वाचनाची आवड असणाऱ्याला पुस्तके वाचण्यासाठी कोणतेही बहाणे लागत नाही. अगदी लोकल ट्रेनमध्ये चढल्यावरही गर्दीत एक हात हँडला पकडून दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन वाचन करणारे वाचनवेडेही आहेत. अनेकजण पुस्तके वाचण्यासाठी किंडेल, आयपॅड किंवा टॅबसारखी स्वतंत्र उपकरणेही खरेदी करतात. पण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाइलमध्ये, संगणकांमध्ये किंवा या स्वतंत्र उपकरणांमध्येही ई-बुक्स वाचनासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी जाणून घेऊयात.
ebookee.org
तुम्हाला पाहिजे तो विषय अगदी इतिहासापासून तंत्रज्ञानापर्यंत कोणताही या सर्व विषयातील जगभरातील हजारो लेखकांची लाखो पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, वित्त अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासासाठीची पुस्तकेही उपलब्ध आहेत. याचबरोबर तंत्रज्ञान, आरोग्य, गेम डेव्हलपर, संगीत विज्ञान, समाज विज्ञान, फॅशन डिझायनिंग, अर्थशास्त्र अशा विविध विभागांमध्येही पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय इतिहास, मानसशास्त्र अशा विषयांतील पुस्तकांचा संग्रही या संकेतस्थळावर आहेत. येथे ई-बुक्स उपलब्ध असून त्यातील काही मोफत आहेत तर काही विकत आहेत.

wattpad.com
या संकेतस्थळावर पुस्तकांचे वाचनच नव्हे तर त्याची देवाण-घेवाण करणेही शक्य होते. याहीपेक्षा नवलेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या संकेतस्थळावर लेखक आपली कथा किंवा आपले लिखाण या संकेतस्थळावर शेअर करू शकतात. या संकेतस्थळावरील इतर सदस्यांकडून त्यांना त्यांच्या लेखावरू प्रतिक्रिया मिळतात. इतकेच नव्हे तर त्यांची कथा किंवा लेख जर कुणाला वापरावयाची असेल तर त्यासाठी ती कथा शोध पर्यायातही उपलब्ध होते. या संकेतस्थळावर तुम्ही एकदा लॉगइन केले की तेथे प्रसिद्ध होणाऱ्या कथा तुम्हाला तुम्ही ऑनलाइन असलात किंवा नसलात तरी वाचता येऊ शकतात. यामध्ये कथांवर किंवा तेथे पोस्ट करण्यात आलेल्या लेखांवर खुली चर्चा होते. या चर्चेत सहभागी होणेही तुम्हाला शक्य होणार आहे. या संकेतस्थळावर आजपर्यंत साडेसात कोटी कथा वाचल्या गेल्या आहेत. येथे साडेतीन कोटींहून अधिक सदस्य आहेत. दरमाह हे संकेतस्थळ नव्वद लाख मिनिटे वाचले जाते. इतकेच नव्हे तर या संकेतस्थळाचा ८५ टक्के वापर मोबाइलवरून होतो.

एफबीरिडर
अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी फ्री बुक रिडर नावाचे एक ई-बुक रिडर अ‍ॅप उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केलेली सर्व ई-बुक्स वाचू शकतात. याशिवाय या अ‍ॅपमध्ये असलेल्या ग्रंथालयाच्या पर्यायामध्ये तुम्ही तुमच्या पुस्तकांची विविध विभागांमध्ये विभागणीही करून ठेवू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्ही एखादे पुस्तक वाचत असाल आणि पान क्रमांक पाचवर आल्यावर तुम्ही पुस्तक वाचन थांबविले तर ज्यावेळेस पुन्हा तुम्ही ते पुस्तक उघडतात त्यावेळेच थेट तुमच्यासमोर पान क्रमांक पाच उघडे होते. म्हणजे तुम्हाला आपण कोणत्या पानावर होतो हे आठवण ठेवण्याची गरज नाही. त्याची जबाबदारी हे अ‍ॅप चांगल्या प्रकारे पार पाडते. या अ‍ॅपमध्ये ईपब, आरटीएफ, एफबी2, मोबी आणि प्लेटेक्स्ट या फॉरमॅटमधील पुस्तके वाचनाची सुविधा उपलब्ध आहे.

