पेटंटसाठीच्या मानधनाची रक्कम न दिल्याच्या कारणावरून शुक्रवारी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सॅमसंग कंपनीविरुद्ध अमेरिकन न्यायालयात खटला दाखल केला . मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे पेटंट वापरण्यासाठी सॅमसंगकडून मायक्रोसॉफ्टला मानधन दिले जात असे. मात्र, मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनीचा मोबाईल हँडसेट उद्योग विकत घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सॅमसंगने ही रक्कम देण्यास नकार दिल्याचे मायक्रोसॉफ्टच्यावतीने सांगण्यात येत आहे. याविरुद्ध मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतील मॅनहॅटन येथील फेडरल न्यायालयात धाव घेत सॅमसंगविरोधात खटला दाखल केला आहे. आपल्या तक्रारीत मायक्रोसॉफ्टने सॅमसंग कंपनीने करारानुसार ठरलेले मानधन द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, या रक्कमेचा नेमका आकडा सांगण्यास मायक्रोसॉफ्टच्यावतीने नकार देण्यात आला. सॅमसंगकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीचे स्वरूप जाणून घेतल्यानंतर पुढची पाऊले उचलण्याचे संकेत सॅमसंगने दिले आहेत.