ओप्पो या चिनी मोबाइल ब्रँडने भारतीय बाजारात आपले मोबाइल नुकतेच आणले आहेत. मेड इन चायना म्हणजे चालला तर चालला अशी आपली मानसिकता आहे. पण चीनमधील या नामांकित कंपनीचे फोन्स या मानसिकतेला छेद देऊ शकतात. ओप्पोने भारतात आणलेल्या ओप्पो जॉय या फोनविषयी जाणून घेऊयात.
डिझाइन
हा फोन दहा हजार रुपयांमध्ये बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या फोन्ससारखाच दिसतो. पण या फोनच्या बॉडीमध्ये बहुतांश ठिकाणी प्लास्टिकऐवजी मेटलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे तो अधिक चांगला दिसतो. याची फ्रेमपण मेटॅलिक आहे. यामुळे हा फोन अधिक दणकटही वाटतो. हा फोन उघडणे हे खूप जिकिरीचे आहे. यामुळे तुम्ही यामध्ये पटापट सिमकार्ड बदलणे किंवा बॅटरी काढून पुन्हा आत ठेवणे हे प्रकार वारंवार करू शकत नाहीत.
स्क्रीन
जॉय ज्या किमतीत उपलब्ध आहे, त्या किमतीतील फोनमध्ये या फोनची स्क्रीन ही खूप चांगली आहे. यातील पाहण्याचे कोन्स खूप चांगल्याप्रकारे देण्यात आले आहेत. याची स्क्रीन ही उन्हातही खूप चांगल्याप्रकारे आपल्याला मदत करते. भर उन्हातही आपण संदेश वाचणे किंवा नंबर शोधण्याचे काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.
फोन कसा चालतो
हा स्वस्तातील फोन असल्यामुळे तो कसा चालेल याच्या आपण किमान अपेक्षा ठेवणेच बरे. या फोनमध्ये १.३ गीगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे या फोनचा वेग खूप चांगला आहे. अर्थात याची तुलना आपण अगदी महागडय़ा फोनशी नाही करू शकत. कारण याची किंमत कमी असल्यामुळे साहजिकच आपल्याला यामध्ये कमी सुविधा मिळणार आहेत. पण या किमतीच्या फोन्समध्ये या फोनचा प्रोसेसर अधिक जलद देण्यात आलेला आहे. यामुळे फोन हँग होण्याचे प्रकार कमी होतात.
मेमरी
या फोनमध्ये चार जीबीची अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. यातील १.३ जीबी मेमरी आपल्याला वापरायला मिळू शकते. यामुळे या फोनमध्ये
किमान आठ जीबीचे कार्ड असावे जेणे करून तुम्ही तो चांगल्याप्रकारे वापरू शकता.
सॉफ्टवेअर
या फोनमध्ये अँड्रॉइडची ४.२ जेलीबीन आधारित कलर ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. अनेकांना कलर ओएस आवडत नाही. पण जी मंडळी पहिल्यांदाच स्मार्टफोन घेत आहेत. अशांना ही ओएस खूप उपयुक्त ठरू शकते.
कॅमेरा
या फोमध्ये तीन मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा देण्यात आला आहे.
हा कॅमेरा तीन मेगापिक्सेलचा असला तरी यातून काढलेले फोटो खूप
चांगले येतात. यात एक त्रुटी म्हणजे यामध्ये ऑटो फोकस उपलब्ध
नाहीय. यामुळे तुम्हाला प्रत्येक फोटो हा फोकस करून घ्यावा लागतो. यामध्ये तुम्ही व्हिडीओही शूट करू शकता. पण यासाठी तुम्हाला आधी स्टोअरेज क्षमता तपासून मगच शूटिंग करता येऊ शकते.
बॅटरी
या फोनची बॅटरी क्षमता ही इतर फोनच्या तुलनेत चांगली आहे. यामध्ये आपण दिवसभर इंटरनेटसह विविध गोष्टींचा वापर केला तरी फोन पूर्ण दिवस काम करू शकतो.
तांत्रिक माहिती
हा फोन चार इंचांचा असून यामध्ये एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचा प्रोसेसर हा १.३ गीगाहार्टझचा ड्युएल कोर आहे. रॅम ५१२ एमबी असून अंतर्गत मेमरी चार जीबी आहे. यामध्ये ३२ जीबीपर्यंतचे मेमरी कार्ड आपण वापरू शकतो. ३.१ मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. यात ड्युएल सिम असून याला एक मायक्रो सिम लागते. थ्रीजी, वायफाय, ब्लुटूथ या कनेक्टिविटी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत.

थोडक्यात
ओप्पो या कंपनीने स्वस्तात मस्त फोन तयार करण्याचा प्रयत्न केला असला तरी या फोनची स्पर्धा मोटो ई या फोनशी होऊ शकते. मोटो ई हा फोन यापेक्षा खूप जास्त काही एक हजार रुपये कमी किमतीत देतो. पण याचा डिस्प्ले आणि कॅमेरा याची खासियत असल्यामुळे कॅमेराप्रेमी हा फोन वापरू शकतात.
किंमत – ८९९० रुपये.