तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे ऑनलाइन शॉपिंगला सध्या चांगले दिवस आले आहेत. घरबसल्या हजारो वस्तूंच्या भाऊगर्दीतून आपल्याला हवी तशी वस्तू निवडून ती सवलतीच्या दरात आणि घरपोच मिळवता येत असल्याने ऑनलाइन शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचाही ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यांपासून घरातील फर्निचपर्यंतच्या असंख्य गोष्टी सध्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून विक्रीस उपलब्ध होत आहे. हा संपूर्ण व्यवहार तांत्रिकदृष्टय़ा सुरक्षित आणि पारदर्शी असला तरी त्यातून चोरवाटा काढून आपला कार्यभाग साधणाऱ्या अनेक कंपन्या, विक्रेते आता वाढत चालले आहेत. पर्यायाने ऑनलाइन शॉपिंगचे धोकेही वाढत चालले आहेत. सध्या दिवस सणासुदीचे आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी, त्यामध्ये धोके कसे उद्भवू शकतात, याची माहिती देणारा हा लेख..
ऑनलाइन शॉपिंगची सुरुवात अनेकदा आपल्या ई-मेलच्या इनबॉक्समध्ये आलेल्या मेलपासून किंवा आपण नेहमी पाहात असलेल्या संकेतस्थळावरील जाहिरातीपासून होते. या जाहिरातींमधील वस्तूंवर जाहीर केलेली सवलत ग्राहकांना आकर्षित करते व ते संबंधित वस्तूच्या खरेदीसाठी ई-कॉमर्स संकेतस्थळावर येऊन पोहोचतात. येथून खरं तर ग्राहकाची परीक्षा सुरू होते. ई-कॉमर्स संकेतस्थळांवर ग्राहकांना भुरळ पाडून फसवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ऑनलाइन शॉपिंग करताना खालील गोष्टी वरवर न पाहता बारकाईने तपासून पाहा.

खोटय़ा प्रतिक्रिया :
एका ग्राहकाने दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया दुसऱ्या ग्राहकाला आकर्षित करते, हे विपणनाचे महत्त्वाचे सूत्र असते. त्यामुळे ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील प्रत्येक वस्तूच्या विक्री पानावर ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया असतात. या प्रतिक्रियांतून सदर वस्तूच्या प्रत्यक्ष वापराचा अनुभव अन्य ग्राहकांकडून मिळण्याची अपेक्षा असते. त्यावरून ती वस्तू आपल्यासाठी चांगली आहे का, याचाही निर्णय घेता येतो. मात्र, अनेक कंपन्या किंवा त्या संकेतस्थळांवरून आपल्या वस्तू खपवू पाहणारे विक्रेते (डीलर्स) खोटय़ा प्रतिक्रिया नोंदवून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे अलीकडे निदर्शनास आले आहे.  अशा प्रकारच्या खोटय़ा प्रतिक्रिया देण्यासाठी संबंधितांना आकर्षक रकमा दिल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रतिक्रियांवर पूर्णपणे विसंबून आपला निर्णय घेऊ नका. अतिशय सकारात्मक किंवा लांबलचक प्रतिक्रियांपासून सावध राहा. कारण कोणताही ग्राहक खरेदी केलेल्या वस्तूबाबत पूर्णपणे समाधानी असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत काही दुर्गुण शोधण्याचा मानवी गुणधर्मच असतो. तसेच एखाद्या वस्तूबाबत भरभरून लिहिण्याएवढा वेळ कोणी उगाच का दवडेल, याचेही भान आपल्याला असले पाहिजे. संबंधित वस्तूबाबत किंवा ती विकणाऱ्या विक्रेत्याची फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अधिक उत्तम.

वस्तूची खरी किंमत काय? :
बऱ्याचदा आपल्या इनबॉक्समध्ये ‘अमूक एक वस्तू ९० टक्के सवलतीत’ किंवा ‘अमुक वस्तूवर तमुक वस्तू मोफत’ अशा जाहिराती करणारे ई-मेल येतात. त्या जाहिराती भुरळ पाडणाऱ्या असतात. साहजिकच ग्राहक त्यावर क्लिक करून ई-कॉमर्स संकेतस्थळावर पोहोचतो व खरेदीची प्रक्रियाही सुरू करतो. मात्र, हे सर्व करत असताना जी आकर्षक ऑफर आपल्याला दिसते, त्याच किमतीत वस्तू मिळत आहे का, याचा विचार केला जात नाही. बऱ्याचदा कंपन्या वस्तूंवर आकर्षक सवलती देऊ करतात. मात्र, त्यांचे ‘शिपिंग चार्जेस’ अव्वाच्या सव्वा आकारले जातात. हे शिपिंग चार्जेस खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात दर्शवले जातात. तोपर्यंत आपण बरेच पुढे गेलेलो असतो व व्यवहार यशस्वी करण्याच्या घाईपोटी भराभर क्लिक करत जातो. संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर ती वस्तू आपल्याला नेहमीच्याच दराने मिळाल्याची जाणीव होते. अशी फसगत बऱ्याच ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून केली जाते. हे टाळायचे असल्यास प्रत्येक वस्तूची खरी किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोणीही पदरमोड करून वस्तुविक्री करणार नाही, याची जाणीव ठेवा. आकर्षक सवलती किंवा अन्य ऑफर्सना भुलून जाण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याची किंमत किती असेल, हे समजून घ्या. शेवटच्या टप्प्यात ‘शिपिंग चार्जेस’ अवास्तव वाटत असल्यास लागलीच व्यवहार रद्द करा. तो पर्याय तुम्हाला उपलब्ध असतोच.

