समोर आली आहे. या सर्व मृत लोकांनी लोन अॅपवरून कर्ज घेतले होते.