आपला प्रिय स्मार्टफोन हा ‘खराब’ झाला तर आपण त्याच काय करता? अर्थात रिसायकलिंग करता की स्वत: जवळ ठेवताय? हा प्रश्न विचारला तर अनेकांची उत्तरं स्मार्टफोन आम्ही स्वत:जवळच ठेवतोय अशी आहेत. मात्र, सावधान! हा खराब स्मार्टफोनचा मोह आपला जीव धोक्यात घालू शकतो, असं वेस्ट इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट (WEEE)  च्या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आलायं.

डब्ल्यूईईई ही इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या प्रतिबंधावर काम करणारी संस्था आहे. या संस्थेने अहवालात सांगितले की, आजच्या डिजिटल जगात सतत नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. स्मार्टफोनचे जलद अपग्रेड हवामान आणि निसर्गासाठी एक मोठा धोका बनला आहे. यावर्षी भारताच्या लोकसंख्येच्या चौपट लोकसंख्येतील स्मार्ट फोन ई-कचरा बनतील. म्हणजेच, जगभरात सुमारे ५.३ अब्ज फोन फेकले जातील. यामुळे पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम कसा होऊ शकतो हे पुढील आकडेवारीवरून स्पष्ट करता येईल.

आणखी वाचा : नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक: टाळण्यासाठी करा ‘या’ पद्धतीचा वापर; गृह मंत्रालयाने दिल्या महत्त्वपूर्ण टिप्स

भारतात ई-कचऱ्याचा भडीमार

ई-कचरा निर्मितीच्या बाबतीत भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात दरवर्षी सुमारे एक दशलक्ष इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होतो, ज्यामध्ये सर्वात मोठी संख्या संगणकीय कचऱ्याची असते. या कचऱ्यात ७० टक्के जड धातू आढळतात, त्यात शिशाचे प्रमाणही जास्त असते. भयावह बाब म्हणजे, भारतात एवढा ई-कचरा असतानाही केवळ १० टक्के इलेक्ट्रॉनिक कचरा जमा होतो. जगभरात १६ अब्जाहून अधिक मोबाईल फोन वापरात आहेत, जे जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास तिप्पट आहे. यापैकी जवळपास एक तृतीयांश फोन वापरले जात नाहीत. पुढील सात ते आठ वर्षांमध्ये, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा ७४ दशलक्ष टन दराने वाढेल. या ई-कचऱ्यामध्ये स्मार्टफोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील कचऱ्याचा समावेश आहे. म्हणूनच की काय, हा कचऱ्याचा भडीमार भारतासाठी डोकेदुखी ठरतो आहे.

स्मार्टफोनचे ‘हे’ घटक आरोग्यासाठी घातक

डब्ल्यूईईईच्या मते, पर्यावरणीय दृष्टीकोणातून जुन्या फोनचा गैरवापर अतिशय धोकादायक असून मानवी आरोग्यासाठी घातक आहे. अशा परिस्थितीत, या फोनच्या मौल्यवान वस्तूंचा पुनर्वापर करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, आपला स्मार्टफोन आपल्याला प्रिय वाटतो, त्यामुळे तो फोन खराब झाला तरी कचऱ्यात टाकत नाही. याच कारणामुळे ई-कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खराब स्मार्टफोनमध्ये ६० पेक्षा जास्त धातू असू शकतात. आयफोनच्या पार्ट्समध्ये सोने, चांदी आणि पॅलेडियमसारखे मौल्यवान धातू देखील असतात, याबाबत लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव आहे. परिणामी, स्मार्टफोन पासून होणारे धोके किवा हानी याबाबतच वापरकर्त्याचं अज्ञान हे सुध्दा ई-कचऱ्याचं कारण असू शकतं. खराब स्मार्टफोनचे हे घटक मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.