लहान-थोर कोणीही असो, प्रत्येक व्यक्तीला कशाचा ना कशाचा छंद असतो. हा छंद काहीजण केवळ स्वतच्या आनंदासाठी जोपासत असतात. त्यात कुठल्याही लाभाची अपेक्षा नसते. बिल्ले, पोस्टाची तिकीटे, नायक-नायिकांची छायाचित्रे, जुन्या गाण्यांच्या रेकॉर्डस, कॅसेटस इत्यादींचा संग्रह करण्याचे छंद बहुतांश वेळा अशा प्रकारात मोडतात.

आज आपण पुस्तके, ऑडिओ-व्हिडिओ, विविध सॉफ्टवेअर्स, इंटरनेट साईटस यांच्या संकलनाचा खजिना असलेल्या https://archive.org/ या साईटबद्दल जाणून घेणार आहोत. येथे लाखोंच्या संख्येने ई-बुक्स उपलब्ध आहेत जी विनामूल्य आहेत. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून ही स्कॅन केलेली पुस्तके येथे अपलोड केलेली आहेत. त्यामुळे पुस्तकाचे प्रत्येक पान अगदी सुस्पष्ट वाचता येते. अक्षरांचा आकार तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करून घेता येतो. पुस्तक वाचताना ज्याप्रमाणे आपण एकेक पान उलटतो त्याप्रमाणे येथील पुस्तके तुम्हाला वाचता येतील.  शैक्षणिक पुस्तके, गोष्टींची पुस्तके तसेच विविध भाषांमधील पुस्तके तुम्हाला पहायला मिळतील. म्हणजेच येथे सी प्रोग्रॅिमग शिकवणारी पुस्तके सापडतील त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य हे पुस्तक देखील वाचायला मिळेल. इंग्रजी पुस्तके वाचण्याबरोबरच ती ऐकण्याची सोय देखील येथे आहे.

व्हिडिओ कलेक्शनमधे अनेक जुने चित्रपट जसे की चार्ली चॅपलीन, कार्टुन फिल्मस, खेळांच्या क्लिप्स इत्यादी उपलब्ध आहेत. ऑडियोमधे सुध्दा अशी विविधता आहे. अगदी रामकथासुध्दा मराठीतून ऐकायला मिळेल.

या साईटवर टेलिव्हिजनच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या महत्वाच्या बातम्या संग्रहित केलेल्या आहेत. बीबीसी किंवा सीएनएन सारख्या शेकडो चॅनेल्सवर गेल्या कित्येक वर्षांत दिल्या गेल्या बातम्या तुम्हाला दृश्य स्वरूपात पाहता येतील. याच बातम्या विषयानुसारही शोधता येतात. अभ्यासूंना अशा प्रकारच्या माहितीच्या खजिन्याचा खूप उपयोग होऊ शकतो.

या साईटवर जुन्या सॉफ्टवेअर्सचा साठा ठेवलेला आहे. उदाहरणार्थ िवडोज ऑपरेटिंग सिस्टीम येण्यापूर्वी मायक्रोसॉफ्टची एमएस डॉस (टर-ऊडर) प्रणाली वापरात होती. यावर खेळले जाणारे खेळ किंवा इतर सॉफ्टवेअर्स कशी होती हे ती डाऊनलोड करून प्रत्यक्ष वापरून बघता येतील. (अर्थात त्यासाठी तुमच्याकडे जुन्या जमान्यातला संगणक असावा लागेल – जे कठीण आहे किंवा आजचा संगणक एमएस डॉस प्रणालीत चालवणारे इम्युलेटर सॉफ्टवेअर असावे लागेल.)

संगणकाच्या आणि इंटरनेटच्या प्रवासात डिजिटल माध्यमात जे कार्यक्रम, साईटस, माहिती विविध टप्प्यांवर उपलब्ध होती ती जिज्ञासू आणि अभ्यासू लोकांसाठी साठवून वापरास विनामूल्य खुली करण्याचा उपक्रम आहे. या चांगल्या कामास ऐच्छिक देणगी देऊन तुम्ही हातभार लावू शकता.

मनाली रानडे

manaliranade84@gmail.com