Microsoft Exits Pakistan : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मानली जाणारी कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमध्ये जवळपास २५ वर्षे काम केलं. मात्र, आता पाकिस्तानमधील आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. त्यामुळे याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानमधील आपले सर्व कार्यालय मायक्रोसॉफ्ट कंपनीने बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनी यापुढे पाकिस्तानमध्ये स्थानिक भागीदारांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देणार आहे. मायक्रोसॉफ्टने २००० मध्ये पाकिस्तानमध्ये आपलं कामकाज करण्यास सुरुवात केली होती. पण आता २५ वर्षांनंतर पाकिस्तानमधून मायक्रोसॉफ्टने माघार घेतली आहे. आता तिथे कंपनी थेट काम करणार नाही, पण तेथील स्थानिक भागीदारांच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करत असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. मात्र, आता मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात मायक्रोसॉफ्टमध्ये कामकाज केलेले जवाद रहमान यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातून बाहेर पडत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑप इंडियाने दिलं आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या संदर्भात अद्याप मायक्रोसॉफ्टकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टकडून पाकिस्तानमध्ये कामकाज पूर्ण बंद करण्यात आलं आहे. जवाद रहमान यांनी लिंक्डइनवर ‘एका युगाचा अंत…मायक्रोसॉफ्ट पाकिस्तान’ अशा शीर्षकाची पोस्ट केली आहे.
जवाद रहमान यांनी म्हटलं की, “आज मला कळलं की मायक्रोसॉफ्ट अधिकृतपणे पाकिस्तानमधील आपलं कामकाज बंद करत आहे. उर्वरित काही कर्मचाऱ्यांना औपचारिकपणे माहिती देण्यात आली आहे. अशाच प्रकारे एक युग संपतंय…बरोबर २५ वर्षांपूर्वी जून २००० मध्ये मला मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमध्ये लाँच करण्याचा आणि त्याचं नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता”, असं त्यांनी म्हटलं आहे.
मायक्रोसॉफ्टने पाकिस्तान सोडण्याच्या निर्णयाबाबत जवाद रहमान यांनी म्हटलं की, “ही बातमी चिंता करण्यास भाग पाडत आहे. आपल्या देशात निर्माण होत असलेल्या वातावरणाचा हा परिणाम होत असल्याचे हे एक गंभीर संकेत आहेत. कारण येथे मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक दिग्गज कंपनीला राहणं असह्य वाटतं आहे. पाकिस्तानमध्ये असा काय बदल झाला? ज्यामुळे जागतिक कंपन्या देश सोडून जाण्याचा विचार करत आहेत हे विचारण्याची वेळ आता आली आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे.