AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्या जातील अशी चर्चा कायमच होत असते. मंदी येणार का? असे प्रश्न कायमच विचारले जातात. AI आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करेल? बदलतं तंत्रज्ञान कसं आत्मसात करायचं याबाबत लेखक आणि तंत्रज्ञ अच्युत गोडबोले यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अच्युत गोडबोले?
आत्तापर्यंत चारवेळा औद्योगिक क्रांती झाली. वाफेचं इंजिन आलं, इतर शोध लागले. टेक्स्टाईल मिल्स आल्या, त्यावेळी लोकांना वाटलं यंत्रांमुळे आपली नोकरी जाणार. त्यावेळी लोकांनी चक्क यंत्रं फोडली. पण नंतर लक्षात आलं की नोकरीच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. त्यावेळी लक्षात आलं की लोक खेड्यांमधून शहरांकडे येऊ लागले, शहरं वसायला लागली. औद्योगिक क्रांतीची ती सुरुवात होती. जेवढ्या नोकऱ्या गेल्या तेवढ्या निर्माण झाल्या. त्यानंतर ल्युडाईड्स चळवळ ही आपोआप थंड झाली.
औद्योगिकीकरणाची दुसरी पायरी १९२० च्या दरम्यान
औद्योगिकीकरणाची २.० ही पायरी १९१० च्या किंवा २० च्या सुमारास आली तेव्हा विजेचा वापर सुरु झाला होता. त्यावेळी सातत्याने होणारं उत्पादन सुरु झालं. विजेची उपकरणं आली, फॅक्टरी निघाल्या. पुन्हा लोकांना वाटलं की नोकऱ्या जाणार का? पण त्यावेळीही तेच घडलं जेवढ्या नोकऱ्या गेल्या तेवढ्या संधी निर्माणही झाल्या. १९६० मध्ये इंडस्ट्री ३.० आलं. त्यावेळी संगणक आले आणि चीप्स आले. मिनी कम्प्युटर ते इंटरनेट असे अनेक टप्पे या दशकांमध्ये आले. आरपारच्या पॉडकास्टला अच्युत गोडबोलेंनी मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीतच त्यांनी हे भाष्य केलं आहे.
इंडस्ट्रीत २०१३ मध्ये AI आलं आहे -गोडबोले
२०१३ मध्ये इंडस्ट्री ४ ची घोषणा झाली. संगणक आल्यावर लोकांना खूप भीती वाटली होती की आता त्यामुळे आता नोकऱ्या जाणार. संगणकाला प्रचंड विरोध झाला होता. संगणकाचे काय परिणाम होतील हे अनेकांना माहीत नव्हतं. कारखाने आणि ऑफिसेस याच्यावर अनेक पुस्तकं आली. जेरेमी रिफकीनच्या पुस्तकाने बराच धुमाकूळ त्या काळात घातला होता. त्यानंतर जेरेमीने त्याची भूमिका बदलली. २०१३ मध्ये AI ही सर्वात प्रामुख्याने टेक्नॉलॉजी आली. ब्लॉक चेन, क्लाऊड कम्प्युटिंग अशा आठ तंत्रज्ञान पद्धती आल्या. अनेक लोक AI बाबत हीच चर्चा करतात की त्यामुळे नोकऱ्या जातील का? शिवाय काहीजण असंही म्हणतात की नोकऱ्या जेवढ्या जातील तेवढ्या मिळतीलही. पण मला असं वाटत नाही.

AI मुळे २० टक्के नोकऱ्या जातील, ज्यांची संधी पुन्हा निर्माण होणार नाही-गोडबोले
AI हा प्राणी इंडस्ट्रीतला वेगळा प्राणी आहे. आता यामध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे की एआय मुळे नोकऱ्या गेल्या तरीही पुन्हा मिळतील. एका वर्गाचं म्हणणं आहेत की ६५ टक्के नोकऱ्या जातील. काहींचं म्हणणं आहे ६७ टक्के नोकऱ्या जातील. मला असं वाटत नाही मला वाटतं की २० टक्के नोकऱ्या जातील. त्या संधी निर्माण होणार नाहीत असं मला वाटतं. असं अच्युत गोडबोलेंनी सांगितलं. एआयचा बबलही आहे. ओपन एआय, गुगल, क्लाऊड ही सगळी मंडळी यांचा वेग प्रचंड आहे. अनेकदा याबाबत हाईपही दिली जाते. एआयचा बबल वाढेल आणि तो फुटेलही असंही काहींचं मत आहे. हा बबल फुटला तरीही अमेरिका आणि भारताच्या शेअर मार्केटवर होणार आहे. एआय हा सोडून देण्याचा विषय नाही.

श्रीमंत आणि गरीब वर्गाबाबत काय म्हणाले गोडबोल?
काम करताना निर्मितीचा आनंद मिळत असेल, कल्पकतेचा आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे असंही अच्युत गोडबोले यांनी म्हटलं आहे. अर्थसाखळी सुरु ठेवायची असेल तर रोजगार हवेतच. रोजगार हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. प्रोगेस अँड पॉवर नावाचं एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मागच्या ४० वर्षात तंत्रज्ञानात जी प्रगती झाली तेव्हापासून श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी प्रचंड वाढली. उत्पादकता वाढली, पण सामान्य माणसाची पर्चेसिंग पॉवर त्या प्रमाणात वाढली नाही. सामान्यांचं उत्पन्न हे बऱ्यापैकी तसं आहे. ४० वर्षात तंत्रज्ञान जितकं प्रगत झालं तेवढ्या प्रमाणात सामान्य नोकरदाराचा पगार वाढला नाही. AI मुळे प्रचंड फायदे होणार आहेत हे जरी खरं असलं तरीही त्याचे अनेक तोटेही आहेत. एक तोटा हा सर्व्हिलिन्सचा आहे. आपण काय करतो, काय खातो सगळं माहीत होतं. आपल्या सवयी, राजकीय विचार हे सगळं एआयला माहीत आहे असं अच्युत गोडबोलेंनी म्हटलं आहे.
