Twitter Blue: मागच्या काही महिन्यांपासून ट्विटर हे सोशल मीडिया अॅप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. इलॉन मस्क यांच्याकडे या कंपनीची मालकी गेल्यापासून ट्विटरबद्दल ठराविक दिवसांनी नवीन अपडेट्स येत असतात. ट्विटरमध्ये ब्लू टिक हे महत्त्वपूर्ण फिचर आहे. ब्लू टिकची लोकप्रियता वाढल्यानंतर कंपनीने सर्वांसाठी ब्लू टिकच्या सब्सक्रिप्शनची नवी सुविधा सुरु करणार आहे. यामुळे ठराविक रक्कम भरुन तुम्ही अकाऊंटवर ब्लू टिक जोडू शकता. ही सेवा आयओएस, अँड्रॉइड आणि वेब यांमध्ये उपलब्ध असणार आहे.
ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन प्लॅन्स:
जर तुम्हाला महिन्याभरासाठी मोबाईलफोनवर ब्लू टिक हवं असेल, तर त्यासाठी 900 रुपये भरावे लागतील. तर एका महिन्यासाठी ही सुविधा वेबवर वापरायची असल्यास 650 रुपये कंपनीला द्यावे लागतील. कंपनीने भारतामध्ये ट्विटरने वेबवरील ब्लू टिकच्या वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅननुसार वर्षभराचं सब्सक्रिप्शन घेतल्यास तुमच्याकडून एकूण 6,800 रुपये (महिन्याला 566 रुपये) आकारले जातील.
ट्विटर ब्लूचे फायदे कोणते?
- ट्वीट एडीट करणे. ट्वीट अन्डू करणे.
- दीर्घ आणि चांगल्या गुणवत्तेचे व्हिडीओ पोस्ट करणे.
- फोफाइल फोटो, थिम्स, नॅव्हिगेशन ऑप्शन्स यांमधील नवीन अपडेट्स वापर.
- रॅंकिंग करणे.
- कस्टम अॅप आयकॉन सेट करणे.
- हवे तेवढे बुकमार्क्स आणि बुकमार्क फोल्डरची सुविधा.
याशिवाय ट्विटर ब्लू वापरकर्त्यांना इतरांपेक्षा निम्म्या जाहिराती दिसतात.
ट्विटर ब्लूचे सब्सक्रिप्शन घेण्यासाठी काय करावे?
मोबाईल फोनवर वापरण्यासाठी –
- सर्वप्रथम मोबाईलवर ट्विटर अॅप सुरु करा.
- स्क्रीनच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यावर जा आणि प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर त्या जागी ‘Twitter Blue’ दिसेल. त्यावर क्लिक करा.
- यामुळे तुम्ही सब्सक्रिप्शन टॅबवर जाल. या टॅबवर सदस्यतेबाबत माहिती पाहायला मिळेल.
वेबवर वापरण्यासाठी –
- वेबवर ट्विटर सुरु करा.
- स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला ‘Twitter Blue’ पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर सब्सक्रिप्शन टॅब दिसेल.
- त्यावर गेल्यावर तुम्ही सब्सक्रिप्शन विकत घेऊ शकता.
जर ट्विटर अकाऊंट तीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंद असेल, तुम्ही त्याचा वापर करत नसाल, तर ट्विटर ब्लूची सेवा तुम्हाला उपभोगता येणार नाही.