व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वाधिक संवाद साधला जात आहे. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या अडचणी लक्षात घेता पेमेंट फिचर सुर केलं. मात्र त्यावर काही बंधनं असल्याने ही फिचर्स वापरण्याऱ्यांची संख्या कमी होती. आता व्हॉट्सअ‍ॅपला भारतातील पेमेंट सेवेसाठी युजर्सची संख्या दुप्पट करण्यासाठी नियामक मान्यता मिळाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील पेमेंट सेवेच्या युजर्सवर कोणतीही मर्यादा नसावी अशी विनंती केली होती, त्यानंतर कंपनीला यूजर बेस दुप्पट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या आठवड्यात कंपनीला युजर्स वाढवण्याची परवानगी आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा २ कोटी वापरकर्त्यांपुरती मर्यादित आहे. व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकच्या मालकीचे आहे, ज्याने अलीकडेच त्याचे नाव बदलून मेटा केले आहे. तथापि, नवीन मर्यादा अजूनही कंपनीच्या वाढीच्या शक्यतांना अडथळा आणेल. कारण व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेंजर सेवेचे भारतात ५० कोटीहून अधिक वापरकर्ते आहेत. त्यामुळे कंपनीसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नवीन युजर कॅप कधी लागू होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्तापर्यंत, व्हाट्सअ‍ॅपने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

Qlan: ऑनलाइन गेमर्ससाठी मिळणार नवा प्लॅटफॉर्म; भारतीय स्टार्टअप सोशल नेटवर्कसाठी सज्ज

भारतीय डिजिटल बाजारपेठेत, व्हॉट्सअ‍ॅपची स्पर्धा अल्फाबेट इंकच्या गुगल पे, सॉफ्टबँक आणि एन्ट ग्रुपच्या पेटीएम आणि वॉलमार्टच्या फोनपेशी आहे. एनपीसीआयने गेल्या वर्षी व्हॉट्सऍपला त्यांची पेमेंट सेवा सुरू करण्यास मान्यता दिली होती. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने डेटा स्टोरेज नियमांसह केंद्राच्या नियमांचे पालन करण्यासाठी अनेक वर्षे काम केलं. नियमांनुसार, पेमेंट-संबंधित डेटा स्थानिक पातळीवर संग्रहित करणे आवश्यक आहे.