जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून कंपनीच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहेत. अशात अलीकडेच ट्विटरने सर्व संस्थांना व्हेरिफिकेशनची सुविधा सुरु केली आहे. यामुळे जर एखाद्या कंपनीला आपल्या ट्विटर अकाउंटवर ब्लू टिक पाहिजे असेल तर पैसे भरावे लागणार आहेत. पण आता असे सांगितले जात आहे की, काही कंपन्यांना व्हेरिफिकेशन आणि चेकमार्क टिकवून ठेवण्याच्या विशेषाधिकारासाठी ट्विटरला प्रति महिना १००० डॉलर भरावे लागणार नाही.
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, ट्विटर ५०० जाहिरातीदारांना फ्रीमध्ये पास देणार आहे. यामध्ये अशा कंपन्यांचा समावेश असेल जे फॉलोवर्सच्या संख्येनुसार, आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक खर्च करतात. यासह १००० टॉप संस्थांना देखील ही सुविधा मिळेल.
बिझनेस सब्सक्रिप्शन सेवा
अनेक महिन्यांच्या चाचणीनंतर, ट्विटरने त्याच्या सब्सक्रिप्शन सेवेच्या बिझनेस लेवल – संस्थांसाठी ट्विटर व्हेरिफिकेशन सेवा सुरु केली आहे. जर या संस्था किंवा कंपन्यांनी ट्विटरचे ब्लू टिक सबक्रिप्शन घेत नाही तर त्यांचे अकाउंट चेकमार्कमधून हटवले जाईल. परंतु, काही संस्था अशा असू शकतात ज्यांना सबक्रिप्शन शुल्कावर १०० टक्के सूट मिळू शकते, ज्यामुळे अशा कंपन्या आता मोफत गोल्ड चेकमार्क अर्थात गोल्ड टिकसाठी पात्र ठरतील.
व्हेरिफाइड संस्थांनी ट्विटरवर स्वत:ला वेगळे असल्याचे दाखवण्यासाठी संस्था आणि त्यांच्या भागीदारांसाठी हा एक नवीन मार्ग आहे. ‘गोल्ड चेकमार्क’ संस्थांसाठी दरमहा १००० डॉलर (रु. 82,300) च्या मोठ्या किमतीत येतो, ज्याची किंमत पर्सनल युजर्ससाठी ८ डॉलर इतकी आहे.
भरावे लागणार नाहीत पैसे
एखादी संस्था व्यवसाय किंवा ना-नफा या तत्वावर काम करत असेल तर तिला गोल्ड चेकमार्क आणि स्वावयर अवतार मिळेल. दुसरीकडे जर ती सरकारी किंवा बहुपक्षीय संस्था असेल, तर तिला ग्रे चेकमार्क आणि गोलाकार अवतार दिला जाईल. चेकमार्क व्यतिरिक्त, या संस्थांना प्रीमियम सपोर्ट आणि Twitter Blue द्वारे प्रदान केलेल्या सर्व सुविधांमध्ये प्रवेश करण्यासह अतिरिक्त फायदे मिळतील, ज्यामध्ये मोठे ट्विट्स एडिट आणि पोस्ट करण्याची क्षमता समाविष्ट आहे.
काही संस्था आणि ब्रँडकडे आधीपासूनच गोल्ड चेकमार्क आहे. जे अजूनही निळ्या चेकमार्कमध्ये अडकले आहेत ते लीगसी व्हेरिफिकेशन प्रोग्राम संपल्यामुळे लवकरच ती टिकही गमावतील.