मोबाइलमध्ये फ्रंट कॅमेरा आला आणि त्याचा वापर विविध कामांसाठी होऊ लागला. अगदी मेकअप करण्यापासून ते स्वत:चा फोटो काढून तो पोस्ट करणे अशा विविध कामांसाठी या कॅमेराचा वापर होत होता. यातूनच सेल्फीचा उदय झाला. सध्या या सेल्फीबाबत तरुणाईला वेड लागलं आहे. आपला स्वत:चा फोटो काढून तो मोबाइलवर अपलोड करायचा हे तरुणाईचं नित्याचं काम बनलं आहे. सन २०१३ मध्ये ऑक्स्फोर्डच्या शब्दकोषातही सेल्फी या शब्दाला स्थान मिळाले होते. यामुळेच मोबाइल कंपन्यांनी सेल्फीसाठी काही अ‍ॅप्स बाजारात आणले आहेत. या अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

    ब्राइट कॅमेरा
 सेल्फीसाठी खास तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅपमध्ये आपल्याला फोटोंना विविध इफेक्ट्स देता येतात. इतकेच नव्हे तर ते फिल्टरही करता येतात. यामध्ये देण्यात आलेल्या विविध शेड्समध्ये आपण आपला चेहरा बसवू शकतो. एकदा आपल्याला आवडेल तो इफेक्ट फोटोवर मिळाला की आपल्याला तो फोटो व्हॉट्स अ‍ॅपसह फेसबुकवरही एकाच वेळी पोस्ट करता येऊ शकतो. यामध्ये आपल्याला अँटी शेक कॅमेरा मोड देण्यात आला आहे. यामध्ये आपल्या आपण डिजिटल इमेज स्टॅबिलायझरही वापरू शकतो, यामुळे आपण फ्रंट कॅमेरानेही चांगले फोटो काढू शकतो.
कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

    ’सेल्फी कॅम
  या अ‍ॅपमध्ये सेल्फी कॅमबाबत खूप चांगल्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. यातील वैशिष्टय़े म्हणजे यामध्ये आपल्याला फेस रिकगनायझेशन तंत्राचा वापर करता येणार आहे. याशिवाय यामध्ये आपण राइट मुव्हमेंट हा पर्याय सेट करून योग्य क्षणी आपला फोटो टिपू शकतो. राइट मुव्हमेंटमध्ये आपण हास्याचा क्षण सेट केला तर आपण हसताच क्षणी आपला फोटो टिपला जातो. याशिवाय यातील स्टिकर्स किंवा फ्रेम्स अशा विविध पर्यायांचा वापर करून आपण आपले फोटो सजवूही शकतो.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप आयओएसवर उपलब्ध आहे.

    ’सेल्फी स्टुडिओ
 बहुतांश सेल्फी अ‍ॅपमध्ये फोटोसाठी आपल्या फोनमध्ये देण्यात आलेल्या लाइट्सच्या पर्यायांचाच वापर केला जातो. पण या अ‍ॅपमध्ये आपण आपल्याला पाहिजे त्या रंगाचा लाइट निवडता येतो. याशिवाय या अ‍ॅपमध्येही फ्रेम्स आणि स्टिकर्ससह इतर सेल्फीसाठी आवश्यक असे पर्याय देण्यात आले आहेत.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

    ’ड्युएल कॅम
 हे अ‍ॅप आपल्याला नावाप्रमाणेच काम करत असून या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण सेल्फीसाठी फोटो काढला तर फ्रंट कॅमेरा आणि रेअर कॅमेरा या दोन्हीमधून इमेज कॅप्चर केली जाते. यानंतर दोन्ही फोटो मर्ज होऊन एक वेगळीच इमेज तयार होते. यामुळे आपण एखाद्या चांगल्या लोकेशनवर अगदी सहजपणे फोटो काढून तो फोटो अपलोड करू शकतो.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

    ’फ्रंटबॅक
 ड्युएल कॅम या अ‍ॅपप्रमाणेच हे अ‍ॅपही काम करते. यामध्ये ड्युएल कॅमपेक्षा काही सुविधा जास्त देण्यात आला आहे. यामध्ये आपल्या फोटोसोबत आपले ठिकाण, हॅशटॅग करता येते. हे सर्व करून आपण तो फोटो फेसबुक किंवा व्हॉटसअ‍ॅपवर शेअर करू शकतो. याचबरोबर फ्रंटबॅक कम्युनिटीवरही शेअर करू शकतो.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप आयओएसवर उपलब्ध आहे.

    ’कँडी कॅमेरा
 कँडी कॅमेरामध्ये आपल्याला सर्वाधिक म्हणजे ३० हून अधिक फिल्टर्स देण्यात आले आहेत. यात काही रिअल टाइम फिल्टर्सचाही समावेश आहे. याशिवाय यामध्ये मेकअपचाही पर्याय देण्यात आला आहे. शिवाय विविध फ्रेम्सच्या साहाय्याने फोटोला वेगवेगळे इफेक्ट्स देता येऊ शकतात.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

परफेक्ट ३६५
हे अ‍ॅप इतर सेल्फी अ‍ॅपप्रमाणेच काम करत असून यामध्ये आपण सेल्फ पोर्टरेट वापरू शकतो. याच्या साहाय्याने आपण आपल्या त्वचेवरील डाग काढू शकतो. इतकेच नव्हे तर यामध्ये आपण आपल्या चेहऱ्याला मेकअपही करू शकतो. यामध्ये विविध प्रकारच्या हेअर स्टाइलचेही पर्यायही देण्यात आले आहे. हे सर्व बदल आपण एका टॅपवर करू शकतो.  
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.

ओटाकू कॅमेरा
    या अ‍ॅपमध्ये नेहमीच्या अ‍ॅपसारख्या मेगा इंप्रेशन फ्रेम्स, स्टिकर्स आणि इफेक्ट्स देण्यात आले आहेत. मात्र याही पलीकडे जाऊन या अ‍ॅपमध्ये फोटो स्केचमध्ये कन्व्हर्ट करण्याचाही पर्याय आहे. याशिवाय यामध्ये तुमचा चेहरा इतर डाऊनलोडेबल चित्रांमधील एखाद्या चित्रालाही जोडता
    येऊ शकतो.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.

स्केचिफाय
    या अ‍ॅपमध्ये आपल्याला आपल्या किंवा आपल्या मित्रांच्या फोटोंशी वेगवेगळ्या प्रकारच्या गमती करू शकतो आणि हे फोटो आपण आपल्या मित्र परिवारात फिरवू शकतो. यामध्ये चेहऱ्याला मिशी लावण्यापासून ते विविध
    आकाराचे चेहरे करता  येऊ
    शकतात.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप आयओएसवर उपलब्ध आहे.

 स्केच गुरू
    स्केच गुरू या अ‍ॅपमध्ये इतके सारे फिल्टर्स देण्यात आले आहे की ज्यामुळे आपण काढलेला फोटो एखाद्या स्केचसारखा दिसू शकतो. यामध्ये आपण विविध इफेक्ट्सचा वापर करून स्केचमधील बारकावे अधिक बारकाईने स्क्रीनवर दाखवू शकतो.
    कुठे उपलब्ध – हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे.