प्रश्न – मी एक शिक्षक असून मला माझ्या शाळेचे संकेतस्थळ विकसित करावयाचे आहे.
– राजेश कलगुंडे, जिंतूर, परभणी
उत्तर – संकेतस्थळ विकसित करण्यासाठी एचटीएमएल, मायएसक्यूएलसारख्या विविध संगणकीय भाषांची गरज पडते. या भाषा येणारे किंवा संकेतस्थळ विकसित करणारे व्यावसायिक तुम्हाला हे काम चोख करून देऊ शकतील. मात्र याला पोर्टल नावापासून अनेक बाबतीत खर्च करावा लागतो. जर तुम्हाला तुमचे संकेतस्थळ विकसित करावयाचे असेल तर तुम्ही गुगल किंवा वर्डपोस्टसारख्या संकेतस्थळांची मदत घेऊन मोफत संकेतस्थळ विकसित करू शकता. या संकेतस्थळांच्या साह्याने स्वत:च संकेतस्थळ विकसित करणे तसे सोपे असते. यासाठी तुम्ही लॉगइन केल्यानंतर ‘क्रिएट वेबसाइट’ हा पहिला पर्याय निवडा. यानंतर तुम्ही तुमच्या संकेतस्थळाचे नाव द्यावे. यानंतर मुख्य संकेतस्थळावर तुमच्या संकेतस्थळासाठी काही टेम्पलेट्स उपलब्ध असतात. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीचे व संकेतस्थळाला साजेसे टेम्पलेट निवडावे. यानंतर आवश्यक ती माहिती भरून व छायाचित्र देऊन तुम्ही संकेतस्थळ पूर्ण करू शकता.

प्रश्न – माझ्या मेमरी कार्डमधून डीसीआयएम फोल्डरमधील सर्व फोटो डिलिट झाले तरी बॅकअप कसा घ्यावा.
– अर्जुन कणसे.
उत्तर – अनेकदा हे फोटो तुमच्या मेमरीकार्डच्या तात्पुरत्या साठवणुकीत मिळू शकतात. यामुळे तुम्ही सर्वप्रथम एक नवीन फोटो काढून बघा. कदाचित नवीन डीसीआयएम फोल्डर तयार होईल आणि त्यात तुम्हाला कदाचित जुने फोटो मिळू शकतील. तसे नाही झाले तर एसडीकार्ड रिकव्हरी सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्या माध्यमातून तुम्हाला फोटो मिळवता येऊ शकतील. यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड केलेल्या संगणकातील कार्ड रीडरमध्ये कार्ड टाकून सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही कार्डातील फोटो मिळवू शकता.

– तंत्रस्वामी