New Physics Law On Contactless Friction: घषर्ण होण्यासाठी दोन वस्तूंचा संपर्क होणे आवश्यक आहे, असे भौतिकशास्त्रातील नियम सांगतो. पण, या नियमाला छेद देणारा नवा शोध कॉन्स्टान्झ विद्यापीठातील संशोधकांनी लावला आहे. प्रत्यक्ष स्पर्श न होताही घर्षण होऊ शकते आणि ते नेहमी वजनानुसार वाढत नाही, असा महत्वाचा शोध लावण्यात आला आहे. थोडक्यात घर्षण होण्यासाठी दोन गोष्टी एकमेकांना घासण्याची गरज नाही, असे नव्या शोधातून आढळून आले आहे.
काय आहे नवा शोध?
सायन्स डेलीनी याबाबत दिलेल्या सविस्तर संशोधनानुसार, संशोधकांनी यासाठी चुंबकीय शक्तीचा वापर केला. संशोधकांनी चुंबकाच्या दोन थरांचा वापर करत, वरच्या थरातील चुंबक फिरण्यासाठी मोकळे ठेवले, तर खालचे चुंबक स्थिर होते. हे दोन थर एकमेकांना स्पर्श करणार नाहीत अशा पद्धतीने ठेवण्यात आले. जेव्हा हे दोन्ही चुंबक एकमेकांवरून हलतात, तेव्हा त्यांच्यातील चुंबकीय आकर्षामुळे वरचे चुंबक आपली दिशा बदलते. या बदलामुळे ऊर्जा खर्च होऊन घर्षण निर्माण होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
घर्षणाचे संशोधकांनी काय कारण सांगितले?
या ठिकाणी घर्षण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही थरांमधील चुंबकीय रचनेत होणारा संघर्ष असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. जेव्हा चुंबकाचे दोन्ही थर एका विशिष्ट अंतरावर येतात, तेव्हा त्यांच्यातील चुंबकीय अलाईनमेंट बदलण्यासाठी जास्त ऊर्जा लागते, ज्यामुळे घर्षणाचा एक ‘पीक’ (उच्चांक) तयार होतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
जुना नियम काय सांगतो?
दोन वस्तू एकमेकांना घासल्या की घर्षण निर्माण होते. वजन जास्त असेल तर घर्षणही जास्त असते, यालाच ‘आमोंटन्सचा नियम’ (Amontons’ Law) म्हणतात. परंतु, कॉन्स्टान्झ विद्यापीठाच्या संशोधकांनी, प्रत्यक्ष स्पर्श न होताही घर्षण होऊ शकते आणि ते नेहमी वजनानुसार वाढत नाही, असा शोध लावला आहे. जुन्या नियमाप्रमाणे, अंतर कमी केल्यावर (म्हणजे भार वाढवल्यावर) घर्षण सतत वाढायला हवे होते. पण या प्रयोगात तसे झाले नाही.
नव्या संशोधनाचा काय फायदा होणार?
प्रत्यक्ष स्पर्श नसल्यामुळे यंत्रांचे भाग घासले जात नाहीत किंवा त्यांची झिज होणार असा एक महत्वाचा निष्कर्ष यातून समोर आला आहे. तसेच, चुंबकीय शक्तीचा वापर करून आपण स्पर्श न करता घर्षण नियंत्रित करू शकतो, असा दुसरा महत्वाचा निष्कर्ष निघाला आहे. भविष्याता याचा वापर नॅनो-मशिन्स, चुंबकीय बेअरिंग्ज आणि कंपन रोखणाऱ्या यंत्रणांमध्ये केला जाऊ शकतो, असे या संशोधनात म्हटले आहे.
