एमजी ६३७० एक काळ असा होता की, घरात संगणक आहे असे म्हटले की, लोक त्या व्यक्तीला श्रीमंत मानायचे. पण आता संगणक घराघरांत अशी अवस्था आहे. पूर्वी त्या सोबत स्कॅनर किंवा प्रिंटर घेण्याची प्रथा नव्हती. केवळ व्यावसायिक मंडळीच संगणकासोबत प्रिंटर आणि स्कॅनरची मागणी नोंदवायचे. पण आता काळ बदलला आहे आणि पुन्हा एकदा संगणकाप्रमाणेच घराघरांत प्रिंटर आणि स्कॅनर असे चित्र दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही घरात शाळा- महाविद्यालयात जाणारी मुले असतील तर मग हे सारे ‘मस्ट’ असे मानले जाते. बाहेर सायबर कॅफेमध्ये जायचे आणि तिथे स्कॅनिंग किंवा प्रिंट काढून घ्यायची, यापेक्षा आता कमी झालेल्या किंमतींनंतर हे दोन्ही विकत घेऊन घरी ठेवणे परवडणारे असते. अर्थात प्रिंटरच्या बाबतीत मात्र एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे त्यातील शाई न वापरल्याने सुकून जाणार नाही, याची. त्यासाठी मग आठवडय़ातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा प्रिंट काढण्याचा मार्ग अवलंबला जातो. हे सारे नवे बदल आणि गरजा लक्षात घेऊन कॅनन या प्रसिद्ध कंपनीने पिक्स्मा एमजी ६३७० हा प्रिंटर बाजारात आणला आहे.
घरी असलेल्या प्रिंटरवर काढलेली प्रिंट आणि बाहेर फोटो स्टुडिओमध्ये असलेल्या प्रिंटरवर काढलेली प्रिंट यामध्ये फरक असतो. हा फरक या नव्या उत्पादनामध्ये कॅननने मिटवून टाकला आहे. त्यामुळे या नव्या प्रिंटरवर काढलेली प्रिंट तुम्हाला फोटो लॅब किंवा स्टुडिओमधील प्रिंटच्या तोडीस तोड अशी गुणवत्तापूर्ण असते. हा या प्रिंटरचा महत्त्वाचा विशेष आहे. शिवाय हे सारे तुम्हाला मिळवण्यासाठी वायर्स जोडत बसण्याची गरज नाही, कारण हा वायरलेस प्रिंटर आहे. हा एमजी ६३७० प्रिंटर तुम्हाला प्रिंटसाठी १०.० आयपीएम तर मोनोक्रोम प्रिंटिंगसाठी १५.० आयपीएम एवढा प्रिंटिंग वेग देतो. समोरच्या बाजूस दोन विविध आकाराचे कागद प्रिंटिंगसाठी लोड करण्याकरता एका ट्रेची सोयही करून देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :
रु. १९,३६५/-