लवकरच व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सना नवीन फिचर्स देणार आहे. या फिचर्समुळे युजर्स आता ग्रुप व्हॉईस कॉलवर अधिक लोकांना जोडू शकतील आणि मोठ्या फाईल्स दुसर्‍या व्हॉट्सअ‍ॅप युजर्संना सहजतेने पाठवू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपने गुरुवारी जाहीर केले की, ३२ लोकांना ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये सहभागी होण्याची आणि दोन जीबीपर्यंतच्या फाइल्स शेअर करण्याची परवानगी देईल. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपने आणखी अनेक नवीन फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. सध्या मोबाईल अ‍ॅप वापरून ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये फक्त आठ लोकांना जोडता येते. तसेच युजर्स एक जीबीपेक्षा जास्त फाइल इतर कोणत्याही युजर्सला शेअर करू शकत नव्हते.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट ग्रुपच्या अ‍ॅडमिनला कधीही मेसेज डिलीट करण्याची परवानगी देईल. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, डिलीट केलेले चॅट ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला दिसणार नाही. मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुप्समध्ये फीडबॅक, मोठ्या फाइल शेअरिंग आणि मोठ्या ग्रुप कॉलसह नवीन वैशिष्ट्ये देत आहोत.” मात्र, व्हॉट्सअॅपमध्ये हे नवीन फिचर्स कधी जोडले जातील याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात २ अब्जाहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. एका अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपचे जगात सर्वाधिक युजर्स भारतात आहेत. ज्यांची संख्या सुमारे ४८.७ कोटी आहे.

दुसरीकडे मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो सेवा चालविणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने गुरुवारी व्हॉट्सअॅपवर ‘ई-तिकीट’ सुविधा सुरू केली. MMOPL ने सांगितले की, मुंबई मेट्रो वन मेसेजिंग अॅप हे व्हॉट्सअ‍ॅपवर ई-तिकीट ऑफर करणारे जगातील पहिले एमआरटीएस (मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टम) आहे. याद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे ई-तिकीट मिळू शकते. याशिवाय प्रवाशांसाठी ‘पेपर क्यूआर तिकिटे’ही उपलब्ध असतील.