पावसामध्ये भिजून गॅझेटचं झालेलं नुकसान आर्थिकदृष्टय़ा  खर्चीक असतंच पण आपल्या मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅब्लेट खराब झाल्याने त्यातील महत्त्वाचा डाटाही गमवावा लागतो. बरं पाऊस आहे म्हणून आपण गॅझेट्स घरात ठेवून बाहेर पडू शकत नाही. म्हणूनच पावसात भिजू नये म्हणून आपण जसं छत्री किंवा रेनकोट वापरतो, तसंच आपल्या गॅझेटसाठीही काही वस्तू आपल्याजवळ असायलाच हव्यात..
वॉटरप्रूफ पाऊच
पावसाळा आला की मोबाइल ठेवण्यासाठी दहा-दहा रुपयांचे पाऊच विकण्यासाठी ट्रेनमध्ये फिरणारे विक्रेते हमखास दिसतात. पण हे पाऊच पाण्यापासून संरक्षण करण्यात असमर्थ ठरतात आणि टिकाऊही नसतात. पण मोबाइलच्या दुकानात किंवा ऑनलाइन स्टोअरमध्ये मिळणारे पाऊच या दोन्ही बाबतीत उपयुक्त आहेत. साधारण दोनशे ते तीनशे रुपयांच्या दरम्यान मिळणारे हे पाऊच आकाराने मोठे असल्याने त्यात मोबाइलसोबत हेडफोनही ठेवता येऊ शकतो. गळ्यात किंवा खांद्यावर अडकविण्यासाठी त्यांना बेल्टही देण्यात आला असून यामध्ये डबल लॉकिंग व्यवस्था असल्याने पाणी आतमध्ये शिरत नाही. अशाच प्रकारचे पाऊच टॅब्लेटसाठीही मिळतात. त्यांची किंमतही ४०० ते ७००च्या घरात आहे.
ब्लूटूथ हेडसेट
पावसाच्या दिवसात मोबाइलवरून थेट बोलण्याऐवजी ब्लूटूथ हेडसेटचा वापर करणे खूप फायद्याचे ठरू शकते, कारण तुम्ही कितीही संरक्षण केले तरी तुमच्या मोबाइलला थोडेफार पाणी लागण्याचा धोका असतोच. त्यामुळे मोबाइल फोन पाऊचमध्ये अथवा बॅगेत ठेवून ब्लूटूथ हेडसेटचा वापर करणे उत्तम. तुम्ही नवीन मोबाइल घेत असतानाच त्यासोबत ब्लूटूथ हेडसेट पुरवला जातो. मात्र, तो पुरवला नसल्यास तुम्ही दुकानातून किंवा ऑनलाइन स्टोअरवरून तुमच्या मोबाइल कंपनीचा साधा ब्लूटूथ हेडसेट सुमारे ४५० ते ७०० रुपयांच्या किमतीत मिळवू शकता. तुम्हाला या हेडसेटवरून गाणी ऐकायची असतील तर मात्र तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागेल.
पोर्टेबल बॅटरी चार्जर
खरं तर पावसापासून गॅझेटच्या संरक्षणासाठी म्हणून पोर्टेबल बॅटरी चार्जरचा काही उपयोग नाही. मात्र, प्रचंड पावसामुळे आपण कुठे अडकून पडलो असतानाच अचानक फोनची अथवा टॅब्लेटची बॅटरी डाऊन झाली तर..? अशा कठीण प्रसंगी पोर्टेबल चार्जर आपल्याला खूपच उपयुक्त ठरतो. पावसाळ्यात घरातील विद्युतप्रवाह खंडित होण्याच्या घटनाही जास्त वेळा घडतात. त्यामुळे पोर्टेबल बॅटरी चार्जर असावाच. सध्या बाजारात अनेक प्रकारचे बॅटरी चार्जर उपलब्ध आहेत. अगदी दीडशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचे बॅटरी चार्जर तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र, खरेदी करताना चार्जरचा आकार, बॅटरीची क्षमता, त्याची उपयुक्तता या गोष्टींचा विचार जरूर करा.