मोबाइल किंवा कॅमेऱ्याच्या वाढत्या वापरासोबतच त्यात अधिकाधिक फोटो जमा करण्यासाठी जास्त स्टोअरेज असलेल्या मेमरी कार्डची गरज लागते. त्यामुळे बऱ्याचदा नवीन फोटो ‘सेव्ह’ करण्यासाठी ऐनवेळी आपल्याला काही जुने फोटो, फाइल्स हटवाव्या लागतात. कधीकधी आपल्या नकळत मेमरी कार्डातील डाटा ‘डीलिट’ होतो. तर कधीकधी कार्डच करप्ट झाल्याने त्यातील महत्त्वाचा डाटा पूर्णपणे नष्ट होतो. अशावेळी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. मात्र इंटरनेटच्या महाजालात यावरही तोडगा उपलब्ध आहे. मेमरी किंवा एसडी कार्डातून डीलिट झालेले फोटो, फाइल्स किंवा व्हिडीओ परत मिळवणे आता सहज शक्य आहे. ही ‘रिकव्हरी’ करून देणाऱ्या अनेक वेबसाइट इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण त्यापैकी काही धोकादायक तर काही पैसे वसूल करणाऱ्या आहेत. त्यापेक्षा इंटरनेटवरून सहज, मोफत डाऊनलोड करता येणारे सॉफ्टवेअर आपल्या कार्डाची गेलेली ‘मेमरी’ परत आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याद्वारे आपल्या मेमरी कार्डातील जुना डाटा आपण पुन्हा मिळवू शकतो. मात्र यासाठी तुम्हाला ‘कार्ड रीडर’ आवश्यक आहे. या कार्डरीडरच्या साह्य़ाने कॉम्प्युटरशी कनेक्ट करून तुम्हाला त्याचा वापर करता येईल.
मेमरी कार्डातील गेलेला डाटा परत मिळवून देणारी काही निवडक सॉफ्टवेअर्स येथे देत आहोत. यापैकी कोणत्याही सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डातील डीलिट झालेल्या फाइल्स परत मिळवू शकता.
* रिकुव्हा ((Recuva)) –
विंडोज २००० आणि त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे हे सॉफ्टवेअर अवघे ४.०३ एमबी इतके आहे. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर कार्डरीडरद्वारे मेमरी कार्ड कॉम्प्युटरशी कनेक्ट करावे लागते. नंतर रिकुव्हाच्या ‘ड्रॉपडाऊन मेनू’वर जाऊन ‘स्कॅन’ बटण दाबावे लागते. त्यानंतर हे सॉफ्टवेअर तुमच्या मेमरी कार्डातील सर्व डीलिट अथवा करप्ट झालेल्या फाइल्सची यादी दाखवते. या फाइल्स निवडून त्या पुन्हा आपल्या कार्डात किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करता येतात.
* पँडोरा रिकव्हरी (Pandora Recovery) –
मेमरी कार्डमधून डीलिट झालेल्या फाइल्स परत मिळवून देणारे हे सॉफ्टवेअर नावाजलेले आहे. विंडोज एक्सपी आणि त्यावरील ऑपरेटिंग सिस्टीमवर ते काम करते. सुमारे ३.१२एमबीचे हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर ‘रिकुव्हा’प्रमाणेच यातूनही आपल्या डीलिट झालेल्या फाइल्स परत मिळवता येतात. या सॉफ्टवेअरमध्ये क्वीक स्कॅन आणि डीप स्कॅन असे दोन पर्याय मिळतात. क्विक स्कॅनवर जलदगतीने फाइल्स उपलब्ध होतात. तर कार्ड फॉरमॅट केले असल्यास तुम्हाला ‘डीप स्कॅन’ची मदत घ्यावी लागते
* स्टेलर फोनिक्स मॅक फोटो रिकव्हरी (Stellar Phoenix Mac Photo Recovery)
अ‍ॅपलच्या मॅक सिस्टीमवर चालणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या मदतीने जुना डेटा परत मिळवण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त आहे. मॅकच्या ओएस एक्स १०.५ किंवा त्यावरच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर ते काम करते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने डीलिट झालेले फोटो, व्हिडीओ किंवा ऑडिओही परत मिळवता येतात. हे सॉफ्टवेअर विंडोजवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमनाही उपयुक्त आहे.
* फोटोरेक (PhotoRec)
विंडोज, लिनक्स किंवा ओएस एक्स यापैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमच्या कोणत्याही व्हर्जनवर चालणारे हे ओपनसोर्स सॉफ्टवेअर आहे. त्यावरून केवळ मेमरी कार्डच नाही तर हार्ड डिस्कवरील डीलिट झालेला डाटाही परत मिळवता येतो.  

तुमचा फोन ‘पॅटर्न लॉक’ झालाय?
आपला स्मार्टफोन कुणाच्याही हातात पडला तरी त्याला आपल्या मर्जीखेरीज तो हाताळता येऊ नये, यासाठी अँड्रॉइडच्या प्रत्येक फोनमध्ये ‘पॅटर्न लॉक’ची सुविधा असते. आपल्या फोनमधील माहिती इतरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा पॅटर्न लॉक अतिशय उपयोगी ठरतो. पण कधीकधी हा ‘पॅटर्न लॉक’च आपली डोकेदुखी ठरू शकतो. तुमच्या नकळत तुमचा फोन हातात घेऊन कुणी ‘पॅटर्न लॉक’ उघडण्याचे वारंवार प्रयत्न केले आणि ते फसले तर तुमचा फोन कायमस्वरूपी लॉक होतो. अशा वेळी ‘गुगल प्ले’मध्ये नोंदवलेला यूजर आयडी वापरून तुम्ही तुमचा फोन अनलॉक करू शकता. मात्र, समजा त्यावेळी तुमच्या फोनचे इंटरनेट कनेक्शन काम करत नसेल तर?.. असे झाले तर तुमचा फोन ‘अनलॉक’ होऊ शकत नाही. मग हा फोन कंपनीच्या सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये नेण्यावाचून किंवा पैसे मोजून एखाद्या मोबाइल दुकानदाराकडून ‘अनलॉक’ करण्याशिवाय गत्यंतर नसते. पण, यापेक्षाही सोपा आणि वेळ वाचवणारा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायानिशी तुम्ही बसल्या जागीच तुमचा फोन ‘अनलॉक’ करू शकता. तुमचा फोन ‘लॉक’ झाला असेल तर, खालील कृती करा.
*फोन बंद करा आणि दोन मिनिटे वाट पाहा. ’फोनवरील ‘व्हॉल्यूम अप’चे बटण दाबून ठेवा.
*‘होम’ बटण दाबून ठेवा. ’फोनवरील ‘पॉवर’चे बटण दाबा व तो सुरू होताच बटण सोडा.
* तुमचा फोन ‘बॅकग्राऊंड सिस्टीम’मध्ये जातो.
* येथे तुम्हाला आधी न पाहिलेला वेगळाच मेनू दिसेल.
*‘होम’ बटणाच्या मदतीने ‘स्क्रोल’ करून या मेनूतील तिसरा पर्याय ‘डीलिट ऑल यूजर डाटा’ निवडा.
* हा डाटा डीलिट होईल व फोन आपोआप सुरू होईल. तुमचा फोन अनलॉक झालेला तुम्हाला दिसेल.