आयआयटी मुंबई या संस्थेला एक लाख टॅब्लेटचा पुरवठा केल्यानंतर आकाश टॅब्लेटची नवीन आवृत्ती २५०० रुपयांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
 अगोदरच्या आवृत्तीची किंमत २२६३ रु. होती. ‘डाटाविंड’ या कंपनीने आकाश टॅब्लेटची निर्मिती केली असून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीतसिंग टुली यांनी सांगितले की, आकाश टॅब्लेटची समिती २५०० रुपयांना आकाश टॅब्लेटची आणखी सुधारित आवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत आहे. दहा लाख आकाश टॅब्लेट घेतले जाणार असतील तर पंचवीसशे रुपयांनी सुधारित आवृत्ती देण्याची आमची तयारी आहे. आकाश टॅब्लेटचा पुरवठा करण्यात विलंब झाल्याचा आरोप फेटाळून त्यांनी सांगितले की, आम्ही महिनाभर अगोदरच मागणीची पूर्तता केली आहे. आकाश टॅब्लेट पुरवण्याची अंतिम तारीख ६ जून होती. ते काम आम्ही १ मे रोजी पूर्ण केले आहे. पुढील आवृत्तीसाठी डाटाविंडने सिमस्लॉट व कॉल सुविधा यांचा समावेश करण्याची तयारी दर्शवली आहे.
ज्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनात ३० टक्के सुटे भाग भारतीय निर्मितीचे असतील त्यांनाच प्राधान्य देण्याच्या सरकारच्या धोरणाचे टुली यांनी स्वागत केले आहे.
अमृतसर येथे एलसीडी टचस्क्रीन कारखाना सुरू करणार असल्याचे सांगून डाटाविंड कंपनी भारतीय बनावटीचे ३० टक्के सुटे भाग वापरण्याच्या अटीची पूर्तता करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर कंपन्यांनाही भारतात एलसीडी निर्मिती कारखाने सुरू करावे लागतील, असेही त्यांनी सूचित केले.