फेसबुकच्या मोबाईल अॅपमधील सध्याच्या नोटिफिकेशनमध्ये महत्वपूर्ण बदल होणार असून, लवकरच ते कार्ड स्वरुपात दिसणार आहे. एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा फेसबुकने केली. नोटिफिकेशनची ही नवीन सुविधा प्रथम अमेरिकेतील अॅण्ड्रॉइड आणि आयफोनधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे फेसबुकतर्फे सांगण्यात आले. नोटिफिकेशनच्या सुधारित आवृत्तीमुळे फेसबुक वापरकर्त्याला आयुष्यातील महत्वाचे क्षण, वाढदिवस, खेळ तालिका फलक, टीव्हीवरील आवडत्या कार्यक्रमाची आठवण करून देणारे नोटिफिकेशन अशा स्वरुपात नोटिफिकेशनचे नियोजन करता येईल. थोडक्यात सांगायचे झाले तर नोटिफिकेशनच्या लांब यादीला आता निरोप देण्याची वेळ आली असून, विभागवार स्वरुपातील नोटिफिकेशनसाठी सज्ज राहाण्याची वेळ आली आहे.
या नवीन स्वरुपातील नोटिफिकेशनमध्ये ‘लोकेशन हिस्टरी’वर आधारित माहितीचा पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे फेसबुकतर्फे सांगण्यात आले. यात स्थानिक-माहिती, बातम्या, हवामान, स्थानिक चित्रपटगृहातील चित्रपटांची माहिती आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या केंद्रांची माहिती पुरवली जाईल.
नोटिफिकेशनच्या सुधारित आवृत्ती नंतरदेखील नोटिफिकेशनच्या सध्याच्या सेटिंग्जमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.
सुधारित आवृत्तीत प्रत्येक कार्डाच्या उजव्या बाजूस देण्यात आलेल्या अॅरोवर टच करून वापरकर्ता माहितीचे नियोजन करू शकतो किंवा नोटिफिकेशन टॅबच्या तळाशी दिलेल्या ‘अॅड मोअर कार्डस्’ पर्यायाचा वापर करून नवीन कार्डाची भर घालू शकतो.

पाहा फेसबुकच्या नव्या स्वरुपातील नोटिफिकेशनचा व्हिडिओ: