अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोन हा म्हणजे तंत्रजगतातील जादूचा दिवाच म्हटला पाहिजे. या स्मार्टफोनवर वापरकर्त्यांला काहीही म्हणजे काहीही पाहता येतं, मिळवता येतं. संवाद, ईमेल, चॅटिंग, सोशल नेटवर्किंग, गेम्स, गाणी, मनोरंजन, ऑफिसशी संबंधित कामे, बँकिंग, बिलभरणा, घरखर्चाचं नियोजन, बातम्या, लाइव्ह अपडेट, व्हिडीओज, टीव्ही अशा एक ना अनेक गोष्टींची दालने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी खुली करून देतो. त्यामुळे दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढत चालला आहे. पण हे सगळं विनासायास वापरताना एक गोष्ट मोठा अडथळा निर्माण करते ती म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी. वापर वाढला की मोबाइलची बॅटरी खर्च होणार, हे तर निश्चितच आहे. पण स्मार्टफोन विशेषत: अ‍ॅण्ड्रॉइड फोनची बॅटरी लवकर ‘डाउन’ होते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा वेळी बाजारात जास्त काळ चालणाऱ्या बॅटऱ्या असलेले स्मार्टफोन येत असले तरी येत्या काळात त्याही कमी पडतील, यात शंका नाही. म्हणूनच आपल्या स्मार्टफोनची बॅटरी जास्तीत जास्त वेळ कशी चालवता येईल, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पुढे दिलेल्या काही टिप्सचा वापर केल्यास तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी कमी वेळेत डाउन होण्यापासून नक्कीच वाचेल.
योग्य चार्जिग पद्धत
मोबाइलची बॅटरी डाउन होऊ नये म्हणून वेळ मिळेल तेव्हा फोन चार्ज करणे, हा योग्य मार्ग आहे. मात्र, हे करतानाही योग्य पद्धत वापरणे अत्यावश्यक आहे. मोबाइलची बॅटरी शून्य टक्क्यापर्यंत डाउन होण्याआधीच चार्जिग केल्यास फोन लवकर चार्ज होतोच, शिवाय बॅटरीही जास्त काळ टिकते. त्याचप्रमाणे बॅटरी १०० टक्के चार्ज होईपर्यंत प्रतीक्षा पाहण्यातही अर्थ नाही. नवीन फोन घेतल्यानंतर तो बंद करून पूर्णपणे चार्ज करण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. मात्र, अलीकडच्या काळात बहुतेक स्मार्टफोन आधीच चार्ज केलेले असतात. त्यामुळे नवीन फोन घेतल्यानंतर त्याची बॅटरी डाउन होईपर्यंत वापरणे योग्य आहे. त्यानंतर तो पूर्ण चार्जिग करता येतो. अनेकांना रात्रभर फोन चार्जिगला लावून ठेवण्याची सवय असते. सध्याच्या स्मार्टफोनमध्ये लिथियम बॅटरी असल्याने पूर्ण चार्ज झाल्यावर बॅटरी चार्ज होणे बंद होते. मात्र, रात्रभर चार्जिग होत राहिल्यास त्याचा परिणाम बॅटरीच्या दीर्घकाळ टिकण्यावर होतो.
योग्य चार्जरचा वापर
सध्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनची चलती असल्याने ‘चपटय़ा’ पिनचे चार्जर एका घरात चारचार आढळतात. कोणत्याही फोनच्या चार्जरने आपला फोन चार्ज होत असल्याने आपणही बिनधास्तपणे तो चार्जर वापरतो. मात्र, याचा बॅटरीला धोका संभवतो. विशेषत: ज्या फोनमध्ये ‘क्वीक चार्जिग’ची सुविधा असते, त्या फोनला त्यासोबत मिळालेला चार्जरच वापरणे योग्य ठरते. कारण अनेक फोनमध्ये ठरावीक क्षमतेच्या विद्युतप्रवाहाची मर्यादा असते. अशा वेळी दुसऱ्या चार्जरमुळे जास्त विद्युत प्रवाह झाला की स्मार्टफोनच्या बॅटरीतील सेल्सना धक्का पोहोचतो. दुसरे म्हणजे, बाजारात स्वस्त दरात मिळणाऱ्या चार्जरचा वापर करणे टाळले पाहिजे. कारण त्यामुळेही बॅटरी लवकर खराब होऊ शकते.
स्मार्टफोनला तापू देऊ नका
स्मार्टफोनच्या लिथियम बॅटऱ्यांसाठी २० ते ३० अंश सेल्सियस तापमान योग्य असते. त्यामुळे स्मार्टफोन जास्त गरम झाल्यास बॅटरीला नुकसान होते. विशेषत: सरळ सूर्यप्रकाशाशी फोनचा संपर्क झाल्यास तो तापतो आणि त्याचा फटका बॅटरीसोबत आतील अन्य यंत्रणेलाही बसू शकतो.
चार्जिग करताना फोन वापर टाळा
स्मार्टफोन चार्जिग होत असताना फोनचा वापर करणे टाळलेच पाहिजे. कारण चार्जिग होत असताना फोनचा वापर होत असल्याने बॅटरी चार्जिग होणे थांबते आणि चार्जिगमध्ये वारंवार खंड पडल्यास चार्जिगची क्षमता कमी कमी होत जाते. फोन चार्ज होत असताना गेम्स खेळणे किंवा व्हिडीओ पाहणेही अत्यंत धोक्याचे आहे. अशा गेम्स किंवा व्हिडीओमुळे फोनचे सॉफ्टवेअर तापत असते. त्यामुळे बॅटरीचेही तापमान वाढत जाते. यामुळे क्वचित एखाद्या वेळी बॅटरीचा स्फोट होण्याचीही भीती असते.

फोन रिस्टार्ट करा
तुमचा स्मार्टफोन दिवसातून दोनदा तरी रिस्टार्ट करणे योग्य आहे. यामुळे बॅटरीचा वापर वाचतोच; शिवाय फोन तापण्याचे प्रमाणही कमी होते.

एखाद्यावेळी आपल्या फोनची बॅटरी डाउन झाली आणि जवळपास चार्जिगची सुविधा नसेल तर खालील टिप्स अमलात आणल्यास बॅटरी जास्त वेळ चालू शकेल.
१. मोबाइलमधील थ्रीजी किंवा फोरजी डाटा नेटवर्क बंद करा.
२. वायफायचा वापर टाळा.
३. ब्लूटूथ, जीपीएस बंद करा.
४. फोनचा डिस्प्ले कमीत कमी करा.
५. स्मार्टफोनच्या बॅकग्राउंडला सुरू असलेले अ‍ॅप्स बंद करा.
६. व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुक अशा ‘पॉवर’ खाणाऱ्या अ‍ॅपचा वापर शक्यतो करू नका.
७. स्मार्टफोनचा ‘टाइमआउट’ कमीत कमी ठेवा.
८. व्हायब्रेट मोड बंद ठेवा.
९. नको असलेले नोटिफिकेशन्स बंद करून ठेवा.

– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com