लिनोवो ए२०१०

आता गतवर्षांबरोबर थ्रीजीही मागे पडते आहे आणि जमाना फोरजीचाच असणार आहे. २७ डिसेंबर रोजी, रविवारीच रिलायन्स जिओने त्याचा ओनामाही केला आहे. २०१६ हे नववर्षदेखील फोरजीच्याच चर्चेचे आणि अंमलबजावणीचे असणार आहे. मग आपल्याल्या हातात फोरजी मोबाईल नको का? असा प्रश्नही पडणे तेवढेच साहजिक आहे. पण बाजारपेठेत उपलब्ध असलेले चांगले फोरजी मोबाईल हे वीस हजारांच्या घरात आहेत. मग सामान्य माणसाने किंवा महाविद्यालयीन तरुणांनी काय करायचे? तर त्यांचा विचार करून काही कंपन्यांनी आता स्वस्तातील फोरजी मोबाईल बाजारपेठेत आणले आहेत, लिनोवो ए२०१० हा त्याचपैकीच एक!

किंमत केवळ रु. ४९९९/- म्हणजे पाच हजार रुपये हा त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग. याच किंमतीच्या आसपास जाणारा मोबाईल मायक्रोमॅक्सने कॅनव्हॉस स्पार्क या नावाने बाजारात आणला आहे. त्यामुळेच साहजिकच आहे की, त्याची तुलना स्पार्कसोबत होणार. तत्पूर्वी या मोबाईलची वैशिष्टय़े समजून घेणे महत्त्वाचे ठरावे. याचे स्क्रीन रिझोल्युशन ४८० ७ ८५४ असून त्याचा ४.५ इंचाचा टीएफटी स्क्रीन आहे. त्याचे वजन अवघे १३७ ग्रॅम्स एवढेच आहे. यामध्ये एक गिगाहर्टझ् क्षमतेचा क्वाडकोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तर अँड्रॉइड ५.१ लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. एक जीबी रॅमसोबत ८ जीबी इंटर्नल मेमरीची सोयही असून ती ३२ जीबी पर्यंत मेमरी कार्डद्वारे वाढविण्याची सोय देण्यात आली आहे. समोरच्या बाजूस दोन मेगापिक्सेल तर मागच्या बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यात एक फोरजी तर दुसरे टूजी अशी दोन सिम कार्डे वापरण्याची सोय आहे. तर याची बॅटरी क्षमता २००० एमएएच आहे.

रिव्ह्य़ू दरम्यान वापरताना लक्षात आले की, फोरजीचा डेटा लोड होताना थोडासा विलंब होतो. समोरच्या किंवा मागच्या बाजूस असलेला कॅमेरा स्वच्छ सूर्यप्रकाशात फोटो टिपताना अतिशय उत्तम पद्धतीने काम करतो मात्र कमी प्रकाशामध्ये समोरच्या बाजूस असलेल्या सेल्फी कॅमेऱ्याच्या चित्रणावर परिणाम होतो. तसाच परिणाम मागच्या बाजूस अधिक क्षमतेच्या असलेल्या कॅमेऱ्यावरही होतो पण तो तुलनेने कमी आहे. मोबाईलमधील आवाजाची प्रत चांगली आहे. मात्र हेडफोनमध्ये बड दिले असते, तर आवाज अधिक सुस्पष्ट ऐकता आला असता. सध्या असलेले हेडफोन वर्दळीच्या ठिकाणी फारसे उपयुक्त ठरत नाहीत. आवाज वाढविल्याशिवाय त्यावर व्यवस्थित ऐकणे थोडे मुश्कील ठरते. स्क्रीनचे रिझोल्युशन तुलनेने कमी असले तरी पाहताना, वाचताना अडचण येत नाही. शिवाय स्क्रीन गार्ड लावलेला मोबाईलच खरेदी करताना थेट आपल्या हाती येतो. सर्व फोरजी ब्रॅण्डस्च्या सेवा या मोबाईलमध्ये वापरल्या जाऊ शकतात. या कॅमेऱ्याला मागच्या बाजूस एलइडी फ्लॅश देण्यात आला आहे. या किंमतीमध्ये उपलब्ध होणाऱ्या फारच कमी उपकरणांमध्ये अशी एलइडी फ्लॅशची सोय देण्यात येते. अनेक मोबाईल्समध्ये अलीकडे बॅटरी खूप गरम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशी कोणतीही तक्रार या मोबाईलमध्ये रिव्ह्य़ूदरम्यान आढळली नाही.

यामध्ये देण्यात आलेले दुसरे सिम कार्ड हे टूजीचे वापरावे लागते, ही यातील त्रुटी आहे. यात देण्यात आलेली मल्टीटच सुविधा केवळ ‘टू पॉइंट’चीच आहे. आवाजाच्या सुस्पष्टतेसाठी बडस् आवश्यक ठरतात. बॅटरी चार्ज होताना मात्र काहीसा विलंब होतो, असे लक्षात आले.

फोरजीच्या स्वस्तातील फोनमध्ये यापेक्षा फार वेगळी अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. प्रामुख्याने सर्वाधिक वापरली जाणारी सुविधा म्हणजे कॅमेरा आणि आवाज. या दोन्हीमध्ये हा फोन थोडे आणखी मिळाले असते तर उत्तम असे वाटावे, असा आहे. स्वस्तातील फोन तोही फोरजी हवा, असा आग्रह असेल तर लिनोवोच्या या ए२०१०ला पसंती दिली जाऊ शकते. याला रेटिंगमध्ये पाच पैकी तीन तारांकित दर्जा दिला जाऊ शकतो.