इंटरनेटचा नियमित वापर करणाऱ्या ८२ टक्के भारतीयांना इंटरनेट बंद असले की अस्वस्थता निर्माण होते, तर ६० टक्के लोकांना अद्याप इंटरनेटचा पूर्ण वापर करणे आपल्याला जमत नसल्याचे वाटते. टाटा टेलिकम्युनिकेशनने विकसित आणि विकसनशील अशा सहा देशांमधील इंटरनेट वापरकर्त्यांशी चर्चा करून एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. त्यात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या सवयी याचबरोबर त्यांच्या अपेक्षांवरही ऊहापोह करण्यात आला आहे.
जगभरात सुमारे अडीच अब्ज लोक इंटरनेटशी जोडलेले आहेत, तर सन २०२० मध्ये इंटरनेटशी जोडल्याच गेलेल्या उपकरणांची संख्या जगभरात २६ अब्ज इतकी असेल, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. इंटरनेट वापर करणाऱ्यांपैकी अध्र्याहून अधिक लोकांना इंटरनेटचे कामकाज कसे होते याची माहितीच नाही. यामध्ये भारतीय वापरकर्त्यांची स्थिती जरा बरी असून ३० टक्के भारतीय वापरकर्त्यांना सब-सी केबल हे इंटरनेटचे सर्वात जलद माध्यम असल्याची माहिती आहे.
सर्वेक्षणातील काही महत्त्वाच्या नोंदी
*  देशातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपकी ४६ टक्के लोक दिवसाला सहा तासांपेक्षा जास्त वेळ इंटरनेटवर घालवितात. हे प्रमाण जगाच्या तुलनेत २९ टक्के इतके आहे.
* ८२ टक्के लोकांना इंटरनेट बंद असले की अस्वस्थवाटते. यात महिलांचे प्रमाण जास्त आहे. भारतात एकूण वापरकर्त्यांपकी २१ टक्के महिला इंटरनेट बंद असले की अस्वस्थ होतात, तर पुरुषांचे हेच प्रमाण १६ टक्के इतके आहे, तर सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपकी ५६ टक्के लोकांच्या मते जर पाच तास ते इंटरनेटशी जोडले नाही गेले, तर त्यांना खूप जास्त त्रास होतो.
* सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपकी पुरुष हे महिलांच्या तुलनेत जास्त वेळ इंटरनेटचा वापर करतात.
* सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी देशातील ४८ टक्के  वापरकर्त्यांना इंटरनेटच्या तांत्रिक गोष्टींबद्दल माहिती आहे. हेच प्रमाण जर्मनीमध्ये २६ टक्के, ब्रिटनमध्ये ३० टक्के, अमेरिकेत २८ टक्के, फ्रान्समध्ये ४३ टक्के, तर सिंगापूरमध्ये ३८ टक्के इतके दिसून येते.
* देशातील ६९ टक्के वापरकर्त्यांना क्लाऊडबद्दल माहिती असून ते माहिती केंद्राशी जोडलेले असतात अशी माहितीही होती.
* प्रत्येकाकडे इंटरनेट असावे, असे ६१ टक्के भारतीयांचे म्हणणे आहे.
* टॅबलेट किंवा स्मार्टफोनवरून इंटरनेट वापर करणे सोयीचे ठरत असून इंटरनेटचा वापर करण्यासाठी ४३ टक्के भारतीय हे टीव्ही पाहण्यास बगल देऊ शकतात, तर हे प्रमाण अमेरिकेत १७ टक्के, तर युरोपीयन्समध्ये२२ टक्के इतके आहे.