जगभरातील सर्वाधिक मिस्ड कॉल हे भारतात दिले जातात, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. अशा कुठल्याही ग्राहक सवयीचा फायदा घेणार नाही ते व्यावसायिक कसले? यातूनच मिस्ड कॉल तंत्रज्ञान उदयाला आले आणि त्याचा मार्केटिंगसाठी वापर होऊ लागला. ग्राहकाला फुकटात माहिती मिळू लागली आणि कंपन्यांना ग्राहकांच्या माहितीचा मोठा साठा उपलब्ध होऊ लागला. पाहू या काय आहे हे तंत्रज्ञान आणि क्लाऊड टेलिफोन.
मिस्ड कॉल तंत्रज्ञान
बँकेची सुविधा हवी असल्यास अमुक क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.. ग्राहक तक्रार निवारणासाठी अमुक क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.. इतकेच नव्हे तर रिअ‍ॅलिटी शोज असतील किंवा कुठल्या तरी पारितोषिक वितरण समारंभात मते नोंदवायची असतील तरी अमुक क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.. अशा स्वरूपाच्या जाहिराती आपण पाहत असतो. मिस्ड कॉल दिल्यावर आपण त्या संबंधित कंपनीपर्यंत पोहोचतो आणि आपल्या भावना पोहोचवतो. याचबरोबर आपला तपशीलही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मिस्ड कॉल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही कार्यक्रमादरम्यान दिसलाच, याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीमध्येही दिसला. या सदस्य नोंदणीदरम्यान ज्यांनी कुणी मिस्ड कॉल दिला होता अशा सर्वाचे क्रमांक आज भाजपच्या सव्‍‌र्हरवर साठविण्यात आले आहेत. या क्रमांकाचा वापर सरकारी योजना त्यांच्यापर्यंत संदेशाद्वारे पोहोचवण्यासाठी केला जातो. अशा प्रकारेच विविध कंपन्या या माध्यमातून आपल्या उत्पादनांची जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवीत असतात. झिप डायल ही कंपनी याचे उत्तम उदाहरण आहे. कॅलिफोर्नियातील वलेरिया व्ॉगोनर या मुलीची ही मूळ संकल्पना होती. यानंतर तिने भारतात येऊन या कंपनीचा विस्तार केला. या वेळी तिने भारतीयांच्या मिस्ड कॉल देण्याच्या मानसिकतेचा विचार करून या व्यवसायाची संकल्पना मांडली. पुढे ही कंपनी ट्विटरने विकत घेतली. सध्या देशातील लघु व मध्यम कंपन्यांना तसेच बडय़ा कंपन्यांनाही मिस्ड कॉलसाठी नंबर उपलब्ध करून देऊन ती सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये ‘नॉलॅरिटी’ ही एक कंपनीही आहे. या कंपनीने ‘सत्यमेव जयते’ या मालिकेसाठी सेवा उपलब्ध करून दिली होती. बाबाजॉब या कौशल्याधारित नोकरी पुरविणाऱ्या कंपनीनेही मिस्ड कॉल सेवेचा फायदा घेतला आहे. ही कंपनी स्वयंपाकी, सुरक्षारक्षक अशा प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत असते. अशा नोकऱ्या करणाऱ्यांना कॉल्सवर पैसे घालविणे शक्य नसल्यामुळे ही सुविधा त्यांच्यासाठी खूप फायद्याची ठरत आहे.