चुकीच्या किंवा खराब वस्तूची पाठवणी :
मोबाइल चार्जरच्या जागी दगड, मोबाइलच्या ऐवजी साबण अशा प्रकारची ‘डिलिव्हरी’ मिळाल्याच्या अनेक घटना अलीकडे प्रसारमाध्यमांतून वाचायला मिळतात. असे का होते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळे चालवणारी कंपनी प्रतिष्ठित असली, तरी त्या माध्यमातून आपल्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते बनावट किंवा फसवणूक करणारे असू शकतात. त्यांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा एखाद्या वस्तूची छायाचित्रे वा वैशिष्टय़े संकेतस्थळावर जशी दिसतात, त्यापेक्षा प्रत्यक्षात पाठवण्यात आलेल्या वस्तूचा दर्जा खालचा असू शकतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्यांच्याकडून ती वस्तू खरेदी करणार आहोत, त्या विक्रेत्याची पाश्र्वभूमी तपासून घेतली पाहिजे. अॅमेझॉन, स्नॅपडील किंवा फ्लिपकार्ट अशा कंपन्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र, ते तपासतानाही सजग असले पाहिजे.
वस्तूची ऑर्डर केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या ‘ट्रॅकिंग क्रमांका’चा योग्य वापर करून वस्तू कुठपर्यंत आहे, हे तपासून घेतले पाहिजे. तसेच मिळालेली वस्तू चुकीची असल्यास त्याची तक्रार संबंधित ई-कॉमर्स संकेतस्थळाकडे तातडीने केली पाहिजे. मात्र, हे सर्व करण्यापूर्वी वस्तू खरेदी करण्याच्या प्रक्रियेत संबंधित ई-कॉमर्स संकेतस्थळही सहभागी आहे ना, याची खातरजमा करून घेतली पाहिजे. थर्ड पार्टी अथवा  त्रयस्थ विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी केल्यास कंपन्या त्याची जबाबदारी झटकू शकतात. त्यामुळे खरेदी करताना संबंधित ई-कॉमर्स संकेतस्थळाची विश्वासार्हताही तपासून पाहिली पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वस्तू खरेदी करण्यासाठी शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर करा. कारण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डाद्वारे एखादी वस्तू खरेदी करता, तेव्हा कायद्यानुसार, विक्रेता आणि क्रेडिट कार्ड कंपनी या दोघांवर योग्य वस्तूची पाठवणी करण्याची जबाबदारी येते. दुसरे म्हणजे, वस्तू अयोग्य असल्यास तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून त्यांच्याकडून विक्रेत्यांना होणारे/झालेले ‘पेमेंट’ रोखू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डच्या वापरामुळे तुमच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिक धोका बसत नाही. उलट तुमच्या डेबिट कार्डाची माहिती मिळवून एखादी व्यक्ती त्यातील सर्व रक्कम लंपास करण्याचाही प्रयत्न करू शकते.

सुरक्षित ऑनलाइन शॉपिंगसाठी..
* सार्वजनिक ठिकाणावरील संगणकावरून ऑनलाइन शॉपिंग करू नका. घरातून किंवा आपल्या व्यक्तिगत वापरातील संगणक वा मोबाइलचा वापर करा.
* तुमच्या संगणकामध्ये चांगला ‘अँटी मालवेअर प्रोग्रॅम’ इन्स्टॉल करा. जेणे करून तुमच्या व्यक्तिगत माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न रोखला जाईल.
* विश्वासार्ह विक्रेत्यांसोबतच व्यवहार करा.
* ऑर्डर करताना ती प्रक्रिया ‘एन्क्रिप्टेड’ असल्याची खातरजमा करून घ्या.
* ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर बिलाची प्रिंटआऊट काढा.
* ई-कॉमर्स संकेतस्थळांसाठी कठीण व गुंतागुंतीचा पासवर्ड नोंदवा.
– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com