मोबाइल घ्यायचा म्हटला की, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट, आयबॉल, मायक्रोमॅक्स अशा कंपन्यांची नावे आपल्या डोळय़ांसमोर प्रामुख्याने येतात; पण या कंपन्यांच्या तोडीस तोड असे अनेक मोबाइल भारतीय बाजारात उपलब्ध आहेत, तेही या कंपन्यांपेक्षा कमी किमतीमध्ये. या कंपन्यांमुळेच बडय़ा कंपन्यांना स्वस्त मोबाइल बाजारात आणावे लागले. पाहूयात असे काही मोबाइल जे पटकन आपल्या डोळय़ासमोर येणार नाहीत; पण खरोखरील स्वस्त आणि स्मार्ट आहेत.

सेलकॉन मिलेनिया इपिक क्यू ५५०
1सेलकॉन या कंपनीने अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. सध्या त्यांची स्मार्टफोनची मिलेनिया मालिका बाजारात येणे सुरू आहे. याच मालिकेतील इपिक क्यू ५५० नुकताच भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. या फोनची जाडी केवळ आठ मिमीची आहे. यामुळे हा हातात घेणे अगदी सोपे जाते. स्मार्टफोन म्हटले, की बॅटरी लवकर संपणार हे एक समीकरणच बनले आहे; पण यावर मात करत सेलकॉनने आपल्या नवीन मोबाइलमध्ये तब्बल ३५०० एमएएचची क्षमता असेलेली बॅटरी दिली आहे. ही बॅटरी स्टॅण्डबाय मोडमध्ये तीन दिवस राहू शकते. याची स्क्रीन ५.५ इंचांची असून एचडी आयपीएस-ओजीएस डिस्प्ले यामध्ये देण्यात आला आहे. यात अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम असून क्वाड कोर १.३ गीगीहार्टझचा कोरटेक्स ए७ प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये एक जीबी रॅम आणि १६ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीने वाढवू शकतो. यात आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून दोन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत – १०,४९९ रुपये.

टी-सीरीज एसएस९०९
3गाण्याच्या कॅसेट असतील किंवा डीव्हीडी असतील, टी-सीरीज हे नाव आपल्याला आवर्जून दिसायचे. हेच नाव आता आपल्याला मोबाइलमध्येही दिसणार आहे. या कंपनीअंतर्गत एक मोबाइल कंपनी स्थापन करण्यात आली असून या कंपनीने आपला पहिला मोबाइल भारतीय बाजारात दाखल केला आहे. एसएस९०९ असे या मोबाइलचे नाव असून या फोनची जाडीही अगदी कमी आहे. यामध्ये अँड्रॉइडचे ४.४ हे किटकॅट व्हर्जन उपलब्ध आहे. यामध्ये १.३ गीगाहार्टझचा क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे, तर फोनला ५१२ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनचा डिस्प्ले ४.५ इंचाचा क्यूएचडी आहे. यामध्ये चार जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली असून ही मेमरी आपण एसडी कार्डच्या साह्य़ाने ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात मुख्य कॅमेरा आठ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. हा फोन सध्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवरच उपलब्ध आहे.
किंमत – ५,९९९ रुपये

अ‍ॅडकॉम ए४०
तंत्रज्ञान आणि टेलिकॉममध्ये काम करणाऱ्या या कंपनीने २०१० मध्ये आपला मोबाइल विभाग सुरू केला आणि मोबाइल, टॅबलेट्स आणि अ‍ॅक्सेसरीजमध्ये उत्पादनास सुरुवात केली. या कंपनीने स्मार्टफोन 4वापराच्या मूलभूत गरजा ओळखून ए४० हा फोन बाजारात आणला आहे. या फोनचा डिस्प्ले चार इंचांचा आहे. यामध्ये १.२ गीगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला असून रॅम २५६ एमबीची आहे. हा फोन डय़ुएल सिम असून थ्रीजी
जोडणी असलेला आहे. यात ५१२ एमबीची अंतर्गत मेमरी असून ती आपण मेमरी कार्डच्या मदतीने ६४ जीबीने वाढवू शकतो. याची बॅटरी १६५० एमएएच इतक्या क्षमतेची आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा १.३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.
किंमत – ४,५०० रुपये. बेस्ट बाय किंमत – २,९९९ रुपये.

स्पीड एस ५०
स्पीड या मोबाइल कंपनीने नुकताच स्पीड एस ५० हा मोबाइल भारतीय बाजारात दाखल केला आहे. या 5फोनमध्ये पाच इंचांची स्क्रीन देण्यात आली असून यात १.३ गीगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात अँड्रॉइड किटकॅट ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. फोनमध्ये एक जीबी रॅम आणि आठ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण ३२ जीबीने आणखी वाढवू शकतो. यामध्ये १७५० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून यात मुख्य कॅमेरा आठ मेगापिक्सेल, तर फ्रंट कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे.
किंमत – ७,९०० रुपये.

पॅनासॉनिक पी ५५
पॅनासॉनिक या इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेसमधील नामांकित ब्रँडचेही मोबाइल्स बाजारात आले आहेत. 2या कंपनीने आता फॅबलेच्या रूपाने टॅबलेटला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने नुकताच आपला पी ५५ हा फॅबलेट बाजारात आणला आहे. हा फॅबलेटमध्ये सामान्य स्मार्टफोनपेक्षा थोडा मोठा आणि टॅबलेटपेक्षा लहान असा असतो. पॅनासॉनिक कंपनीचा फॅबलेट ५.५ इंच स्क्रीनचा असून याची स्क्रीन एचडी आहे. यामध्ये १.२ गीगाहार्टझ प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉइड किटकॅट ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यात २५०० एमएचची बॅटरी देण्यात आली आहे. या उपकरणामध्ये प्रथमच टॅप प्ले हा पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे आपण जेव्हा उपकरण वापरत नसतो तेव्हा ते स्लीप मोडवर जाते. ते वेकअप करण्यासाठी अनलॉक करायची गरज असते; पण यामध्ये आपण केवळ दोनदा टॅप केल्यावर फोन वेकअप होतो आणि काम करण्यास सुरुवात करतो. तसेच यामध्ये पॉप-आय-प्लेअर देण्यात आला आहे. यामधून आपण मल्टिटास्किंग व्हिडीओज पाहू शकतो.
किंमत- १०,२९० रुपये.