क्लाऊड टेलिफोनी
क्लाऊड तंत्रज्ञानावर आधारित विविध सुविधा सध्या बाजारात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे क्लाऊड टेलिफोनी. एखाद्या कंपनीत फोन केला आणि ग्राहक सेवा प्रतिनिधीपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकाला पाच मिनिटे वाट पाहावी लागली की ग्राहकाचा संताप होतो. यामुळे अनेकदा ग्राहक समाधानी होत नसत. मग कंपन्यांनी यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली. त्या वेळेस ग्राहकांना थेट ग्राहक प्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीतील सेवांनुसार वेगवेगळ्या क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय समोर आला. याची सुरुवात सर्वात प्रथम १९९८ मध्ये अमेरिकेत संगणकावर फॅक्स उपलब्ध करून देण्यापासून झाली. पुढे २००४ मध्ये अमेरिकेत पीबीएक्स मशीनचा वापर करण्यास सुरुवात झाली. ज्याच्या माध्यमातून कंपनीचे स्वागत करून एकचा पर्याय निवडा किंवा दोनचा पर्याय निवडा असे पर्याय उपलब्ध होऊ लागले. पुढे २००७ मध्ये ट्विलिओ या कंपनीने क्लाऊडवर आधारित टेलिफोनी एपीआय बाजारात आणला. यामध्ये १० हजारपेक्षा जास्त अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध होते. या सर्व सुविधा व्हीओआयपी तंत्रावर आधारित होत्या. भारतात व्हीओआयपी सुविधा वापरण्यास परवानगी नसल्याने टेलिफोन लाइनशिवाय पर्याय नव्हता. यामुळे नॉलॅरिटीसाठी कंपन्यांनी ज्या देशात व्हीओआयपी सुविधा उपलब्ध नाही अशा देशांमध्ये सुपर फॅक्स आणि सुपर रिसेप्शनिस्टसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या. यामुळे छोटय़ा कंपन्यांना ग्राहक सेवेसाठी चांगला पर्याय उपलब्ध राहिला. यामध्ये एका कंपनीला काही नंबर्स देण्यात येतात, याचबरोबर चोवीस तासांची कॉल उचलण्याची सेवाही दिली जाते. यामुळे ग्राहकांना फार वेळ वाट न पाहता सहजपणे कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधता येणे शक्य होते अशी माहिती नॉलॅरिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमरीश गुप्ता यांनी स्पष्ट केले. यामध्ये ग्राहकांचा वेळ वाचतो आणि कंपनीला त्यांचा वेळ खर्च न करता ग्राहकांशी संवाद
साधता येतो.
ही सुविधा क्लाऊडवर आधारित असून फोन्स, ब्राऊजर्स किंवा स्काइपसारख्या व्हीओआयपी अ‍ॅप्सच्या माध्यमातून कंपनी आणि ग्राहकांना जोडते. यात वेब पॅनेल किंवा पीबीएक्स अर्थात प्रायव्हेट ब्रांच एक्स्चेंजचा वापर केला जातो. क्लाऊड टेलिफोनीचे क्षेत्र हे सध्या नवीन असून ते क्लाऊट तंत्रज्ञानाच्या सोबत काम करत आहे. यामध्ये अनेक मातब्बर कंपन्यांपासून छोटय़ा छोटय़ा सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांपर्यंत सर्वाचा समावेश आहे. ही सेवा सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या टेलिफोनीच्या विविध सेवांच्या तुलनेत एकदशमांश खर्चात उपलब्ध होत असल्यामुळे अनेक कंपन्या आता या सेवांकडे वळू लागल्याचेही गुप्ता म्हणाले. ही सेवा सर्वच प्रकारच्या कंपन्या तसेच स्वयंसेवी संस्थांनाही उपयुक्त ठरू शकणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सेवेच्या भविष्याबाबत बोलताना गुप्ता म्हणाले की, सध्या डिजिटल माध्यमाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असला तरी आजही भारतात ८१ टक्के लोक संवादासाठी मोबाइल फोनचा किंवा टेलिफोनचा वापर करतात. यामुळे कंपनीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर ही सेवा अगदी उपयुक्त ठरते. टेलिफोन संवादामध्ये बाजारातही मोठय़ा प्रमाणावर मदत होते. यात टोल फ्री क्रमांक ग्राहकांना संवाद साधण्यासाठी प्रवृत्त करत असतात. याचा फायदा ब्रँड्स आणि स्टोअर्सना होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आरोग्य सेवांपासून ते हॉटेलच्या सेवांपर्यंत विविध सेवांसाठी ही सुविधा उपयुक्त असून नॉलॅरिटी अशा कंपन्यांना सुविधा पुरवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ही सेवा कंपनीतील माणसे कार्यालयात असोत किंवा इतर कुठेही असोत, त्या ठिकाणांपर्यंत ग्राहकांना पोहोचविण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा सेवांमुळे ग्राहक सेवा अधिक सोपी होणार असून एका मिस्ड कॉलवरही आपली अनेक कामे होऊ शकणार आहेत.
मिस्ड कॉल सेवेचे फायदे
कोणत्याही प्रकारचे दर न आकारता ग्राहकांशी जोडले जाणे.
कंपन्यांना देशभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे. एखाद्या गोष्टीत रस आहे, पण पैसे मोजावे लागत असल्यामुळे अनेक लोक त्याकडे वळत नाहीत. पण मिस्ड कॉलची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हे ग्राहकही त्याकडे वळतात.
यामुळे कंपन्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामध्येही भर पडते.
इनकमिंग कॉलचे प्रमाण वाढते.

– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com