Is It Better to Charge Your Phone to 100% or 80%: आजकाल स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फोनचा वापर सुरूच असतो, त्यामुळे फोनची बॅटरी जास्त काळ चांगली रहावी यासाठी अनेकजण वेगवेगळे पर्याय अवलंबतात. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला एक नियम म्हणजे फोन कधीही १०० टक्के चार्ज करू नका, फक्त ८० टक्क्यांपर्यंतच चार्ज करा.
अनेकजण हा नियम इतका गांभीर्याने पाळतात की, फोन ८० टक्के चार्ज होताच चार्जर काढून टाकतात. त्यांना असं वाटतं की त्यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढेल आणि फोन अनेक वर्षे उत्तम चालेल. पण, हा नियम खरंच प्रत्येकासाठी योग्य आहे का? की हा फक्त अर्धवट समज आहे? याचं उत्तर जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ८० टक्के चार्जिंगच्या नियमामागे काही प्रमाणात वैज्ञानिक कारण आहे. कारण स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटऱ्यांवर सतत पूर्ण चार्जिंगचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, म्हणूनच काही लोक हा नियम पाळण्याचा सल्ला देतात.
मात्र, याचा अर्थ असा अजिबात नाही की फोन कधीच १०० टक्के चार्ज करू नये. अनेकजण हा नियम चुकीच्या पद्धतीने समजून घेतात, त्यामुळे ते फोनची पूर्ण क्षमता वापरतच नाहीत.
उदाहरणार्थ, तुमच्या फोनमध्ये ५०००mAh क्षमतेची बॅटरी असेल आणि तुम्ही नेहमीच ती फक्त ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करत असाल तर प्रत्यक्षात तुम्ही सुमारे ४०००mAh इतकीच क्षमता वापरत आहात. म्हणजेच फोनमध्ये उपलब्ध असलेल्या बॅटरीचा काही भाग तुम्ही स्वतःहून वापरत नाही.
याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणतीही लिथियम-आयन बॅटरी कालांतराने नैसर्गिकरीत्या झिजत जाते. चार्जिंग आणि वापराच्या प्रत्येक चक्रात तिच्या रासायनिक प्रक्रियेत बदल होत राहतात, त्यामुळे कालांतराने बॅटरीची कार्यक्षमता कमी होणं हे पूर्णपणे सामान्य आहे. केवळ ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केल्याने ही झीज पूर्णपणे थांबत नाही.
तज्ज्ञ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात. जर तुम्ही कायमच फोन मर्यादित चार्ज करत राहिलात, तर काही वेळा बॅटरीची टक्केवारी दाखवणारी प्रणाली आणि सॉफ्टवेअर कॅलिब्रेशन यावरही परिणाम होऊ शकतो; त्यामुळे फोनची बॅटरी किती शिल्लक आहे याचा अंदाज नेहमी अचूक राहीलच असं नाही.
मग नेमकं करायचं काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.
याचं उत्तर तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, रोजच्या वापरात फोन ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करणं काही परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतं. मात्र, फोन कधीही १०० टक्के चार्ज करू नये हा समज योग्य नाही. उलट वेळोवेळी फोन १०० टक्क्यांपर्यंत चार्ज करणं आवश्यक असतं, त्यामुळे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम योग्य प्रकारे कार्यरत राहते आणि बॅटरीची क्षमता मोजणारी प्रणालीही अचूक राहण्यास मदत होते.
म्हणूनच निष्कर्ष एकच… फोनची बॅटरी जपणं महत्त्वाचं आहे, पण १०० टक्के चार्जिंग पूर्णपणे टाळणं हा सर्वोत्तम उपाय नाही. गरजेनुसार फोन वापरा, वेळोवेळी १०० टक्के चार्जही करा आणि अनावश्यक गैरसमजांवर विश्वास ठेवू नका.
