08 December 2019

News Flash

संगणक खेळांडूंचे आकर्षण

हा हेडफोन नवख्या वापरकर्त्यांना आकर्षित करून घेणारा आहे

गेमिंग हेडफोन

पेन ड्राइव्हपासून ते गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या अमेरिकन किंगस्टन या कंपनीने हायपरएक्स क्लाऊड नावाने गेमिंग हेडफोनची मालिका बाजारात आणली आहे. या मालिकेतील क्लाऊड कोर हा हेडफोन नुकताच बाजारात आला आहे. या हेडफोनमध्ये नेमके काय आहे, तो कसा काम करतो हे पाहू या.
हा हेडफोन नवख्या वापरकर्त्यांना आकर्षित करून घेणारा आहे, कारण यातून येणारा आवाज हा खूपच आल्हाददायक आहे. यामध्ये २.० आवाजाच्या अनुभवासाठी खास ५३एमएम नीओडायमियम वापरण्यात आला आहे. या हेडफोनच्या डोक्याच्या बाजूला चामडय़ाचे कव्हर देण्यात आले आहे. यामुळे तो वापरण्यास सोयीस्कर ठरतो. आवाजासाठी देण्यात आलेल्या दोन्ही स्पीकर्सलाही छानपैकी चामडय़ात गुंडाळले आहे. यामुळे कानाला कोणत्याही प्रकारची अडचण वाटत नाही. याचबरोबर याचा माइक काढून ठेवता येणारा आहे. यामुळे आपल्याला काम नसेल तेव्हा माइकची अडचण आपल्याला जाणवत नाही. साध्या ३.५ एमएमच्या जॅकने हा हेडफोन आपल्या उपकरणाला जोडला जातो. यासोबत एक-दोन मीटरची अतिरिक्त वायर देण्यात आली आहे ज्याच्या जोडणीमुळे आपण आवाज ऐकणे व माइकवर बोलणे हे दोन्ही करू शकतो. याद्वारे येणाऱ्या आवाजाच्या लहरींचा प्रतिसाद हा १५ हार्टझ ते २५ किलो हार्टझच्या दरम्यान असतो.

स्पीकर
वर दिल्याप्रमाणे याचे स्पीकर विशेष तंत्रज्ञान वापरून विकसित करण्यात आले आहे. मात्र आवाजासोबतच वापरकर्त्यांचीही काळजी यामध्ये घेण्यात आल्याचे दिसून येते. बाजारात उपलब्ध असलेल्या स्पीकर्सच्या प्लास्टिकच्या आवरणामुळे अनेकदा ते वापरण्यायोग्य राहात नाहीत किंवा ते बराच वेळ वापरल्यास कान दुखण्याची शक्यता असते. मात्र हे स्पीकर चामडे व स्पंज यांच्या आवरणात बसविण्यात आले आहेत. यामुळे आपण कितीही वेळ वापरले तरी कान दुखण्याची शक्यता नसते. हे खास गेम्सासाठी विकसित करण्यात आल्यामुळे यामध्ये आवाजाचे बारकावे छान ऐकण्यास येतात. संगणकावर गेम खेळत असताना या हेडफोनच्या माध्यमातून आपल्याला बारीक आवाजही ऐकू येतो.

गाण्याचा अनुभव
हे स्पीकर लावल्यावर आपल्याला आजूबाजूचा कोणताही आवाज ऐकू येत नाही. यामध्ये आपले कान पूर्ण झाकोळले जातात. गेम खेळणारी व्यक्ती असो किंवा ज्यांना कुणाला डोके शांत करावयाचे असेल आणि गाणी ऐकायची असतील अशांनी जर हे हेडफोन वापरले तर नक्कीच त्यांना काही वेळापुरता तरी इतर सगळय़ाचा विसर पडू शकतो, कारण हेडफोनमधून गाणी ऐकताना आपण वारंवार ऐकलेल्या गाण्यातही एखादा कधीही न ऐकलेला ठेका ऐकू येतो. गाण्याच्या संगीताचा पुरेपूर अनुभव आपण या हेडफोनच्या माध्यमातून घेऊ शकतो. याची आणखी एक विशेष बाब म्हणजे गाण्याचा आवाज कितीही वाढविला तरी आवाज फाटत नाही किंवा ऐकण्यास असहय़ होत नाही.

इतर विशेष
हा हेडफोन संपूर्णत: अ‍ॅल्युमिनियमचा बनविण्यात आला आहे. यामुळे तो जास्त काळ टिकू शकतो. तसेच या हेडफोनची रचना पूर्णत: बदलता येणारी असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे वापरता येऊ शकतो. त्याचबरोबर तो स्वच्छ करणेही सोपे होतो. यात मायक्रोफोन देण्यात आला असून तो पूर्णत: वेगळा आहे, जेणेकरून आपल्याला गरज नसताना आपण तो बाजूला ठेवू शकतो. हा मायक्रोफोनही चांगल्या दर्जाचा असून बारीक आवाज तो टिपून ठेवू शकतो.

काही त्रुटी
हा हेडफोन जर कॉर्डलेस असता तर तो संगणक खेळाडू तसेच गाण्यांच्या चाहत्यांना अधिक सोयीस्कर वाटला असता. मात्र हा
हेडफोन वायर्ड असल्यामुळे तो वापरण्यासाठी आपल्याला सतत त्या उपकरणाजवळ असणे गरजेचे आहे. याचबरोबर यामध्ये हेडफोन अ‍ॅडजेस्टमेंट नसल्यामुळे मोठे डोके असलेल्यांना या हेडफोनमुळे काही वेळाने त्रास होऊ शकतो.
थोडक्यात
तुम्हाला जर मोठे हेडफोन हवे असतील आणि ते स्वस्त आणि मस्त पाहिजे असतील तर या हेडफोनला पर्याय ठरू शकत नाही. या हेडफोनच्या किमतीच्या तुलनेत
इतर हेडफोनमध्ये अनेक त्रुटी आढळून येतात.
किंमत – ३८०० रुपये.
niraj.pandit@expressindia.com

First Published on December 8, 2015 1:39 am

Web Title: cloud core gaming headphone launch by kingston in market
टॅग Kingston
Just Now!
X