देशातील किंवा देशांतर्गत प्रवासाला जातानाची बॅग भरण्यापूर्वी आपण वस्तूंची यादी करतो आणि त्या वस्तू घेतल्या आहेत की नाही हे आठवणीने पाहतोही. या यादीत कालांतराने मोबाइल, चार्जर याचाही समावेश झाला आहे. पण याही पलीकडे जाऊन आणखी असे काही गॅजेट्स आहेत जे आपल्या प्रवासात खूप उपयुक्त ठरू शकतील.

पॉवर बँक
ज्याप्रमाणे आपण उपयुक्त उपकरणांची यादी करतोय त्याप्रमाणेच ही उपकरणे प्रवासात चार्ज राहण्यासाठी पॉवर बँक घेण्यास अजिबात विसरू नका. बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये मोबाइल चार्जिगसाठी सॉकेट दिलेले असतात,  मात्र ते पुरेसे नसल्यामुळे आपला नंबर येईपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळेच जर तुम्ही पॉवर बँक सोबत ठेवली तर तुम्हाला तुमची उपकरणे बसल्या जागेवर चार्ज करणे शक्य होणार आहे. पॉवर बँकची खरेदी करत असताना जास्तीत जास्त एमएएचची बँक खरेदी करावी जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त उपकरणे चार्ज करणे शक्य होईल. मॉन्सटर या कंपनीने २० हजार एमएएचची क्षमता असलेली पॉवर बँक बाजारात आणली आहे.

वाय-फाय राऊटर
इंटरनेट ही सध्याच्या तरुणाईची गरज बनली आहे, पण रोमिंगमध्ये असताना नेटपॅक रिचार्ज करणे अनेकदा परवडतेच असे नाही. अनेक ठिकाणच्या हॉटेलमध्ये वायरनेटचा अ‍ॅक्सेस अनेकदा मोफत दिला जातो, पण वायफायसाठी दर आकारले जातात. यामुळे जर वायफाय वापरायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. यामुळे जर तुम्ही फिरते वाय-फाय राऊटर घेऊन गेलात तर तुम्ही हॉटेलमधील इंटरनेट जोडणीला राऊटर लावून तुमच्या खोलीपुरते वाय-फाय सुरू करून घेऊ शकता. यामध्ये नॅनो राऊटर्सही मिळतात. जे तुम्हाला प्रवासात घेऊन जाणे सोपे पडते. याच्या माध्यमातून तुम्हाला १५० एमबीपीएसपर्यंतचा वेग मिळू शकतो.

एक्स्टेंशन बोर्ड
आपण आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेलो तर प्रत्येकाकडे किमान एक मोबाइल असतो. अनेकदा हॉटेलच्या खोलीत प्लगसाठी एकच जोडणी असते. यामुळे जर तुम्ही चार जोडणी उपलब्ध असलेला एक्स्टेंशन बोर्ड नेला तर एका वेळी तुम्हाला चार उपकरणे चार्ज करणे शक्य होणार आहे. बाजारात ७० रुपयांपासून असे एक्स्टेंशन बोर्ड उपलब्ध आहेत. तसेच ते वाहून नेण्यासाठीही फार त्रास होत नाही. विशेषत: पाच ते सहा दिवसांच्या ट्रेकला जाणाऱ्यांसाठी याचा विशेष उपयोग होऊ शकतो.

ई-बुक रीडर
लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर प्रवासात वेळ घालवण्यासाठी तसे अनेक पर्याय असतात. यामध्ये पत्ते, अंताक्षरी खेळण्यापासून अनेक पर्यायांचा समावेश आहे. पण अनेकदा त्याचाही कंटाळा येतो. अशा वेळी पुस्तकांची मदत होऊ शकते. तुम्हाला बॅगमध्ये पुस्तके घेऊन जाणे अवघड होत असेल तर तुम्ही किंडलसारखे ई-बुक रीडर सोबत नेऊ शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके डाऊनलोड करून ठेवलीत की तुम्हाला पाहिजे तेव्हा पुस्तके वाचता येऊ शकतील. ई-बुक रीडरसाठी तुमच्याकडे किंडेलसोबतच आयपॅड तसेच स्मार्टफोनमधील ई-बुक अ‍ॅपचे पर्यायही उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनवर ई-बुक वाचू शकता.

मनोरंजनासाठी काही
जर तुम्हाला पुस्तके वाचूनही कंटाळा आला तर तुम्ही आयपॅड, एमपीथ्री प्लेअरसोबत घेतला तर गाणी ऐकू शकता. तसे पाहता मोबाइलमध्ये गाणी असतातच, पण प्रवासात असताना मोबाइलची बॅटरी कमीत कमी खर्च होणे योग्य असते. यामुळे या उपकरणांचा वापर करून तुम्ही गाणी ऐकू शकतात. इतकेच नव्हे तर तुम्हाला टीव्ही पाहायचा असेल तर अ‍ॅपल टीव्हीसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही टीव्हीही पाहू शकता. अ‍ॅपल टीव्ही हा केवळ आयओएसधारकांसाठीच मर्यादित आहे असे नाही तर प्ले स्टोअरवरही हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

युनिव्हर्सल अ‍ॅडप्टर
तुम्ही सतत प्रवास करत असाल आणि तुम्हाला लॅपटॉप किंवा टॅबलेट चार्च करायची गरज पडत असेल तर तुम्ही युनिव्हर्सल अ‍ॅडप्टर बाळगणे फायद्याचे ठरले. या अ‍ॅडप्टरमध्ये यूएसबी पोर्टही देण्यात आला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमची उपकरणे चार्ज करू शकता. याचबरोबर थ्री-पिन प्लगही देण्यात आला आहे. यामुळे ज्या उपकरणांना प्लग आहेत ती उपकरणेही तुम्ही चार्ज करू शकता. याप्रकारचा अगदी साधा अ‍ॅडप्टर ३०० रुपयांपासून उपलब्ध आहे.
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com