मोबाइलचा दर्जा, माहितीची सुरक्षा, सेवा अशा विविध पातळय़ांवर आपला ठसा उमटविणाऱ्या अ‍ॅपल या कंपनीचा बहुचर्चित अ‍ॅपल ६ आणि अ‍ॅपल ६प्लस याचबरोबर आयवॉचचे मंगळवारी अनावरण करण्यात आले. अ‍ॅपलच्या या उत्पादनांमुळे स्मार्टफोन अधिक स्मार्ट झाला आहे तर आयवॉचमुळे आपल्या जीवनशैलीवर ‘वॉच’ राहणार आहे. स्टीव्ह जॉब्ज यांच्या निधनानंतर प्रथमच अ‍ॅपलने त्यांचा सहभाग नसलेली उत्पादने बाजारात आणली यामुळे या उत्पादनांबाबत तंत्रप्रेमी खूपच उत्सुक आहेत.
अ‍ॅपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांच्या निधनानंतर अ‍ॅपल या कंपनीचे काय होणार, इथपासून चर्चा सुरू झाल्या होत्या. या चिंतातूरांना कंपनीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी आपल्या कामातून उत्तर दिले. जॉब्ज यांच्या निधनानंतर अ‍ॅपलने काही उपकरणे बाजारात आणली पण त्यातील आयपॅड मिनी वगळता इतर सर्व उपकरणांच्या जडणघडणीत जॉब्ज यांचा सहभाग होताच. मंगळवारी अनावरण झालेल्या उपकरणांच्या जडणघडणीत मात्र जॉब्ज यांचा सहभाग नव्हता.
यामुळे ‘अ‍ॅपलच्या इतिहासात या नव्या पाठाचा समावेश’ झाल्याची भावना कूक यांनी अनावरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केली. जॉब्ज यांनी पहिला मॅक आणि आयमॅकचे अनावरण ज्या महाविद्यालयाच्या सभागृहात केले होते त्याच सभागृहात या नवीन उपकरणांचे अनावरण झाले. या अनावरणाबाबत जगभरातील अ‍ॅपलप्रेमी खूप उत्सुक होते. अ‍ॅपलच्या संकेतस्थळावर लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी अनेकांनी संकेतस्थळावर लॉगइन केले होते. तर अमेरिकेतील अ‍ॅपलप्रेमींनी अ‍ॅपल स्टोअर्सच्या बाहेर गर्दी केली होती. आयफोन ६ आणि ६प्लस तसेच आयवॉचमध्ये नेमके काय आहे हे पाहूया..
आयफोन ६ आणि ६प्लस
डिस्प्ले – आयफोन ६ ची स्क्रीन ४.७ इंचांची तर ६प्लसची स्क्रीन ५.५ इंचांची आहे. ही स्क्रीन रेटीना एचडीची आहे. आयफोन ६ प्लसला १९२० बाय १०८० पिक्सेल रिझोल्यूशनची स्क्रीन आहे तर आयफोन ६ला १३३४ बाय ७५० पिक्सेल रिझोल्यूशनची स्क्रीन देण्यात आली आहे.
जलद प्रोसेसर – दोन्ही आयफोनमध्ये ए८ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर फोनच्या सामान्य वापरासाठी २५ टक्के जलद काम करू शकतो तर ग्राफिक्स वापरासाठी ५० टक्के जलद काम करू शकतो. या दोन्ही फोनमध्ये दोन जीबी रॅम आणि डय़ुएल कोर प्रासेसर देण्यात आला आहे.  
स्टोअरेज – हे दोन्ही फोन १६ जीबी, ६४ जीबी आणि १२८ जीबीमध्ये उपलब्ध आहेत. पण कंपनीने ३२ जीबीचे मॉडेल का आणले नाही, याबाबत सर्वानाच प्रश्न पडला आहे.
कनेक्टिविटी – हे दोन्ही आयफोन व्हाईस ओव्हर एलटीईला पूरक आहेत. ही सुविधा वापरण्यासाठी फोर जी किंवा त्या दर्जाची वायफाय जोडणी आवश्यक असते. पण भारतात अद्याप फोर जी पूर्णत: सुरू झालेले नाही. यामुळे भारतीयांना सध्यातरी या सुविधेचा पूर्ण फायदा घेता येऊ शकणार नाही.
बॅटरी लाइफ – आयफोन ६ ला थ्रीजीचा वापर करून १४ तास बोलता येईल, एवढय़ा क्षमतेची तर ६ प्लसला २४ तास बोलता येईल, एवढय़ा क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. आयफोन ५एसला ही क्षमता १० तासांची होती.
कॅमेरा – या दोन्ही फोनला आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन ६ ला डिजिटल तर ६ प्लसला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन आहे. फ्रंट कॅमेराच्याबाबतीत दोन्ही फोनमध्ये विशेष काळजी घेण्यात आली असून सेल्फिसाठी फेस रिकगनेशन क्षमता अधिक चांगली करण्यात आली आहे.
मेटल – कन्सोलच्या मदतीने खेळले जाणारे गेम्स फोनमध्येही खेळता यावेत यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये सीपीयू आणि जीपीयू दोन्ही एकत्रित काम करून गेम्समधील ग्राफिक्स अधिक चांगल्या प्रकारे दिसतील यासाठी मदत करीत असते.
