बाजारात अँड्रॉइड फोनबरोबरच विंडोज फोनचा बोलबाला आता सुरू झाला आहे. यामुळे देशी कंपन्यांनी परवडणाऱ्या दरात विंडोज फोन बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सेलकॉन या कंपनीने त्यांचा पहिला विंडोज फोन बाजारात आणला असून तो परवडणाऱ्या दरात आहे. या फोनमध्ये विंडोजची ८.१ ही ऑपरेटिंग प्रणाली वापरण्यात आली असून फोनला चार इंचाचा स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन २०० प्रोसेसर १.२ गीगाहार्टझ् क्वाडकोर सीपीयूसह देण्यात आला आहे. यामध्ये चार जीबी रॉम आणि ५१२ जीबी रॅम देण्यात आले आहे. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा १.३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन थ्रीजीसाठी उपयुक्त आहे. यामध्ये चार जीबीची अंतर्गत मेमरी असून ती आपण ३२ जीबीनी वाढवू शकतो. याचबरोबर फोनसोबत १५ जीबीची क्लाऊड स्टोअरेज सुविधा मोफत देण्यात आली आहे. यामुळे आपण विंडोजच्या कोणत्याही उपकरणावरून क्लाऊड स्टोअरेजमध्ये साठवलेली माहिती मिळवू शकतो. हा मोबाइल सर्व ई-कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध असून याची किंमत ४९७९ रुपये आहे.
एका कुटुंबाला एकच बिल
मोबाइल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल नेटवर्कची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. देशात सर्वाधिक मोबाइल ग्राहक असलेल्या भारती एअरटेल या कंपनीने ‘माय प्लॅन फॅमिली’ बाजारात आणले आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाच जणांच्या कुटुंबाचे एकच बिल येणार आहे. तसेच यामध्ये जोडले गेलेल सदस्य एकमेकांचे प्लॅन्स शेअरही करू शकणार आहेत. मायप्लॅनमुळे ३० टक्क्यांपर्यंत बिल कमी होऊ शकते असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. आजमितीस घरात प्रत्येकाकडे एक स्वतंत्र मोबाइल असतो. पण त्याला सेवा पुरविणाऱ्या कंपन्या वेगवेगळय़ा असतात. यामुळे एकाच कुटुंबातील लोकांना एकाच कंपनीची सेवा घेतल्यास ती फायदेशीर होऊ शकते यातून हा प्लॅन तयार झाल्याची माहिती एअरटेलचे हब सीईओ अशोक गणपती यांनी स्पष्ट केले. या प्लॅनमध्ये कुटुंबातील कोणताही एक क्रमांक हा प्राथमिक क्रमांक म्हणून निवडावा लागतो. यानंतर याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध प्लॅन्समध्ये माय पॅकचे युनिट्स देण्यात आले आहे. ग्राहक त्याच्या पसंतीने पॅक्सची निवड करू शकतो. यानंतर प्रत्येक सदस्यासाठी ९९ रुपये दरमाह भरून प्लॅन्स शेअर करता येऊ शकतात. या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार प्लॅन्स निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. हे प्लॅन्स ७९९, ९९९, १५९९ इतक्या रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये अनुक्रमे ३५,५० आणि ९० पॅक्स देण्यात आले आहेत. या प्लॅनमुळे पोस्टपेड ग्राहकांच्या संख्येत गेल्या वर्षभरात ५.३ टक्के वाढ झाल्याचे गणपती यांनी स्पष्ट केले.
मुंबईत थ्रीजीमध्ये आणखी स्पर्धा
मुंबईत थ्रीजी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच कंपन्या कसोशीने प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेमुळे थ्रीजीचे दर खूप कमीही झाले आहेत. आता यामध्ये एअरसेल या कंपनीने उडी घेतली असून त्यांची थ्रीजी सेवा मुंबईत सुरू झाली आहे. आकर्षक प्रीपेड पॅकेजेस्मुळे या कंपनीची सेवा देशभरातील विविध भागांमध्ये यापूर्वीपासूनच लोकप्रिय आहे. पण आता मुंबईत थ्रीजी सेवा उपलब्ध करून दिल्याने ग्राहक संख्या वाढण्याची अपेक्षा असल्याचे मुंबई, महाराष्ट्र आणि राजस्थान मोबाइल सेवा वर्तुळाचे विभागीय व्यवसाय प्रमुख हरीश शर्मा यांनी स्पष्ट केले. थ्रीजी सेवेसाठी एअरसेलने रिलायन्ससोबत सहकार्य केले असून ग्राहकांना चांगला वेग आणि बाजारातील स्पर्धकांच्या तुलनेत ३० ते ४० टक्के कमी किमतीत ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्र कॉलरचे नवे व्हर्जन
ट्र कॉलर या अ‍ॅपचे दहा कोटी वापरकर्ते झाले असून या अ‍ॅपने नुकतेच ५.० हे नवीन व्हर्जन बाजारात आणले आहे. या अ‍ॅपमध्ये दरमाह दीड अब्ज नंबर शोधले जातात अशी माहितीही अ‍ॅप कंपनीकडून देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये आपल्याला कोण फोन करत आहे आणि कोणत्या ठिकाणावरून करत आहे याची माहिती तातडीने उपलब्ध होणार आहे. आपल्या फोनबुकमधील संपर्कामध्ये त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांची माहितीही या अ‍ॅपच्या माध्यमातून
अ‍ॅड केली जाणार आहे. तसेच आपल्याला ट्र कॉलर फोनबुकचा डिस्प्ले पर्यायही असणार आहे. या फोनबुकमधील सुविधेमुळे आपण फोन किंवा लघुसंदेश अगदी सहज पाठवू शकतो. वापरकर्त्यांचा वेळ वाचविण्यासाठी ट्र कॉलर हे अ‍ॅप अधिक बुद्धिवान करण्याची ही पहिली पायरी असल्याचे ट्र कॉलरचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलन ममेदी यांनी
स्पष्ट केले.