05 June 2020

News Flash

पाहू या नोबेल सोहळा

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अगदी राजेशाही थाटात एक समारंभ साजरा केला जातो.

दर वर्षी आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच १० डिसेंबर रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अगदी राजेशाही थाटात एक समारंभ साजरा केला जातो. यात भौतिक, रसायन, वैद्यक, अर्थशास्त्र तसेच साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आजच्या जगातील सर्वोच्च पुरस्कार समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याचबरोबर नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे विश्व शांतीच्या क्षेत्रांत अलौकिक काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे कौतुक म्हणून नोबेल पुरस्कार प्रदान केला जातो.
आल्फ्रेड नोबेल यांनी सुरक्षित स्फोटके शोधण्याच्या संशोधनाला वाहून घेतले होते. यातूनच पुढे त्यांनी डायनामाईटचा शोध लावला. याच्या साहाय्याने रस्ते, पूल, रेल्वे, बंदरे आणि बोगदे इत्यादी बांधकामे करणे सुलभ होऊ लागले. त्यामुळे डायनामाईटची मागणी प्रचंड वाढली. आल्फ्रेड नोबेलने डायनामाईट बनवताना जरी ते युद्धात वापरता येईल अशा विचाराने बनवले नसले, तरी त्याचा उपयोग युद्धात मोठय़ा प्रमाणावर होत होता. नोबेल यांना ‘मृत्यूचा व्यापारी’ अशी उपाधी प्राप्त झाली होती. आपण जिवंत असताना आपले नाव आदराने घेतले जात नाही आणि आपण इतरांच्या मृत्यूला कारणीभूत होत असल्याचे शल्य नोबेल यांना सलत होते.
परंतु त्यांच्या इच्छापत्राने याला कलाटणी मिळाली. त्यांच्या मृत्यूने त्यांचे नाव एक वेगळ्याच आदराने घेतले जाऊ लागले. त्यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा उत्तमोत्तम संशोधकांना आणि साहित्यातील मान्यवरांना त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी पारितोषिक देण्याच्या उद्देशाने प्रदान केला. या दिमाखदार सोहळ्याची संपूर्ण माहिती देणारी अधिकृत साइट म्हणजे http://www.nobelprize.org// या साइटवर नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यापूर्वी त्यांची निवड प्रक्रिया कशा प्रकारची असते याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला येथे वाचायला मिळेल. म्हणजेच नामांकने पाठवायची अंतिम तारीख, त्यांचे मूल्यमापन, पारितोषिकांची निवड करण्याचा अधिकार इत्यादी.
१९०१ सालापासून दिल्या गेलेल्या सर्व पारितोषिक विजेत्यांची माहिती येथे उपलब्ध आहे. संपूर्ण पुरस्कार सोहळ्याचे व्हिडीओ, फोटो, विजेत्यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर केलेले भाषण या साइटवर बघायला व वाचायला मिळेल. तसेच काही व्यक्तींची चरित्रेही थोडक्यात मांडलेली आहेत. प्रत्येक क्षेत्रातील नोबेल पारितोषिकांबद्दलच्या ‘फॅक्टस आणि फिगर्स’देखील वाचायला मिळतील. जसे की, १९०१ पासून २०१५ पर्यंत भौतिकशास्त्राचे २०१ पुरस्कार प्रदान करण्यात आले. आत्तापर्यंत केवळ दोन स्त्रियांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. इत्यादी.
त्याचबरोबर आल्फ्रेड नोबेल या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगांनी ओळख करून देणारे लेख जसे की, साहित्य-कविता, तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य, युद्ध आणि शांतता याबद्दलचे त्यांचे विचार, उद्योगधंदे आणि प्रयोगासाठी विविध देशात केलेले वास्तव्य, त्यांचे व्यक्तिगत आयुष्य इत्यादी. त्यांचे इच्छापत्रही येथे वाचायला मिळते.
या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्या अनुषंगाने या साइटला दिलेली भेट जिज्ञासू आणि अभ्यासकांना आनंददायी वाटेल.
विशेष टीप : नोबेल पारितोषिकविजेत्या शोधांची गोष्टीरूप माहिती मराठीत सोप्या आणि रंजक शब्दात देणारे ‘नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’ हे पुस्तक दरवर्षी डिसेंबरमधे प्रसिद्ध होते. गेली २० वष्रे ग्रंथालीतर्फे प्रकाशित होणारी ही पुस्तकमालिका नंदिनी थत्ते आणि डॉ. सुधीर थत्ते या लेखकद्वयीने अव्याहतपणे चालवली आहे. ह्य़ा मालिकेचे कौतुक स्वत: नोबेल विजेत्यांनी देखील केले आहे.

manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2015 7:04 am

Web Title: nobel prize distribution ceremony
टॅग Tech It
Next Stories
1 भारतात ‘आयफोन ६ एस’ आणि ‘६ एस प्लस’च्या विक्रीला सुरूवात
2 BLOG : अॅस्‍ट्रोसॅट अंतराळातील पहिल्‍या परीक्षेत उत्‍तीर्ण
3 असा वाचवा डेटा
Just Now!
X