सॅमसंगचा ए २७ हा स्मार्टफोन याच आश्वासक धोरणांनिशी बाजारात दाखल झाला आहे. सक्षम सॉफ्टवेअर, सुसज्ज ऑपरेटिंग सिस्टीम, दर्जेदार कॅमेरे यांसह मध्यम किंमत श्रेणीतील हा स्मार्टफोन ग्राहकांना दीर्घकाळ चांगल्या मोबाइलचा अनुभव देणारा ठरणार आहे.

स्मार्टफोनच्या बाजारात मोबाइल निर्मात्या कंपन्या नेहमीच प्रचलित ट्रेंडचा पाठलाग करताना दिसतात. एखाद्या नव्या स्मार्टफोनमधील नवीन फीचर ग्राहकप्रिय झाले की, त्या वैशिष्ट्याच्या अवतीभवती अन्य कंपन्यांच्या नव्या मोबाइलचे तंत्रज्ञान घुटमळताना दिसते. बहुतेकदा असे बदल निव्वळ दृश्य किंवा वरवरचे असतात. त्यामुळे ग्राहकांना ते पसंत पडत असले तरी, एकूण मोबाइल तंत्रज्ञानातील बदलांच्या दृष्टिकोनातून ते प्रभावी ठरत नाही. अशा उथळ बदलांचा आधार घेऊन मोबाइल निर्मिती करण्यापेक्षा आहे त्या तंत्रज्ञानात ग्राहकांना अधिक उपयुक्त स्मार्टफोन कसे देता येतील, याचा विचार करणे आश्वासक ठरते. सॅमसंगचा ए २७ हा स्मार्टफोन याच आश्वासक धोरणांनिशी बाजारात दाखल झाला आहे. सक्षम सॉफ्टवेअर, सुसज्ज ऑपरेटिंग सिस्टीम, दर्जेदार कॅमेरे यांसह मध्यम किंमत श्रेणीतील हा स्मार्टफोन ग्राहकांना दीर्घकाळ चांगल्या मोबाइलचा अनुभव देणारा ठरणार आहे.

‘गॅलक्सी’ या जोडनावासह सॅमसंगचे स्मार्टफोन गेली जवळपास १८ वर्षे बाजारात आहेत. या मालिकेत सॅमसंगने प्रीमियम श्रेणीत ‘एस’, फोल्डेबल श्रेणीत ‘झेड’ आणि परवडणाऱ्या तसेच मध्यम किंमत श्रेणीत ‘ए’, ‘एफ’, ‘एम’ या आद्याक्षरांसह असंख्य स्मार्टफोन आतापर्यंत दाखल केले आहेत. या पंक्तीत आता गॅलक्सी ए २७ या नवीन फोनचा प्रवेश झाला आहे. या फोनची किंमत २८,९९९ रुपयांपासून सुरू होत असून मध्यम किंमत श्रेणीतील हा एक चांगला पर्याय आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत या फोनमध्ये आमूलाग्र बदल नसले तरी सहा वर्षांचा अपडेट आणि सिक्युरिटी सपोर्ट असल्यामुळे एकच मोबाइल अनेक वर्षे वापरणाऱ्यांसाठी हा भरवशाचा गॅजेट ठरू शकतो.

डिस्प्ले आणि रचना

गॅलक्सी ए २७मध्ये ६.७ इंचांचा सुपर अमोल्ड डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेशिंग रेट १२० हार्ट्झ इतका आहे. या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस प्लसचे संरक्षण असल्यामुळे फोनला मजबुती मिळते. साधारणपणे मध्यम किंमत श्रेणीतील बहुसंख्य स्मार्टफोनमध्ये इतक्याच आकाराचा आणि हाय रिझोल्युशनचा डिस्प्ले पुरवण्यात येतो. मात्र, ए २७मध्ये रंगसंगती अधिक उठावदार आणि आकर्षक दिसते. दिवसाच्या प्रखर उजेडातही स्मार्टफोनचा डिस्प्ले आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतो.

स्मार्टफोनचा पार्श्वभागही काचेचा असून कड मात्र प्लास्टिकने बनलेली आहे. फोनचा आकार ६.३९ इंच इतका असला तरी जाडीने तो बारीक असल्याने हातामध्ये घेऊन वावरताना तो ‘बल्की’ किंवा जड वाटत नाही. एका हाताने हाताळतानाही या फोनमध्ये अडचणी येत नाहीत.

कार्यप्रणाली आणि क्षमता

गॅलक्सी ए २७मध्ये स्नॅपड्रॅगनच्या सहाव्या जनरेशनच्या चिप बसवण्यात आल्या असून याचा सीपीयू ऑक्टाकोअर आहे. यात गूगलची अँड्रॉइड १६ ऑपरेटिंग सिस्टीम पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टीमचे सहा अपडेट ग्राहकांना विनाशुल्क पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे दीर्घकाळ चालणारा हा फोन अद्ययावत राहण्यास मदत होणार आहे. हा मोबाइल प्राथमिकपणे सहा जीबी रॅम आणि १२८ जीबीची स्टोअरेज क्षमतेत उपलब्ध आहे. मात्र, ग्राहकांना आपल्या गरजेनुसार आठ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेजचा पर्यायही निवडता येईल. या यंत्रणेला सॅमसंगच्या ‘यूजर इंटरफेस’ची जोड देण्यात आली आहे. कार्यक्षमतेच्या पातळीवर हा फोन जलद आणि कार्यक्षम ठरतो. गेम खेळताना ईमेल हाताळणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना फोनचा वेग कमी झाल्याचे जाणवत नाही. सॅमसंग गॅलक्सी ए २७मध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ती दिवसभर पूर्ण क्षमतेने काम करते.

कॅमेरा आणि ‘एआय’

गॅलक्सी ए २७मध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून पाच मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड तसेच दोन मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. त्यामुळे फोर के रेकॉर्डिंग, ११५ अंशांपर्यंत व्यापक दृश्य टिपण्याची क्षमता याला लाभली आहे. कॅमेऱ्यातून चित्रीकरण अतिशय स्थिर येते. त्यामुळे चालत्या वाहनातून फोटो किंवा व्हिडीओ शूट करताना अडचणी येत नाहीत. पुढील बाजूस १२ मेगापिक्सेलचा एचडीआर कॅमेरा देण्यात आला असून तो चांगल्या सेल्फी काढून देण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडतो. कॅमेऱ्याच्या सॉफ्टवेअरमध्ये एआयप्रेरित फोटो एडिटिंग साधने देण्यात आली असून एका टचवर ‘ऑटो एडिट’ करण्याची सुविधाही आहे. या मोबाइलमध्ये कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या वैशिष्ट्यांचा अतिशय योग्य वापर करण्यात आला आहे. त्यात गूगलमार्फत छायाचित्रावरून शोध घेणे, व्हॉइस रेकॉर्डिंगचा २२ भाषांत अनुवाद करणे अशा सुविधांचा समावेश आहे.