गेल्या दशकातील महत्त्वपूर्ण बदल असा होता की, आपल्या नेहमीच्या वापरातील उपकरणे अधिकाधिक स्मार्ट होत गेली. पण तोपर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या उपकरणांमध्ये फारसे बदल झालेले नव्हते. मात्र आता गेल्या वर्षांपासून स्मार्ट उपकरणांना सोबत देणारी सहउपकरणेही आता तितकीच स्मार्ट होऊ लागल्याचे दिसते आहे.
स्मार्टफोनसोबत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमधील एक महत्त्वाचे उपकरण म्हणजे हेडफोन.  अलीकडे टॅब्लेट किंवा स्मार्टफोनवर चित्रपट पाहण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. अशा वेळेस तो चित्रपट डॉल्बी इफेक्टसह असेल तर तसा इफेक्ट ऐकताही यायला हवा, अशी अपेक्षा वाढली आणि मग हेडफोन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तशा सुविधा पुरविण्यास सुरुवात झाली. त्याचवेळेस असे लक्षात आले की, हेडफोनची बाजारपेठ ही काही केवळ त्या डॉल्बीपुरती मर्यादित नाही. तर त्यात संगीताचे विविध प्रकार रुचीने ऐकणाऱ्या जाणकार संगीतप्रेमींचाही समावेश आहे. त्यात कुणाला रॉक संगीत आवडते तर कुणाला शास्त्रीय. त्यातही प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या. मग अशा गरजा लक्षात घेऊन आकारास आलेले हेडफोन्स बाजारात येऊ लागले.
बाजारपेठेतील ही नवी लाट लक्षात घेऊन आता बॉम्बरने नवीन मोटरहेडफोन्स बाजारात आणले आहेत. खास करून रॉक संगीतासाठी ते चांगले आहेत. असा कंपनीचा दावा आहे. म्हणजेच ज्या संगीतामध्ये गिटार, ड्रम्स आदींचा वापर केला जातो, ते संगीत यावर चांगल्या पद्धतीने ऐकता येते. या हेडफोनचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात थेट ३० मिमी. स्पीकर्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आवाजाच्या सुश्राव्यतेमध्ये चांगलाच फरक पडलेला दिसतो.
बॉम्बरचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे ते म्हणजे स्मार्टफोनवर वापरता येऊ शकेल, अशा कंट्रोल्सची रचना त्याच्यासाठी विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ कानाला लावून ऐकण्याचा असा हा हेडफोन नाही. यावर आवाज कमी- अधिक करता तर येतोच. पण त्याचबरोबर पॉज, प्ले, प्ले फॉरवर्ड, फास्ट फॉरवर्ड आदी सोयी आणि त्याचबरोबर गाणी ऐकताना मधेच फोन आला तर तो घेण्यासाठी होल्ड, हँग अप, आन्सर, दोन कॉल्समधील देवघेव, व्हॉइस कंट्रोल आदी सुविधाही यात देण्यात आल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६,३९९/-