आयओएस ८ – या दोन्ही फोनमध्ये आयओएस ८ वापरण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी वेगवेगळय़ा सुविधाही दिल्या आहेत. याशिवाय यामध्ये हेल्थ किट अ‍ॅप देण्यात आले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांला आरोग्याची माहिती मिळणार आहे.
अ‍ॅपल पे – या दोन्ही फोनमध्ये अ‍ॅपल पेची सुविधा आहे. या माध्यमातून मोबाइल वॉलेट सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. आपण वापरत असलेल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डाची माहिती यामध्ये स्टोअर केल्यानंतर दुकानात फोन स्वाइप केला तरी तुम्ही पैसे चुकते करू शकता. यासाठी यामध्ये एनएफसी चिपचा वापर करण्यात आला असून अ‍ॅपलने अमेक्स, व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकेतील सहा बँकांशी सहकार्य करार केलेला आहे. ही सुविधा खूप सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा आहे.
आय’वॉच’
अँड्रॉइड वॉचनंतर अ‍ॅपलने आपल्या घडय़ाळाचे अनावरण केले आहे. पण हे घडय़ाळ ग्राहकांच्या मनगटावर येण्यासाठी नव्या वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. हे घडय़ाळ म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्यावर ‘वॉच’ ठेवणारे आहे. म्हणजे यामध्ये देण्यात आलेल्या सुविधांमुळे आपल्या आरोग्यावर करडी नजर राहतेच याशिवाय आपली अनेक कामे हे घडय़ाळ करू शकणार आहे. अ‍ॅपल वॉच, अ‍ॅपल स्पोर्ट्स वॉच आणि वॉच एडिशन अशा तीन प्रकारात स्मार्ट घडय़ाळाचे अनावरण करण्यात आले आहे. वॉच एडिशनमध्ये १८ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा प्रकार भारतात सर्वाधिक चालेल, असा विश्वास कंपनीला आहे. हे सोनेरी मुलाम्याचे घडय़ाळ ३८ एमएम आणि ४२ एमएम आकारात उपलब्ध आहे. स्पोर्ट्स ब्रँडमध्ये सहा विविध प्रकारची घडय़ाळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
*डय़ाळाला रेटिना डिस्प्ले आहे. यामध्ये ‘फोर्स टच’चा पर्याय आहे. यामुळे टॅप आणि प्रेस यामधील फरक समजणार आहे. घडय़ाळात एखादे अ‍ॅप सुरु करायचे असेल तर आपण ते टॅप करायचे आणि त्या अ‍ॅपवर नियंत्रण करावयाचे असेल तर आपण ते प्रेस करून ठेवू शकतो.
*यामध्ये अ‍ॅपलने एस१ चिपचा वापर केला आहे. याशिवाय घडय़ाळाला वायफाय ८०२.११ आणि ब्ल्युटूथ ४.० ची सुविधा देण्यात आली आहे. ब्ल्यूटूथच्या साह्याने हे घडय़ाळ आपण आयफोनशी जोडू शकतो.
*घडय़ाळय़ामध्ये सिरिची सुविधाही देण्यात आली आहे.
*यात टॅप्टिक इंजिन आणि बिल्ट इन स्पीकर आहे. यातील टॅप्टिक इंजिन हे मजेशीर असून ते संदेश आल्यावर घडय़ाळधारकाला मनगटावर थापटल्यासारखी जाणीव करून देणार आहे.  
*यातील स्क्रोल प्रणाली ही डिजिटल क्राऊन तंत्राच्या साहय़ाने कार्यान्वित आहे.
*यामध्ये आरोग्य, फिटनेस, कॉल्स, मेसेजिंग, स्टॉक्स, ई-मेल्स, वर्ल्ड क्लॉक, अलार्म, टाइमर, स्टॉपवॉच, म्युझिक, अ‍ॅपल टीव्ही, आय टय़ून असे अ‍ॅप्स देण्यात आले आहेत.
*यामध्येही अ‍ॅपल पेचा पर्याय देण्यात आला आहे.
*घडय़ाळय़ाच्या माध्यामातून अ‍ॅपलचा टीव्ही तसेच आयफोनच्या कॅमेराचेही नियंत्रण करता येऊ शकते.
*यातील डिजिटल टचच्या माध्यमातून स्केच, जेंटल टॅप करता येतेच. याशिवाय वॉकी टॉकीच्या माध्यमातून ऑडिओ मेसेजही पाठविता येऊ शकतो. इतकेच नव्हे तर तुमच्या ओळखीच्या अ‍ॅपल वॉच वापरकर्त्यांला तुमच्या हृदयाचे ठोकेही या माध्यमातून ऐकवता येऊ शकतील.
*आरोग्याच्या दृष्टीने यामध्ये अ‍ॅक्टिविटी अ‍ॅप आणि वर्कआऊट अ‍ॅप देण्यात आले आहेत. या माध्यमातून तुमच्या किती कॅलरीज बर्न होतात, किती व्यायाम केला आदी माहिती सातत्याने मिळत राहते.
*घडय़ाळय़ात हृदयाचे ठोके मोजण्याच्या दृष्टीने एक सेन्सर देण्यात आले आहे. याचबरोबर जीपीएसची सुविधाही देण्यात आली आहे.
*याला ‘वायरलेस चार्जिग’ची सुविधा पुरविण्यात आली आहे.
*या घडय़ाळाची कर वगळता भारतातील किंमत २१ हजार असणार आहे.