Who is Alexandr Wang: सध्या सर्वत्र कुत्रिम बुद्धिमत्तेची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चर्चा आहे. सर्वच टेक कंपन्या एआयच्या अनुषंगाने आपल्या मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करत आहेत. मोठ्या टेक कंपन्यांमध्ये एआय इंजिनिअर्सची पळवापळवी करण्याचाही प्रयत्न झाला. यातच मार्क झकरबर्गच्या मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. २८ वर्षीय अलेक्झांडर वांगची नियुक्ती करत मेटाने त्याच्याहाती सुपरइंटेलिजेंस लॅब्सचे नेतृत्व दिले आहे. यासाठी मेटाने तब्बल १४.३ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. अलीकडच्या काळातील एआय मधील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

कॉलेज अर्धवट सोडून एआयमध्ये काम

वांगचा जन्म न्यू मेक्सिकोमध्ये झाला. त्याचे पालक चीनमधून अमेरिकेत आले होते. अलेक्झांडर वांगला लहानपणापासूनच गणित आणि संगणक शास्त्राची आवड होती. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) प्रवेश घेतल्यानंतर त्याने २०१६ साली स्केल एआयची स्थापना केली होती. ही कंपनी लाँच करण्यासाठी वांगने शिक्षण अर्धवट सोडले होते.

अल्पावधीतच स्केल एआयने मोठ्या एआय डेव्हलपर्स कंपन्यांशी भागीदारी करण्यात यश मिळवले. NVIDIA, ॲमेझॉन आणि मेटा अशा मोठ्या कंपन्या त्याच्य क्लाइंट आहेत. २०२४ मध्ये म्हणजे स्थापनेनंतर आठ वर्षात कंपनीचे मूल्य १४ अब्ज डॉलर्सवर पोहोचले. यामुळे एआय क्षेत्रातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश म्हणून वांगची ओळख निर्माण झाली.

जून २०२५ मध्ये, मेटाने जाहीर केले की, अलेक्झांडर वांग त्यांच्या नव्याने स्थापन केलेल्या सुपरइंटेलिजन्स लॅब्सचे नेतृत्व करेल. हा विभाग मेटाच्या सर्व एआय संशोधन, पायाभूत सुविधा आणि उत्पादन विकास यांच्यासाठी तयार करण्यात आला आहे. जबाबदारी घेतल्यानंतर वांगने वेळ न दवडता आपल्या सहकाऱ्यांसाठी एक मेमो लिहिला होता. ज्यात त्याने म्हटले, सुपरइंटेलिजन्स येत आहे, सर्वांनी याला गांभीर्याने घ्यावे. आपल्या संशोधन, उत्पादन आणि इन्फ्रास्ट्रक्चर या अनुषंगाने आपल्याला एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ही घटना महत्त्वाची का आहे?

मेटाने स्केल एआयमध्ये केलेली १४.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ही फक्त एखादी कंपनी ताब्यात घेण्यापुरती नाही. अतिशय शक्तीशाली असे एआय मॉड्युल्स तयार करण्यासाठी स्केल एआय मेटाला मदत करू शकते. स्केल एआयचे कौशल्य वापरून मेटाचे मनुष्यबळ विकसित केले जाऊ शकते. ओपन एआय, गुगल डीपमाइंड सारखे स्पर्धक एआयमध्ये क्रांती करत असताना मेटा आणि वांगची भागीदारी या स्पर्धेत त्यांना आणखी पुढे घेऊन जाऊ शकते.