अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित स्मार्टफोन म्हणजे उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन्स आणि सुविधांचे भांडारच. ओपन सोर्स किंवा खुली स्रोतयंत्रणा असल्यामुळे अ‍ॅण्ड्रॉइडच्या सिस्टिमवर कुणीही आपल्या पद्धतीने, सोयीने आपल्या स्मार्टफोनमध्ये बदल करू शकतो. हे बदल केवळ वरवरचे असतात. त्यामुळे ते तितके प्रभावी नसतात, पण तुम्ही तुमचा अ‍ॅण्ड्रॉइड फोन ‘रूट’ करून किंवा सामान्य भाषेत ‘फोन अनलॉक’ करून त्यात अनेक बदल करू शकता. अ‍ॅण्ड्रॉइड रूट करून तुम्ही तुमच्या फोनवर वायरलेस टीथिरग करून इंटरनेटचा अधिक जलद वापर करू शकता, अ‍ॅण्ड्रॉइड अपग्रेड करू शकता किंवा तुमच्या फोनच्या जुनाट थिम्स बदलून नव्या थिम्स वापरू शकता. एका प्रकारे म्हणायला गेले तर तुमच्या फोनच्या छुप्या क्षमतेचा वापर करून तो तुम्ही अधिक उपयुक्त बनवू शकता. अ‍ॅण्ड्रॉइड फोन ‘रूट’ कसा करायचा याबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. पण त्या आधी रूट म्हणजे काय आणि त्याचे फायदे-तोटे याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

‘रूट’ म्हणजे काय?
अ‍ॅण्ड्रॉइड ही एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असलेली यंत्रणा आहे. त्यामुळे कुणीही स्वत: तयार केलेले अ‍ॅप्लिकेशन त्यावर चालवू शकतो. पण तरीही काही बाबतीत अ‍ॅण्ड्रॉइडच्या वापरकर्त्यांना ‘अ‍ॅक्सेस’ नसतो. वायरलेस टीथरिंग असेल किंवा आपल्या मनाजोगती थिम असेल किंवा ‘गुगल प्ले’ची मान्यता नसलेले अ‍ॅप्लिकेशन असेल याबाबतीत तुमचा अ‍ॅण्ड्रॉइड फोन तुम्हाला परवानगी देत नाही. ही परवानगी मिळवणे किंवा तुमच्या फोनच्या कार्यप्रणालीचा ताबा आपल्या हाती घेण्यालाच ‘रूटिंग’ असे म्हणतात. ‘रूट’ केल्यानंतर फोनचे संपूर्ण नियंत्रण वापरकर्त्यांच्या हातात येते. या नियंत्रणाचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाइलमधील नकोसे सिस्टिम अ‍ॅप्स (डिफॉल्ट अ‍ॅप्स) काढू शकता. तुमचा अ‍ॅण्ड्रॉइड अपग्रेड करू शकता.
‘रूटिंग’चे फायदे
* गुगल प्ले, मोबाइल कंपनी किंवा मोबाइल सेवापुरवठादार कंपनी काही अ‍ॅप्लिकेशन्सना ‘प्रवेशबंदी’ (ब्लॉक) करतात. हे अ‍ॅप्लिकेशन्स धोकादायक असल्यामुळे, फोनला अनुरूप नसल्यामुळे किंवा आपल्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची उपयुक्तता वाढवण्यासाठी ही प्रवेशबंदी केली जाते. अ‍ॅण्ड्रॉइड रूट केल्यानंतर तुम्ही हे अ‍ॅप्लिकेशन सहज ‘इन्स्टॉल’ करू शकता.
ग् रूटिंग केल्यानंतर फोनचा सीपीयू ‘ओव्हरक्लॉक’ करून तुम्ही त्याचा वेग वाढवू शकता किंवा ‘अंडरक्लॉक’ करून तुम्ही बॅटरीचा वापर वाढवू शकता.
