ऑफिसचे काम असो किंवा मनोरंजन यासाठी लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याला कुठेही नेता येत असल्याने त्यावरून काम करणे सोयीचे ठरते. मात्र त्यातील प्रगत तंत्रज्ञानामुळे त्याची किंमत अधिक असते. त्यामुळे अनेकांना तो परवडत नाही. मात्र, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी एक स्वस्त लॅपटॉप आणणार आहे. या लॅपटॉपची किंमत १५ हजार असणार आहे, अशी माहिती दोन सुत्रांनी रॉयटर्सला दिली आहे.

रिलायन्स जिओ लवकरच एक स्वस्त ४ जी लॅपटॉप भारतात लाँच करेल. या लॅपटॉपची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि त्यात ४ जी सीम असेल. कंपनी स्वस्त जिओ फोनच्या धर्तीवर हा लॅपटॉप ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे. या लॅपटॉपचे नाव जिओ बूक असेल.

(५ जीचाही वेग ओलांडणार ‘ही’ कंपनी, १०० जीबीपीएस ब्रॉडबँड स्पीड देण्याची योजना)

लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जिओने क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांशी भागिदारी केली आहे. क्वालकॉम कंपनी जिओच्या लॅपटॉपसाठी आर्म लिमिटेडच्या तंत्रज्ञानाने निर्मित चिपसेट देणार आहे, तर लॅपटॉपमधील काही अ‍ॅप्स हे मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने चालतील.

आधी शाळांना मिळणार लॅपटॉप

रिलायन्स जिओचे भारतात ४२ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. मात्र त्यांनी या लॅपटॉपबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लॅपटॉप आधी शाळा आणि सरकारी संस्थांसाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यानंतर इतरांसाठी हा लॅपटॉप उपलब्ध होणार आहे, अशी सुत्रांची माहिती आहे.

(5G in iphone : तुमच्या आयफोनमध्ये ५ जी आहे का? अ‍ॅपल यूजरना कोणत्या शहरात ५ जी सेवा मिळणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे)

जिओ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार लॅपटॉप

जिओबूकचे उत्पादन भारतातच फ्लेक्स कंपनीद्वारे होणार आहे. तसेच हा लॅपटॉप जिओच्या स्वत:च्या जिओ ओएस या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणार आहे. जिओ स्टोअरवरून या लॉपटॉपसाठी अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार आहे. जिओ कार्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी टॅबलेटचा पर्याय म्हणून हा लॅपटॉप उपलब्ध करणार आहे.