NASA DART Mission Streaming Online: एखाद्या Sci-Fi चित्रपटात दाखवतात तसा खरोखरचा लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला तर? शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार यापूर्वी अशी टक्कर झाल्यावर पृथ्वीवरील डायनोसॉरची संपूर्ण प्रजाती नष्ट झाली होती. यावेळेस अशी परिस्थिती उद्भवल्यास मानव प्रजातीचा निभाव लागणे कठीण होईल. अशीच एक संभाव्य समस्या आता पृथ्वीसमोर येऊन ठाकली आहे. पृथ्वीपासून काही कोटी किलोमीटर अंतरावरुन जास्तीत जास्त ८०० मीटर व्यास असलेला ओबडधोबड आकाराचा Didymos नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेशी काहीसा समांतर लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरत आहे. या लघुग्रहाची धडक टाळण्यासाठी अंतराळ संशोधक संस्था नासाने DART Mission लाँच केले आहे. उद्या पहाटे ४.४४ वाजता या मोहिमेचे लाइव्ह स्ट्रीमिंग असून ते कुठे व कसे पाहता येईल जाणून घ्या..

‘DART’ मोहिम काय आहे?

DART म्हणजे Double Asteroid Redirection Test (DART). Didymos च्या कक्षेत डिमॉर्फोस नावाचा लघुग्रह फिरत आहे. या लघुग्रहावर नासाचा DART नावाचा उपग्रह हा प्रचंड वेगाने आदळणार आहे. या टक्करीतून डिमॉर्फोस ची दिशा व वेग किती प्रमाणात बदलणार याचा अभ्यास केला जाणार आहे.

NASA चे DART (डबल अॅस्टरॉइड रीडायरेक्शन टेस्ट) अंतराळयान २६ सप्टेंबर २७ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४४ वाजता लघुग्रह डिमॉर्फोसला आदळणार आहे. DART हे पहिले मिशन असेल जे पृथ्वीला धोका निर्माण करणाऱ्या लघुग्रहांना पुनर्निर्देशित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीची चाचणी करणार आहे. तुम्ही नासाची ही मोहीम थेट पाहू शकाल.

NASA ची DART मोहीम कुठे पाहाल?

नासा या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नासा टीव्ही, स्पेस एजन्सीचे अॅप आणि त्याचे युट्युब चॅनेलवर करणार आहे. २६ सप्टेंबर रोजी (२७ सप्टेंबर पहाटे ३ वाजून ३० मिनिट) अंतराळयानातून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होईल.

२४ नोव्हेंबर २०२१ ला ‘नासा’ने DART नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला. येत्या २६ सप्टेंबराला पृथ्वीपासून सुमारे एक कोटी १० लाख किलोमीटर अंतरावर असतांना हा उपग्रह डिमॉर्फोस वर आदळणार आहे. ही टक्कर होण्यापूर्वी DART उपग्रह काही छोटे उपग्रह याच भागात सोडणार आहे, उपग्रह व लघुग्रह एकमेकांवर आदळल्यावर डिमॉर्फोस चा वेग आणि दिशा यात किती बदल झाला आहे याची नोंद करणार आहे.