ग् स्मार्टफोनवरील अ‍ॅप्लिकेशन वापरताना मधूनमधून झळकणाऱ्या जाहिराती (अ‍ॅड्स) त्रासदायक आणि वैतागवाण्या ठरतात. हा त्रास तुम्ही रूटिंगमार्फत दूर करू शकता. अ‍ॅडफ्री, अ‍ॅडब्लॉकप्लस, अ‍ॅड अवे असे अनेक अ‍ॅप्लिकेशन्स वापरून तुम्ही या कंटाळवाण्या आणि ‘डेटाखाऊ’ जाहिरातींपासून सुटका मिळवू शकता.
ग् ‘कस्टम रोम’चा वापर करण्याची मुभा हा ‘रूटिंग’चा सर्वात मोठा फायदा आहे. ‘रोम’(फडट) हा अ‍ॅण्ड्रॉइडची सुधारित पण अनधिकृत ऑपरेटिंग सिस्टिम असते. अनधिकृत यासाठी की ती गुगलने तयार केलेली नसून वापरकर्त्यांपैकी काही डेव्हलपर्सनी केलेली असते. या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सामान्य अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमपेक्षा अधिक वैशिष्टय़े असतात. या वैशिष्टय़ांमुळे तुमचा फोन अधिक दर्जेदार होऊ शकतो.

‘रूटिंग’चे धोके
अ‍ॅण्ड्रॉइड ‘रूट’ करणे म्हणजे एका प्रकारे तुरुंग तोडून बाहेर पडण्यासारखे आहे. हा मान्यताप्राप्त मार्ग नाही. फोन ‘रूट’ केल्यानंतर तुमचा फोन अधिक वैशिष्टय़पूर्ण बनत असला तरी तो त्याच वेळी सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायकही ठरू शकतो. ‘रूटिंग’ योग्य पद्धतीने न झाल्यास तुमचा फोन कायमचा बंदही पडू शकतो. शिवाय फोन ‘रूट’ करताच त्याची वॉरंटी संपुष्टात येते. त्यामुळे तो कंपनीकडे नेऊन दुरुस्त करण्याची शक्यताही उरत नाही. अनधिकृत अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यामुळे तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर किंवा व्हायरसचा शिरकावही होऊ शकतो. त्यामुळे अ‍ॅण्ड्रॉइड फोन ‘रूट’ करणे हे धोक्याचे काम आहे. हे सर्व धोके पत्करून तुम्ही ‘रूट’ करण्याची तयारी असेल तर खालील टिप्स नक्की लक्षात ठेवा :
घ् तुमच्या फोनची वॉरंटी संपली असेल तरच हे धाडस करा.
घ् तुमचा फोन जुना झाला असल्यास किंवा तो व्यवस्थित काम करीत नसेल तरच हा मार्ग निवडा. जेणेकरून या संपूर्ण प्रक्रियेत तो खराब झाल्यास तुमचे नुकसान होणार नाही.
घ् फोन आणि त्यावरील यंत्रणा याबाबत यथायोग्य ज्ञान असेल तरच ‘रूट’ करण्याचा प्रयत्न करा. अर्धवट माहिती अथवा घाई-गडबडीत हा प्रयोग करू नका.
घ् फोन ‘रूट’ कसा करायचा याची माहिती देणाऱ्या असंख्य वेबसाइट उपलब्ध आहेत. मात्र, त्यातील विश्वासार्ह आणि प्रसिद्ध संकेतस्थळांवरील माहितीचा वापर करा. शक्य असल्यास ‘यू टय़ूब’वर या संदर्भात उपलब्ध असलेले व्हिडीओ पाहा.
घ् प्रत्येक फोनची ‘रूट’ करायची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्याच फोनशी संबंधित ‘रूट’ प्रक्रिया असल्याची खात्री करून घ्या.
घ् रूटिंग प्रक्रियेबाबत दिलेल्या माहितीप्रमाणेच प्रोसेस करा. अन्यथा तुमचा फोन कायमचा बाद होऊ शकतो.