sapnaonline.com
काही संकेतस्थळांवरून थेट पुस्तके डाऊनलोड करता येऊ शकतात तर काही संकेतस्थळांवरून पुस्तके विकतही घेता येऊ शकतात. पण या दोन्ही सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरही अभ्यासापासून ते मनोरंजनापर्यंतच्या विविध पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरून आपण एखादे पुस्तक ई-बुक स्वरूपात तर एखादे पुस्तक छापील स्वरूपात खरेदी करू शकतो. या संकेतस्थळावर इंग्रजीबरोबरच कानडी, हिंदी, मराठी, मल्ल्याळम आणि जर्मन या भाषांतील पुस्तके उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर केवळ पुस्तकांची विक्रीच होते असे नाही तर येथे नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे सपना इन्फोवे लि.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजेश शाह यांनी स्पष्ट केले. यामध्ये लेखकांना संपादकीय मार्गदर्शनापासून त्यांचे पुस्तक छापील तसेच ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध करण्याची सुविधा दिली जाते. सध्या जग ऑनलाइन होत असून या जगात एखादे पुस्तक जागतिक पातळीवर पोहचवणे सोपे झाले आहे. तसेच लोकांचा पुस्तक खरेदीचा कलही ऑनलाइनकडे झुकत असल्याचे निरीक्षणही शाह यांनी नोंदविले.

freetechbooks.com
तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कोणताही संदर्भ हवा असेल आणि त्यासाठी तुम्हाला एखादे पुस्तक वाचावयाचे असेल तर तुम्ही नक्कीच या संकेतस्थळाचा वापर करू शकता. या संकेतस्थळावर संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, तंत्रज्ञान या विषयांची शेकडो पुस्तके, पाठय़पुस्तके आणि नोट्स मोफत उपलब्ध आहेत. हे सर्व खुल्या मार्गाने उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे या संकेतस्थळावरून पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी कोणतेही पुस्तक विकत घेण्याची गरज पडणार नाही. या विविध शाखांचे आणि प्रत्येक शाखेमध्ये विविध विषयांचे वेगवेगळे गट करण्यात आले आहेत. यामुळे संकेतस्थळावर एखाद्या विषयाला वाहिलेले पुस्तक शोधणे सोपे जाते. या संकेत संगणकीय भाषांची माहिती देणारे आणि ही भाषा शिकवणारी शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत.
अशा प्रकारे स्वतंत्र विषयाला वाहिलेल्या संकेतस्थळांमध्ये Freecomputerbooks.com  या संकेतस्थळाचाही समावेश आहे.

गुगल प्ले बुक्स
किंडेल, आयपॅड किंवा आयफोनधारकांना पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी त्यांची स्वत:चे असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. अँड्रॉइडधारकांना गुगलने स्वतंत्र अ‍ॅप दिले नसले तरी गुगल प्लेच्या अ‍ॅपवर बुक्सचा स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायामध्ये जगभरातील नवनवीन पुस्तके आपण विकत घेऊन मोबाइलवर वाचू शकतो. यासाठी मोबाइलवर ई-बुक रिडर असणे आवश्यक आहे.

मून रिडर
एफबी रिडर या अ‍ॅपप्रमाणेच काम करणारे हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये फोन आणि टॅबलेटमध्ये सिंकची सुविधा असल्यामुळे आपण फोमध्ये एखादे पुस्तक ज्या पानावर वाचण्याचे थांबविले तेच पान टॅबवर ते पुस्तक सुरू केल्यावर समोर येते. याशिवाय या अ‍ॅपमध्ये बुकमार्क, एखादे वाक्य अधोरेखित करण्यासाठी हायलाइट, डिक्शनरी, शेअर, ऑनलाइन बॅकअप या सुविधा अतिरिक्त आहेत. तसेच या अ‍ॅपचा लूकही खूप चांगला आहे.
नीरज पंडित- niraj.pandit@expressindia.com